प्लाइस्टोसीन : (हिमयुग, प्रातिनूतन). भूवैज्ञानिक इतिहासाच्या एका विभागाचे नाव. काळाच्या विभागाला प्लाइस्टोसीन युग व त्या काळात तयार झालेल्या खडकांच्या गटाला प्लाइस्टोसीन माला म्हणतात. हा ⇨ प्लायोसीन (सु. २ ते १·२ कोटी वर्षापूर्वीच्या) काळानंतरचा व ⇨चतुर्थ कल्पाचा (गेल्या सु. ६ लाख वर्षातील काळाचा) पहिला विभाग असून याचा काळ सु. ६ लाख ते ११,००० वर्षापूर्वीपर्यंतचा मानतात. शीत जलवायुमान (दीर्घकालीन सरासरी हवामान) व सस्तन प्राण्यांचे जीवाश्म (शिळारूप झालेले अवशेष) यांच्या आधारे हा विभाग पाडण्यात आला असून चार्ल्स लायेल यांनी १८३९ साली प्लाइस्टोसीन ही संज्ञा सुचविली आहे. आदिम घोडा, हत्ती, बैल, उंट इ. जनावरे अवतरली तेव्हापासून हा काळ सुरू होतो, असे काहींचे मत आहे. इंटरनॅशनल जिऑलॉजिकल काँग्रेसने १९४८ मध्ये प्लायोसीन व प्लाइस्टोसीन यांच्यामधील सीमा निश्चित केली व तीनुसार इटलीतील जीवाश्मांमध्ये ज्या पातळीत प्रमुख बदल होतो, ती पातळी सीमा म्हणून ठरविली. हिमनद्यांनी आच्छादिलेले भूपृष्ठावरील अनेक भाग हे या युगाचे वैशिष्ट्य असून माणूस याच काळात अवतरला.
या युगात उत्तर यूरोप, उ. अमेरिका, सायबीरिया, अंटार्क्टिका व आल्प्स-हिमालयासारख्या उंच पर्वतरांगांच्या भागांत हिमाचे थर पसरलेले होते. हिमनदीची क्रिया सुचविणारी भूस्वरूपे व निक्षेप [उदा., धोंडेमाती, हिमोढ (हिमनदीद्वारे आलेला गाळ), ओरखडे असणारे खडक इ.] या भागांत आढळतात. या काळातील विविध प्रकारचे गाळही आढळत असले, तरी अधिक उत्तरेकडे प्रामुख्याने हिमोढ आढळतात. हे हिमोढ घट्ट वा अर्धवट घट्ट झालेले असून ते आधीच्या खडकांवर विस्तृत प्रमाणात साचलेले आढळतात.
या युगातील शीत जलवायुमानाचे विविध परिणाम झालेले आढळतात. याच काळात जगातील बहुतेक भागांचा भूगोल, भूपृष्ठाच्या सीमा व प्राणि-वनस्पतींची भौगोलिक वाटणी आताप्रमाणे झाली. शीत जलवायुमानामुळे आधीच्या सस्तन प्राण्यांत बरेच बदल झाले. काही प्राण्यांनी उबदार जलवायुमानाच्या प्रदेशांकडे स्थलांतर केले, तर काहींमध्ये शीत जलवायुमानाशी जुळवून घेण्यासाठी काही शारीरिक बदल घडून आले (उदा., मॅमथांची लोकर). काही प्राणी शीत जलवायुमानातही टिकून राहिले (उदा., स्टेगोडॉन, शिवाथेरियम इ.) मात्र जे यांपैकी काहीच करू शकले नाहीत ते नष्ट झाले. अशा तऱ्हेने मोठे सस्तन प्राणी कमी झाले व काही प्राण्यांचे गटच्या गट काही भागांतून निर्वंश झाले. सायबीरिया व अलास्का भागांत प्रचंड सस्तन प्राण्यांची पूर्ण शरीरे टिकून राहिलेली आढळली आहेत.
हिमाच्या रूपात पाणी खंडांवर अडकून राहिल्याने या काळात सागरांची पातळी ९० मी. पर्यंत खाली गेली होती (उदा., इंग्लिश खाडीच्या ठिकाणी जमीनच होती.) उलट हिमाच्या वजनाने काही जमिनी सु. ३०० मी. पर्यंत खाली दाबल्या गेल्या होत्या व काही जमिनींवरील हिम वितळून निघून जाऊन दाब कमी झाल्याने त्या परत वर आल्या आणि त्यामुळे काही सागरी किनारे व ‘बुडालेली अरण्ये’ वर उचलली गेल्याचे दिसून येते.
या काळात चार हिमचक्रे झाल्याचे उ. अमेरिकेतील व यूरोपातील जीवाश्मांच्या पुराव्यांवरून आढळून आले आहे. जेव्हा हिम-बर्फाचे थर होते, तेव्हाचा हिमनादेय काळ आणि दोन हिमनादेय काळांच्यामधील उबदार जलवायुमानाचा काळ म्हणजे अंतराहिमानीय काळ होय. अशा तऱ्हेने प्लाइस्टोसीनमध्ये ४ हिमनादेय व ३ अंतराहिमानीय काळ झाले, असे मानतात. काहींच्या मते सध्याचा काळ हा अंतराहिमानीय काळ असावा. [⟶ हिमकाल].
या काळात हिमालयात सु. १,६०० मी. इतक्या खालपर्यंत हिमाचे थर होते. मात्र द्विपकल्पाचे जलवायुमान तेव्हा शीतोष्ण होते. उ. भारतातील नद्यांच्या गाळाखाली सु. ६·२५ लाख चौ. किमी. क्षेत्रावर या काळातील खडकांच्या राशी पसरलेल्या आहेत. याशिवाय करेवा (काश्मीर), उत्तर व मध्य हिमालय, नर्मदा-तापीचे खोरे, राजस्थान, आसाम, द्वीपकल्पाचा काही भाग इ. ठिकाणी या काळातील निक्षेप आढळतात. नर्मदा खोऱ्यामधील मध्य प्लाइस्टोसीन काळातील गाळात व उत्तर शिवालिक (पूर्व प्लाइस्टोसीन) संघातील धोंडेमातीच्या पिंडाश्मांत आदिम हत्ती, घोडे, उंट, बैल, गेंडे, पाणघोडे इ. सस्तन प्राण्यांचे जीवाश्म आढळले आहेत [⟶ शिवालिक संघ]. पोतवार, काश्मीर व नर्मदा खोरे या भागांमध्ये याच युगात माणूस अवतरला. तसेच हिमालयाच्या उत्थानाच्या तिसऱ्या टप्प्याची सुरूवातही याच काळात झाली.
पहा : चतुर्थ कल्प नवजीव हिमकाल.
ठाकूर. अ. ना.
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..