मॉलिब्डेनाइट : (मॉलिब्डेनम ग्लान्स). खनिज. स्फटिक षट्‌कोणी वडीसारख्या चकत्या व आखूड किंवा किंचित निमुळते प्रचिन [→ स्फटिकविज्ञान]. सामान्यपणे हे पत्रित, संपुंजित वा शल्कांच्या (खवल्यांच्या) आणि कधीकधी कणमय रूपात आढळते [→ खनिज विज्ञान]. ⇨ पाटन(00०01) उत्कृष्ट. याची पत्रे लवचिक असतात पण स्थितिस्थापक नसतात. हे छेद्य (सहज कापता येण्यासारखे) असून पुरेसे मऊ असल्याने हाताळल्यास हातास ग्रिजासारखे लागते. कठिनता १–१·५ नखाने याच्यावर ओरखडा काढता येण्याइतके हे मऊ आहे. तसेच साध्या कागदावर याने रेघ काढता येते आणि ती निळसर काळी (ग्रॅफाइटाची काळी) दिसते. वि. गु. ४·६२–४·७३. चमक धातुसारखी चकचकीत. रंग शिशाप्रमाणे करडसर काळा व त्यावर निळसर छटा. कस करडसर काळा, झिलईदार पोर्सलीनच्या तुकड्यावर व गुळगुळीत कागदावर हिरवट काळा, अपारदर्शक. रा. सं. MoS2. हे उघड्या नळीत तापविल्यास सल्फर डाय-ऑक्साइडाचा वास येतो. हे सल्फ्यूरिक व नायट्रिक अम्लांत विद्राव्य (विरघळणारे) आहे. हे ग्रॅफाइटासारखे दिसते. मात्र यामुळे बन्सन ज्योतीला हिरवी छटा येते (ग्रॅफाइटाने येत नाही).

मॉलिब्डेनाइट हे मॉलिब्डेनमाचे सर्वांत सामान्य खनिज आहे पण हे मोठ्या प्रमाणात क्वचित आढळते. ग्रॅनाइट, पेग्मटाइट, ॲप्लाइट व कधीकधी सायेनाइट या सिकत (सिलिकेचे प्रमाण अधिक असलेल्या) खडकांमध्ये व या खडकांशी निगडित असलेल्या क्वॉर्ट्‌झ शिरांमध्ये हे आढळते. स्फटिकी चुनखडकांतही हे आढळते. सामान्यपणे कॅसिटेराइट, शीलाइट, वुल्फ्रॅमाइट, फ्ल्युओराइट इ. खनिजांबरोबर धातवीय (उदा., कथिल, टंगस्टन, तांबे यांच्या) खोल शिरांमध्ये तसेच लाइम सिलिकेट, शीलाइट, कॅल्कोपायराइट इ. खनिजांबरोबर सस्पर्शी रूपांतरणाने (तापमान व दाब यांच्यामुळे झालेल्या बदलांनी) बनलेल्या खडकांत हे आढळते.

मॉलिब्डेनाइटाचे बहुतेक उत्पादन अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमध्ये होते व तेथील ५०% उत्पादन क्लायमॅक्स (कोलोरॅडो) येथे होते. याशिवाय उटा, ॲरिझोना, न्यू मेक्सिको, कॅलिफोर्निया व नेव्हाडा या राज्यांतही हे आढळते. अमेरिकेशिवाय नॉर्वे, स्वीडन, चिली, रशिया, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, सॅक्सनी (पू. जर्मनी), चीन, कोरिया, जपान, प. जर्मनी, मेक्सिको, कॅनडा, फिलिपीन्स इ. प्रदेशांत हे थोड्या प्रमाणात आढळते. केरळमधील वायनाड आणि क्विलॉन जिल्ह्यांमध्ये या खनिजांचे पुरेसे मोठे साठे असल्याचे १९८१ मध्ये दिसून आले. याशिवाय खासी टेकड्या (आसाम), मदुराई (तमिळनाडू), गोदावरी (आंध्र प्रदेश), किशनगढ (राजस्थान), त्रावणकोर (केरळ), छोटा नागपूर, हजारी बाग (बिहार) इ. प्रदेशांत हे सायेनाइट, पेग्मटाइट व स्फटिकी खडकांत आढळते मात्र येथील साठे महत्त्वाचे नाहीत.

मॉलिब्डेनम धातू मुख्यत्वे याच्यापासूनच मिळविण्यात येते. शिवाय वंगण, मिश्र पोलाद, मिश्रधातू इत्यादींसाठी तसेच मॉलिब्डेनम ऑक्साइड, कॅल्शियम मॉलिब्डेट, फेरोमॉलिब्डेनम यांच्या निर्मितीसाठीही याचा उपयोग करतात. 

खनिजाच्या रंगावरून शिसे या अर्थाच्या ग्रीक शब्दावरून याचे मॉलिब्डेनाइट हे नाव आले आहे.

पहा : मॉलिब्डेनम.

ठाकूर, अ. ना.