प्रेहनाइट : खनिज. स्फटिक समचतुर्भुजी, वडीसारखे वा प्रचिनाकार. चांगले स्फटिक क्वचित आढळतात [→ स्फटिकविज्ञान]. बहुधा मूत्रपिंडाकार, झुंबराकार, लहान स्फटिकांचे अरीय मांडणीचे गोलसर पुंजके व कधीकधी पत्रित रूपांत हे आढळते. भंजन खडबडीत [→ खनिजविज्ञान]. कठिनता ६-६·५ वि. गु. २·८ – २·९५. चमक काचेसारखी. रंग फिकट हिरवा ते करडा, पांढरा, क्वचित पिवळा. दुधी काचेप्रमाणे पारभासी. रा. सं. Ca2Al2Si3O10 (OH)2. यामध्ये ॲल्युमिनियमाच्या जागी थोडे लोह आलेले असते. हे द्वितीयक (नंतरच्या क्रियांना तयार झालेले) खनिज असून बेसाल्ट व त्याच्याशी निगडित असलेल्या खडकांमधील पोकळ्यांत हे झिओलाइटे, डॅटोलाइट, पेक्टोलाइट, कॅल्साइट इ. खनिजांबरोबर आढळते. काही रूपांतरित चुनखडकांत आणि अँफिबोलाइटांतही हे आढळते. जर्मनी, इटली, अमेरिका, फ्रान्स, चीन, ऑस्ट्रिया, द. आफ्रिका, स्कॉटलंड इ. भागांत हे आढळते. भारतामधील ट्रॅप खडकांत हे क्वचित आढळते. याचे चांगल्या रंगाचे पारदर्शक स्फटिक कधीकधी रत्न म्हणून वापरले जातात. व्हान प्रेह यांनी १७७४ च्या सुमारास हे शोधून काढले व प्रथम यूरोपात आणले म्हणून त्यांच्या नावावरून ए. जी. व्हेर्नर यांनी १७८९ साली याला प्रेहनाइट हे नाव दिले.
ठाकूर, अ. ना.