प्रेरणा – १ : (मोटिव्हेशन). मानसशास्त्रातील एक महत्त्वाची पण वादग्रस्त संकल्पना. प्रेरणांचे स्वरूप, संख्या, मापन, मानवी आणि मानवेतरांच्या प्रेरणांतील भेद यांसारख्या प्रत्येक मुद्याबाबत सैद्धांतिक पातळीवर वाद झालेले आहेत. ‘प्रेरित’ प्राण्याची किंवा माणसाची लक्षणे कोणती हाही वादग्रस्त मुद्दा आहे. माणूस किंवा कोणताही प्राणी जसा वागतो, तसा तो का वागतो, या प्रश्नाचा उलगडा केल्याशिवाय मानसशास्त्रीय विचारव्यूह पूर्ण होऊ शकत नाही. या प्रश्नापाठोपाठच ईश्वरेच्छा, स्वेच्छा, निसर्गक्रम किंवा परिस्थितीशरणता ही उत्तरेही आली परंतु त्यांतील विवाद्यता अद्यापिही टिकून आहे.
व्यक्तीचे विशिष्ट वर्तन सुरू कसे व कशामुळे होते, त्याला कार्यशक्ती कशी मिळते ते टिकून कसे राहते, त्याला दिशा कशी प्राप्त होते किंवा दिली जाते, ते कसे व केव्हा थांबते किंवा बदलते आणि हे सर्व घडत असताना त्या जीवाची आंतरिक प्रतिक्रिया कशा प्रकारची असते, या सर्वांचा विचार प्रेरणाविचारात अंतर्भूत होतो. प्रेरणाविचारात निवड, निर्णय, अग्रक्रम, निश्चिती, समकालिकता, श्रेणीरचना इ. कार्यकारी स्वरूपाची गुंतागुंत आहे त्याचप्रमाणे जाणिवेचा किंवा बोधाचा प्रश्नही त्यात गुंतलेला आहे. वर्तनाचे ‘ध्येय’ निसर्गदत्त असते की संपादित असते, हा प्रश्न प्रेरणा आणि अध्ययन यांना जोडणारा आहे तर अनुभवाचे आशय वस्तुनिष्ठ म्हणजे जगावर अवलंबून असतात की व्यक्तीच्या हेतुरचनेवर, हा प्रश्न प्रेरणा आणि ⇨संवेदन यांचा सांधा जाणवून देणारा आहे. ⇨ज्ञानसंपादन वा अध्ययन आणि संवेदन ही ⇨ प्रायोगिक मानसशास्त्रातील अभ्यासक्षेत्रे प्रेरणा हा एक नियामक घटक म्हणून विचारात घेतात.
मानसशास्त्राच्या इतिहासात प्रेरणांचा विचार अनेक मार्गांनी झाला आहे. पहिला मार्ग म्हणजे अनुभवाधिष्ठित विचार. यात व्यक्तीला जाणवणाऱ्या इच्छा, गरजा, आकांक्षा आणि कृतिप्रवृत्ती यांचा विचार अंतर्भूत होतो. मज्जासंस्थेतील व शरीरातील इतर जैवरासायनिक घडामोडींच्या अंगाने विचार करताना, प्रेरणांमुळे निर्माण होणारी शरीरस्थिती केंद्रस्थानी मानून होणारा विचार हा दुसरा मार्ग होय. तिचे सर्व पैलू अनुभवाच्या किंवा निवेदनाच्या पातळीवर असतीलच, असे नाही. जाणिवेच्या पातळीवर नसणाऱ्या केवळ मानसिक प्रेरणांमधून वर्तन नियंत्रित होते, असा सिद्धांत आणि तदनुषंगाने एक पूर्ण विचारव्यूह फ्रॉइडने मांडला आहे. प्रेरणाविचाराचा तिसरा व अधिक परिचित मार्ग म्हणजे वर्तनाची दिशा, सामर्थ्य आणि सातत्य ही वैशिष्ट्ये लक्षात घेऊन परिसर आणि व्यक्ती यांचा आंतरक्रियांच्या अनुषंगानेही विचार करणे. वरील तीनही प्रकारच्या दृष्टिकोनांनुसार प्रेरणाविषयक संकल्पनांना गणिती संबंधांनी व्यक्त करण्याचे प्रयत्नही झालेले आहेत. अर्थातच व्यक्तीच्या प्रत्ययाला येणारी प्रेरणा, तिचे शारीरिक स्वरूप, तिचे वर्तनात दिसून येणारे विशेष आणि संख्यात्मक संबंध या सर्वांचे एकात्म आकलन आज शक्य आहे का? या प्रश्नाचे होकारार्थी उत्तर देता येत नाही परंतु त्याच दिशेने अभ्यास चालू आहे. प्रेरणाविषयक अभ्यासातून गरज , नोदन, जरूरी, सहजप्रेरणा, इच्छा, आवेग, हेतू, ध्येय, शक्तिमाप (अर्ग) अशा पारिभाषिक संज्ञा निर्माण झाल्या. ‘प्रेरणा’ हा शब्द मात्र विशिष्ट प्रेरणा या अर्थाने आणि प्रेरणाविषयक समग्र अभ्यासक्षेत्राचा निर्देश करण्यासाठीही वापरला जातो. ‘मोटिव्हेशन’ आणि ‘मोटिव्ह’ यांना अनुक्रमे ‘प्रेरण’ आणि ‘प्रेरणा’ असे मराठी पर्याय वापरणे शक्य आहे. प्रेरण म्हणजे संपूर्ण प्रक्रियेची अमूर्त संकल्पना आणि प्रेरणा म्हणजे विशिष्ट प्रेरणा. या उपयोगात या दोन्ही संज्ञांत (१) आंतरिक स्थिती, (२) जाणीव व ध्येयवस्तूचा शोध तसेच तिच्या प्राप्तीसाठी प्रयत्न आणि (३) ध्येयवस्तूची प्राप्ती आणि उपयोग यांनी शांत होऊन ते वर्तन विराम पावणे, अशा संपूर्ण प्रक्रियांचा अंतर्भाव आहे.
प्रेरणांमधील प्रक्रियाचक्रात शारीरिक क्रियांचा अंतर्भाव होतो. त्यात मज्जासंस्थेतील जालिका बंध, अधोथॅलामस, परिसरीय तंत्रिका तंत्र, स्वायत्त तंत्रिका तंत्र हे विभाग कार्य करतात. या केंद्राच्या उद्दीपनाने विशिष्ट प्रेरणानुभव निर्माण होतो. केंद्रांना इजा झाल्यास त्यात विकृती निर्माण होतात. स्नायू, ग्रंथी यांच्यातील विद्युत् आणि जैवरासायनिक प्रक्रियाही व्यापक शरीरस्थितीच्या उपविभागीय प्रक्रिया होत. मेंदूतील केंद्रे, शरीरक्रियेनेच शरीरात निर्माण होणाऱ्या उणिवा आणि परिसरातून मिळणारे उद्दीपन या सर्वांचा परिपाक म्हणून हे प्रक्रियाचक्र सिद्ध होते.
एकोणिसाव्या शतकातील वैज्ञानिक विकासाचा मानसशास्त्रीय विचारावर परिणाम होणे अपरिहार्य होते. त्यापूर्वी धर्म, मोक्षसाधना, नीती आणि मूल्यविवेक यांच्या अनुषंगाने मानवी प्रेरणा आणि त्यांच्या उपशमासाठी केली जाणारी वा करावी लागणारी धडपड यांचे तत्त्वज्ञानपर निरूपण प्रचलित होते. ⇨चार्ल्स डार्विन (१८०९-८२) यांच्या सिद्धांताने जीवशास्त्रात जे विचारमंथन सुरू झाले, त्यात मानवाचा जीवसृष्टीशी असणारा ‘वांशिक’ संबंध अत्यंत स्पष्टपणे पुढे आला आणि ‘केवळ मानवी’ मानसशास्त्र निराधार वाटू लागले. इतर प्राण्यांच्या वर्तनाच्या जन्मखुणा मानवी वर्तनात असतात हे जाणवू लागले आणि तशा संशोधनालाही डार्विननेच प्रारंभ केला. चिंतन, निगामी तर्कशुद्धता आणि प्रत्यंतर किंवा तथ्यशोधन यांचे एकात्म कार्य वैज्ञानिक विचाराचा पाया घालते, हे लक्षात आल्यानंतर तसेच डार्विनच्या उत्क्रांतिवादाच्या संदर्भात प्रायोगिक मानसशास्त्राची उभारणी झाली. अंतर्निरीक्षणाची पद्धती वापरून माणसाच्या जाणिवेचे तसेच इच्छाशक्तीचे आशय शोधण्याचे प्रयत्न ⇨विल्यम जेम्स (१८४२-१९१०) आणि त्याचे शिष्य यांनी सुरू केले. ⇨व्हिल्हेल्म व्हुंट (१८३२-१९२०) व त्याचे प्रायोगिक मानसशास्त्रातील सहकारी ज्या पद्धतीने प्रायोगिक मानसशास्त्राची उभारणी करत होते, त्यात प्रेरणांचा विचार सुरू झालेला नव्हता. प्रायोगिक संशोधनाअभावी जेम्सचे लिखाण प्रामुख्याने अंतर्निरीक्षणावर अवलंबून राहिले. मानसिक अवस्थांचे सूक्ष्म भेद आणि त्यांचे तपशीलवार वर्णन हा त्याच्या लिखाणाचा विशेष म्हणता येईल. इच्छा, सहजप्रेरणा, सवय, मनोभाव, कल्पनाकृती (आयडिओ मोटर ॲक्शन) यांच्या जोडीची संकल्पना, ध्येयाप्रत जाण्याची धडपड हा बोधावस्थेचा विशेष, प्रतिक्रियेतून प्रवृत्त होणारे उद्दीपन, आल्हाददायक व तापदायक अनुभवांचा वर्तनाच्या नियंत्रणातील वाटा आणि या प्रत्येक स्थितीशी निगडित असणारी मज्जासंस्थेचीही एक अवस्था या सर्वांची मांडणी हे जेम्सच्या विचारात आलेले महत्त्वाचे विशेष होत. त्याच्यानंतर या संकल्पनांची पुन्हा मांडणी करण्यात आली परंतु केवळ अंतर्निरीक्षणाधिष्ठित पुराव्यांना प्रत्यंतराच्या अभावी किस्से किंवा चुटके असेच स्वरूप येते आणि ते रोचक वाटले, तरी त्यांच्या बळावर व्यवहारज्ञानाच्या फारसे पुढे पाऊल टाकता येत नाही. जेम्सच्या प्रेरणाविचारात सहजप्रेरणांनी घडणाऱ्या नियंत्रणाला जैविक पातळीवर स्थान आहे परंतु स्मृती व विचार यांच्यामुळे सहजप्रवृत्त वर्तन कायमच ‘आंधळे’ राहू शकत नाही, त्यात ‘ध्येयवस्तूच्या प्राप्तीसाठी’ हा उपयोगितेचा भाग येते. जेम्सच्या मते वस्तूंच्या वैशिष्ट्यांना तत्काळ मिळणाऱ्या प्रतिक्रिया या सहजप्रवृत्त होत. परंतु सहजप्रेरणांना ‘जाग’ आणणाऱ्या उद्दीपनालाही त्याच्या विचारात स्थान आहे. सवयी आणि त्यांचे कार्य जेम्सने वर्तनाच्या आकलनात महत्त्वाचे मानले आहे. सहजप्रवृत्त वर्तन आणि सवयीने अंगवळणी पडलेले वर्तन म्हणजे अनैच्छिक वर्तन. त्याचप्रमाणे ऐच्छिक वर्तनाचे मूलस्त्रोत, प्रेरणासंघर्ष, निर्णयप्रक्रिया, आवेग या सर्वांतून येणारी क्रिया यांचेही विश्लेषणही त्याने केले. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मन व मनाची बोधावस्था या दोन्ही संकल्पनांचा त्याग न करता डार्विनच्या तसेच इतर विज्ञानांच्या प्रभावाखाली मानसशास्त्रातील विचार कोणती दिशा आणि आकार घेऊ शकत होता, त्याचे हे उत्कृष्ट उदाहरण आहे.
विसाव्या शतकाच्या प्रारंभी मानसशास्त्रात एक अतिशय महत्त्वाचा आणि दूरगामी परिणाम करणारा विचार ⇨सिग्मंड फ्रॉइड (१८५६-१९३९) याने मांडला आणि त्याचा परिणाम मानसशास्त्रावरच नव्हे, तर सगळ्याच मानव्यविद्यांवर पडला. फ्रॉइडने माणसाच्या वर्तनाच्या छडा लावण्याची सर्वसामान्य समजूत मुळापासूनच बदलली आणि सर्वांनी खरी उत्तरे दिली आणि अंतर्निरीक्षण केले, की प्रेरणांचे स्वरूप स्पष्ट होईल, या प्राथमिक भाबडेपणाला धक्का दिला. मानवी प्रेरणा मुळातच संख्या, विविधता आणि समकालिकता यांच्यामुळे गुंतागुंतीच्या असतात. परंतु या गुंतागुंतीच्या पलीकडेही व्यक्तीला स्वतःलाच ठाऊक नसलेले मानसिक प्रेरणांचे प्रांत असतात आणि त्या अबोधातील ऊर्मींनी वर्तनावर जे परिणाम होतात, त्यामुळे मनुष्य स्वतःच स्वतःबद्दल गोंधळात पडतो. अशा प्रकारे अबोध पातळीवर असणाऱ्या प्रेरणा, व्यक्तीला स्वतःलाच चकवून वर्तनात वेगळ्याच गती निर्माण करतात. या प्रकारच्या अबोध प्रेरणांचे अस्तित्व मान्य केल्यामुळे विकोपाला गेलेल्या विकृतींपासून तो स्वप्ने, स्मृतिदोष, प्रमाद किंवा किरकोळ अपघातापर्यंतच्या अनेक वर्तनप्रकारांचा उलगडा होण्यास मदत होते, असे फ्रॉइडने दाखवून दिले. मानवी वर्तनात अकारण असे काहीही घडत नाही परंतु बोधमन आणि ⇨ अबोध मन यांच्यातील सुप्त आणि व्यक्त प्रेरणांमुळे काही वर्तन अकारणपणे होत आहे असे वाटते एवढेच. फ्रॉइडच्या मते सर्व वर्तन प्रेरितच असते. मानवी प्रेरणांचा एक गुंतागुंत निर्माण करणारा विशेष फ्रॉइडने सांगितला. त्याच्या मते प्रेरण द्विध्रुवात्मक असते. द्विध्रुवात्मकतेमुळे परस्परविरुद्ध भावना व प्रेरणा एकाच वेळी मनाची ओढाताण करतात. फ्रॉइडच्या प्रेरणासिद्धांतात जीवनप्रवृत्ती आणि मरणप्रवृत्ती असे आदिप्रेरणांचे दोन मुख्य वर्ग कल्पिलेले आहेत. फ्रॉइडचा कामप्रेरणेविषयीचा सिद्धांत म्हणजे त्याच्या वैज्ञानिक, चिकित्सक पार्श्वभूमीचे आणि समग्र चिंतनशीलतेचे सार आहे. त्याचा कामप्रेरणेचा सिद्धांत फक्त परिपक्व स्त्री-पुरुषांच्या समागमक्रियेशी सीमित झाला नाही त्याचे अधिक व्यापक, जीवनाभिमुख संकल्पन त्याने शारीरिक आणि मानसिक पातळ्यांवर केले. हे सर्व करत असताना स्वतःच्या भूमिकेविषयी फ्रॉइड कोणाही वैज्ञानिकाला साजेशी लवचिक आणि अनुभवनिष्ठ वृत्ती धारण करतो. फ्रॉइडचा प्रेरणा सिद्धांत सुटेपणाने विचारात घेता येण्याजोगा नाही. तो त्याच्या संपूर्ण विचारव्यूहाचाच एक भाग आहे. त्यामुळे व्यक्तिमत्त्वरचना, अबोध मन, विकृती आणि मानसोपचार या ⇨ मनोविश्लेषणवादाच्या इतर मूलभूत संकल्पनांच्या संदर्भांतच हे विचार लक्षात घेणे आवश्यक ठरेल.
प्रेरणाविषयक सिद्धांताचा वैज्ञानिक दृष्टिकोन स्पष्ट होण्यासाठी संकल्पनांचे तार्किक स्वरूप, अभ्यासपद्धतींचे तर्कशुद्ध आराखडे आणि प्रयोगातून मिळणाऱ्या निष्कर्षांचा अन्वय लावण्याचे सुसंगत मार्ग यांच्याबाबत फ्रॉइडनंतरच्या काळात विशेषच तीव्र गतीने विचारमंथन सुरू झाले. ⇨कुर्ट ल्यूइन (१८९०- १९४७) आणि ⇨ ई. एल्. थॉर्नडाइक (१८७४-१९४९) यांच्या नेतृत्वाखालील मापनाधिष्ठित ‘प्रायोगिक’ गट यांच्या विचारातून वर्तनघटनेची समग्रता आणि तिच्या विश्लेषित घटकांचे मापन व परिवर्तन या दोन प्रमुख प्रवाहांचा उगम झाला. मापनाने वैज्ञानिकतेचा फक्त एक आभास निर्माण होतो. मापनासाठी मूळ घटनेचे जे रूप प्रयोगात दाखल होते, ते निष्प्राण असते. संकल्पनात्मक स्पष्टता नसेल, तर नुसती प्रयोग आणि संख्याशास्त्रीय संस्करणांची क्लिष्टता वाढवून आकलनात भर पडणार नाही. व्यक्ती आणि परिसर यांच्यातील व्यवहाराच्या पार्श्वभूमीवर कुर्ट ल्यूइनने आपला सिद्धांत मांडला आणि वर्तनाचे गतिशास्त्र सिद्ध करण्यासाठी दिशायुक्त प्रेरणा, मानसिक विश्व, प्रभावक्षेत्र मानसिक शक्ती यांचा एक संकल्पनाव्यूह मांडला. थोडक्यात, व्यक्तीच्या जीवनेतिहासावर लक्ष केंद्रित करण्याची पद्धती सोडून देऊन व्यक्तिवर्तनाचे गतिशास्त्र मांडू शकणाऱ्या संकल्पनांच्या स्पष्टतेचा त्याने आग्रह धरला.
थॉर्नडाइकने प्रायोगिक पद्धतीवर आणि त्यातून प्राप्त होणाऱ्या निश्चित स्वरूपाच्या निष्कर्षांवर पहिल्यापासून आग्रहपूर्वक भर दिला. पाव्हलॉव्ह आणि वॉटसन यांच्या वस्तुनिष्ठ प्रायोगिक धारणांमधून वर्तनाचे निरीक्षण आणि मापन यांची संकल्पनात्मक धार पुष्कळ वाढली होती. जाणीव किंवा बोधावस्था एका अर्थी नाकारून किंवा वर्तनाच्या वैज्ञानिक आकलनासाठी अनावश्यक ठरवून प्राणिवर्तनाचा अभ्यास करणारा प्रवाह फ्रॉइडच्याच आगेमागे प्रभावी होत होता. वर्तनाचे स्पष्टीकरण शारीरिक प्रतिक्षेपात्मक आणि पूर्वानुभवाच्या समायोजक वैशिष्ट्यांच्या आधारे मिळवण्याचे प्रयत्न चालू होते. प्राण्यांवरील प्रयोग आणि अध्ययन ही केंद्रवर्ती प्रक्रिया मनुष्यवर्तनाच्या संदर्भात आवश्यक असणारी तत्त्वे देऊ शकतात, असा विश्वास निर्माण होत होता. जे प्राण्याबाबत आढळते, ते मूलतः मानवाबाबतही खरे आहे. जे प्रतिक्षेपांशी अभिसंधान झाल्याने घडते, तेच प्रतीकात्मक उच्चतर मानवी क्रियांमध्येही घडते जे प्रयोगशाळेतील अध्ययनात दिसते, तेच सामजिक अध्ययनात घडत असते, अशा प्रकारच्या अन्वय लावण्याच्या पद्धतींवरून मानसशास्त्रात एक प्रकारचा ‘किमान मानव’ संकल्पनात्मक पातळीवर घडवला जात होता. टोलमन, हल, स्पेन्स, आयर्सेक, कार्टराइट, फेस्टींजर, स्कीनर इ. वैज्ञानिक आपापली पद्धती एकीकडे सुधारत होते मानवी पातळीवरील गुंतागुंत हाताळू शकेल, एवढी कार्यक्षमता आपल्या पद्धतीत आणण्याचा प्रयत्न करत होते. या सर्वांना या ना त्या स्वरूपात आपण काही महत्त्वाचे प्रश्न हाताळू शकत नाही, याची जाणीव होती परंतु त्या प्रश्नांचे महत्त्व मान्य करूनही त्यांना वैज्ञानिक विचारांची बैठक मोडून ‘अव्याख्येय’, ‘अवर्णनीय’ अशा संकल्पनांना आपल्या संशोधनात प्रवेश द्यावयाचा नव्हता. त्यामुळे सी. एल्. हलचा गणिती सूत्राची मांडणी करण्याचा प्रयत्न एकीकडे, तर आर्. बी. कॅटेलचा शक्तिमाप मिळवण्याचा प्रयत्न दुसरीकडे, असे अनेक संकल्पनात्मक प्रयत्न हळूहळू पण निश्चितपणे वर्तनाचे आकलन वास्तवाच्या जवळ नेत होते, असे दिसते.
या प्रायोगिक वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाने अमेरिकन विचारवंतांमध्ये आपले मूळ घट्ट केले. त्यामध्ये फारफार तर मध्यस्थ परिवर्तक अशी जागा, प्रेरणांना मिळू शकत होती. अन्यथा प्रतिक्षेप आणि अभिसंधान यांच्यावर सर्व भिस्त होती. त्यामानाने यूरोपातील विचारात ‘गेस्टाल्ट’वादी म्हणजे व्यूहवाही भूमिकेचे प्राबल्य होते. [⟶ व्यूह मानसशास्त्र]. मानवी वर्तनाचे खरे आकलन अशा ‘घटक’वादी वा अणुवादी विचाराने होणार नाही त्यासाठी संपूर्ण मानवच संकल्पनेमध्ये दाखल झाला पाहिजे, अशी ल्यूइनच्या वारसदारांची मुख्य भूमिका होती.
मानवी प्रेरणांना एकदा नव्याने जागा करून दिली ती ए. एच्. मॅस्लोने. त्याने वर्तनाचे ‘साधक’ (एन्स्ट्रुमेंटल) रूप व ‘आविष्कारशील’ (एक्स्प्रेसिव्ह) रूप असे भेद पाडले. मानव जसा जैविक हेतूसाठी साधक वर्तन करतो, त्याचप्रमाणे साक्षात जैविक हेतू नसताना आत्मोन्नतीसाठीही झटतो, खेळासाठी खेळतो, सर्वसामान्य व्यावहारिक जीवनापेक्षा उच्च पातळीवरचे अनुभव घेतो व संपन्न व्यक्तिमत्त्व मिळवतो. या प्रकारे वर्तनाच्याच पातळीवर मानवी ‘खास’पणाला जागा दिल्यानंतर प्रेरणांच्या सिद्धांतात त्याने जैविक भरणपोषणात्मक प्रेरणांपासून सोपानपरंपरेने आत्माविष्कार, स्वत्वसंपन्नता या प्रेरणांपर्यंत एक प्रकारे श्रेणीची कल्पना मांडली. येथपर्यंत इतर मानव्यक्षेत्रांमधील संशोधनही मानसशास्त्रीय विचारावर प्रभाव पाडू लागले होते आणि संस्कृतिसापेक्षतेचे तत्त्व स्पष्ट होऊ लागले होते. त्यामुळे आज ऐकांतिक ऐतिहासिक भूमिकांपेक्षा समन्वयवादी विचार जोर धरू लागला आहे आणि येथवर जे विचार मांडले गेले, त्यांना त्यांच्या तथ्यांशानुसार स्थान देऊन वादग्रस्त विषयांचे पुनर्परीक्षण सुरू झालेले आहे.
प्रेरणांचे वर्गीकरण : एकूण प्रेरणा किती? त्या कोणत्या? या प्रश्नांना सर्वांनी जरी सारखे महत्त्व दिलेले नसले, तरी प्रेरणांच्या उगमस्थानानुसार, महत्त्वानुसार आणि आवश्यक पूर्ववर्ती घटनांनुसार अनेक वर्गीकरणे सुचविली गेली आहेत. उगमस्थानानुसार केलेल्या वर्गीकरणात प्रेरणांची व्यवस्था (१) शरीरजन्य, (२) समाजजन्य व (३) मानसजन्य अशा तीन वर्गांत केली जाते. महत्त्वानुसार (१) संपादित व (२) अनभ्यस्त अशी वर्गवारी केली जाते.
शरीरजन्य प्रेरणा : शरीराची नैसर्गिक सुस्थिती टिकण्यासाठी ज्या प्रेरणा कार्य करतात, त्यांचा या वर्गांत समावेश होतो. अन्न, पाणी, हवा, विश्रांती, क्रियाशीलता, कामप्रेरणा या शरीरजन्य म्हणजे शरीररचनेच्या नैसर्गिक वैशिष्ट्यांमधून उगम पावणाऱ्या प्रेरणा होत. त्यांच्या आरंभी शारीरिक स्थितीमुळेच उत्पन्न होणाऱ्या रासायनिक व प्रतिक्षेपात्मक प्रक्रियांची रचना असते. ती कार्यान्वित होणे, ती ती गरज जाणवणे, त्यातून ध्येयवस्तूचा शोध सुरू होणे आणि ती प्राप्त झाल्यावर दुसऱ्या प्रक्रियाचक्राचा आरंभ होऊन समाधानाची जाणीव होणे, असा घटनाक्रम आढळतो. शरीराच्या जैवरासायनिक समतोलापासून दूर जाणे आणि परत त्या समतोलाच्या स्थितीप्रत येणे, असे हे चक्र असते. प्राण्याच्या शरीररचनेनुसार, ध्येयवस्तूच्या उपलब्धतेनुसार आणि अन्य परिस्थितिघटकांनुसार या प्रेरणांचे वळण ठरत जाते. ते वळण समग्र समायोजनाचा भाग असते.
समाजजन्य प्रेरणा : मानवी व्यक्तीला स्वतंत्र जीव म्हणून जिवंत राहण्यासाठी संगोपनाची अपेक्षा असते. त्यामुळे मूलभूत सामाजिकता हा एक जैविक गरजेचाच भाग आहे. अर्भकाला असलेली प्रौढाची गरज आणि त्याचा दीर्घ संगोपनकाल यांच्यामुळे सामाजिक समूहाचा सदस्य या नात्याचा संदर्भ अनेक प्रकारच्या वर्तनप्रेरणा निर्माण करतो. सहवास आणि संपर्क साध्य करणाऱ्या काही प्रेरणा आणि तौलनिक दृष्टीने वर्चस्व देणाऱ्या प्रतिष्ठाविषयक प्रेरणा ही सामाजिक प्रेरणांची दोन प्रमुख केंद्रे आहेत.
मानसजन्य प्रेरणा : प्रत्येक व्यक्ती अद्वितीय असते. ‘एका छापाचे दोन’ असे म्हणण्यासारखे साम्य एकांड जुळ्यांमध्येही नसते. या विशिष्ट रचनेमुळे व्यक्तीचे अग्रक्रम, स्वतःच्या भावनिक स्वरूपाच्या आणि स्वत्त्वाशी निगडित असणाऱ्या प्रश्नांमुळे काही प्रेरणा निर्माण होतात. यांमध्ये विशेष क्षमता, भावनिकता, आत्माविष्कार यांसारख्या प्रेरणांचा समावेश होतो.
वर्गीकरणाचे हे स्वरूप काहीसे ढोबळ आणि सैल आहे. ते प्रामुख्याने मानवी वर्तनाची समावेशकता अंगीकारू शकणारे आहे. हे वर्गीकरण केल्यानंतरही प्रेरणांचे विशिष्ट व्यक्त रूप एकाहून अधिक वर्ग व्यापते, असे लक्षात येईल. भूक ही प्रेरणा व अन्न ही ध्येयवस्तू पण सरळ प्राणी उठला आणि खाऊ लागला असे होत नाही. त्यासाठी वेगवेगळ्या मध्यस्थ प्रक्रिया घडाव्या लागतात. त्या कोणत्या आणि किती, हे त्या त्या प्राणिजाती आणि त्यांचा परिसर यांतून ठरत असते.
प्रेरणासंघर्ष आणि निरास : ज्या ज्या वेळी वर्तनाला अनेक शक्यता असतात, पर्याय उपलब्ध असतात, त्यावेळी प्रेरणेच्या तीव्रतेनुसार किंवा शक्तीच्या प्रमाणात निवड केली जाते. परंतु एकाच वेळी एकाहून अधिक प्रेरणांचा वर्तनाला दिशा देण्याचा प्रयत्न सुरू झाला, तर प्रत्यक्ष वर्तनात मात्र एका वेळी एकच प्रतिक्रिया असू शकते. अशा वेळी एकच ध्येयवस्तू अशी निवडली जाते, की तिच्याद्वारे एकाहून अधिक प्रेरणांचा उपशम होऊ शकेल. अर्थात हे नेहमीच शक्य होते असे नाही. परंतु एकच वर्तन वेगवेगळ्या व्यक्ती वेगवेगळ्या प्रेरणांमुळे करतात किंवा एका व्यक्तीची एखादी कृती अनेक प्रेरणांमधून उद्भवलेली असू शकते, ही गोष्ट या तत्त्वात अंतर्भूत आहे. ज्यावेळी प्रेरणांचे अग्रक्रम स्पष्ट असतात, तेव्हा श्रेणीतील खालच्या प्रेरणांचे समाधान लांबणीवर टाकले जाते. परंतु या दोन्ही गोष्टी नेहमी शक्य होतील, असे नाही. त्यामुळे नेमकी कोणती निवड करावी, याबाबत अंतर्गत प्रेरणासंघर्ष व्यक्तीच्या प्रत्ययास येतो. या संघर्षाचे प्रकार तात्त्विक पातळीवर स्पष्ट करून प्रयोगशाळेत त्यांचा अभ्यासही करण्यात आलेला आहे.
संघर्षाचा अनुभव केव्हा येतो याचीच ही उत्तरे आहेत : (१) ज्यावेळी दोन ध्येयवस्तू नकोशा असतात, परंतु त्यांपैकी एका दिशेने जाणे अपरिहार्य असते, त्यावेळी ‘दुहेरी अपगमन संघर्ष’ निर्माण होतो. (२) ज्यावेळी एका हव्याशा वस्तूसाठी नकोशी गोष्ट पदरात येत असते, त्यावेळी ‘प्रतिगमन-अपगमन संघर्ष’ निर्माण होतो. (३) ज्यावेळी एखादी ध्येयवस्तू एकाच वेळी आकर्षक आणि नकोशी वाटते, तो ‘दुहेरी प्रतिगमन-अपगमन संघर्ष’ होय. हा संघर्ष सर्वांत तीव्र असतो.
या संघर्षातून मार्ग काढताना व्यक्तीच्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होतो तथापि प्रत्येक व्यक्ती समायोजनाचा विशिष्ट घाट निर्माण करते व संघर्षाचे निरास करण्याचे मार्गही त्या त्या साच्यात बसण्याजोगे निर्माण झालेले असतात.
उपयोजन : प्रेरणांचे स्वरूप आणि त्यातून कळणारे वर्तनाचे गतिशास्त्र यांचा अभ्यास उपयोजनाच्या दृष्टीनेही झालेला आहे. सामाजिक परिवर्तनाचा एक कारक घटक म्हणून व्यक्तींच्या प्रेरणांच्या घडणीत बदल घडवणारे कार्यक्रम, प्रशिक्षणतंत्रे आणि पद्धती हा अलीकडच्या काळात नव्याने निर्माण झालेला एक विषय आहे. मानवी व्यक्तीचे व्यक्तिगत व्यावसायिक यश, नवनिर्मितीची शक्ती, सामाजिक यथादर्शाच्या निर्मितीसाठी प्रेरणांमध्येच निर्मिलेली विशिष्ट दिशा या हेतूंसाठी मानसशास्त्राचे ज्ञान वापरले जात आहे. या संदर्भात डी.सी. मक्लेलंड यांचा ‘सिद्धिप्रेरणेचा सिद्धांत’ व सिद्धिप्रेरणेच्या वाढीसाठी केलेला प्रशिक्षण कार्यक्रम यांचा उल्लेख महत्त्वाचा आहे. त्यामध्ये व्यक्तीला जाणवणारा व माहीत असणारा प्रेरणाप्रांत व्यापक करण्यावर आणि आपल्यात बदल घडविण्याची दिशा स्पष्ट करण्यावर भर असतो. व्यावसायिक आणि संस्थात्मक संदर्भात प्रेरणाप्रशिक्षणाचा प्रश्न आज अतिशय महत्त्वाचा झालेला आहे.
एकीकडे सर्वसामान्य तत्त्वांचा शोध आणि दुसरीकडे व्यक्तिभेदांचा अन्वय यांतून समावेशक स्वरूपाचे सिद्धांतन भावी काळात करावे लागणार आहे. बदलती परिस्थिती, स्थिर व्यक्तिमत्त्व आणि त्यात सावकाश घडणाऱ्या बदलाच्या प्रक्रिया या दोन्ही बाजूंना संकल्पनात्मक एकात्मता देणे, ही प्रेरणेच्या क्षेत्रातील अभ्यासाची भावी दिशा होय.
संदर्भ: 1. Atkinson, J. W. An Introduction to Motivation, Princeton, N. J., 1964.
2. Atkinson, J. W. Ed., Motives in Fantasy, Action and Society, Princeton, N. J. 1958.
3. Atkinson, J. W. Feather, N. T. Ed. The Theory of Achievement Motivation, New York, 1966.
4. Bindra, Dalbir, Motivation : A Systematic Reinterpretation, New York, 1959.
5. Bolles, R. C. Theory of Motivation, New York, 1967.
6. Brown, J. S. The Motivation of Behaviour, New York, 1961.
7. Haber, R. N. Ed. Current Research in Motivation, London, 1966.
8. Hunt, J. M. Motivation and Social Interaction, New York, 1963.
9. Jones, M. R. Ed. Nebraska Symposium on Motivation, Lincoln, 1956-62.
10. McClelland, D. C. and others, The Achievement Motive, New York, 1953.
11. Murray, E. J. Motivation and Emotion, Englewood Cliffs, N. J., 1964.
12. Peters, R. S. The Concept of Motivation, London, 1960.
13. Troland, L. T. The Fundamentals of Human Motivation, New York, 1928.
वनारसे, श्यामला
“