प्रेन, सर डेव्हिड : (१८५७-१९४४). ब्रिटिश वनस्पतिशास्त्रज्ञ. भारत व मलाया येथील ⇨ पादपजातींचा अभ्यास हा त्यांच्या संशोधनाचा महत्त्वाचा विषय होता. एडिंबरो व अबर्डीन विद्यापीठांतून मानवी वैद्यक शास्त्राचे शिक्षण घेतल्यावर १८८४ मध्ये भारतातील सरकारी सनदी वैद्यक-सेवा-खात्यात त्यांची नेमणूक झाली. १८८७ मध्ये सर जॉर्ज किंग यांच्या देखरेखीखाली असलेल्या कलकत्ता येथील ⇨ शास्त्रीय उद्यानात ⇨वनस्पतिसंग्रहाचे प्रमुख व ग्रंथपाल म्हणून त्यांची नेमणूक झाली, तेथेच १८९८ मध्ये किंग यांच्यानंतर त्यांनी उद्यान-संचालक आणि त्याच्यानंतर ⇨ भारतीय वनस्पति वैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेचे (बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे) संचालक म्हणून कार्य केले. १९०३ मध्ये सर फ्रॅन्सिस यंगहजबंड यांच्याबरोबर त्यांनी तिबेटची सफर केली. भारत व मलाया येथील पादपजातींविषयीच्या ज्ञानात त्यांनी महत्त्वाची भर टाकली आहे. १९०५ पासून १९२२ पर्यंत ते सर विल्यम थिसल्टनडायर यांच्यानंतर क्यू (लंडन) येथील सुप्रसिद्ध शाही शास्त्रीय उद्यानाचे संचालक होते. तेथे असताना त्यांनी डब्ल्यू. जे. हूकर यांनी १८३७ मध्ये स्थापन केलेल्या Icones Plantarum या नियतकालिकाचे तसेच कर्टिसेस बोटॅनिकल मॅगझिनचे संपादक केले. शिवाय आर्थिक समस्या सोडविण्याच्या दृष्टीने शाही उद्यानातील कार्याचा विस्तारही त्यांनी केला.
जमदाडे, ज. वि.