प्रॉव्हांसाल साहित्य : प्रॉव्हांसाल ही भाषा अकराव्या शतकाच्या अखेरीअखेरीस दक्षिण फ्रान्समध्ये एक साहित्यभाषा म्हणून प्रचलित झाली आणि तिच्यातील साहित्यनिर्मिती कमीअधिक प्रमाणात विसाव्या शतकापर्यंत चालू राहिली आहे. अकरावे ते पंधरावे शतक हा प्रॉव्हांसाल साहित्येतिहासातील पहिला कालखंड सोळावे ते अठरावे शतक हा दुसरा आणि एकोणिसावे व विसावे शतक हा तिसरा.
अकरावे ते पंधरावे शतक : ह्या पहिल्या कालखंडात प्रॉव्हांसाल भाषेतील साहित्यनिर्मितीत ठळकपणे भरते ती ⇨ त्रूबदूरांची कामगिरी. त्रूबदूर हे भावकवी, स्त्रीपूजेचा एक वेगळाच आविष्कार त्यांनी आपल्या गीतरचनेतून घडविला. स्त्री ही स्वामिनी आणि प्रेमिक हा तिचा निष्ठावंत सेवेकरी अशा भूमिकेतून हा आविष्कार झालेला आहे. स्त्रीच्या आदर्शीकरणाची ही जी प्रवृत्ती त्रूबदूरांच्या कवितेतून प्रत्ययास येते, तिची चाहूल आक्विटेनचा ड्यूक नववा गीयोम (१०७१-११२७) ह्यांच्या कवितेतून लागते. इंद्रियभोग्य किंवा वैषयिक प्रेमाच्या पारंपारिक कल्पनेचा अव्हेर करून प्लॅटॉनिक किंवा आध्यात्मिक पातळीवरील प्रेमाची प्रवृत्ती गीयोमने पुरस्कारिली होती. नववा गीयोम हा आपणास ज्ञात असलेला पहिला त्रूबदूर होय. त्याच्या एकूण अकरा रचना आज उपलब्ध आहेत. त्यांचे परिपक्व, कलात्मक रूप लक्षात घेता, त्यांच्या मागे गीतरचनेची विकासक्षम अशी परंपरा असली पाहिजे, असे अनुमान करता येते तथापि ह्या परंपरेचा स्पष्ट आलेख अभ्यासकांना अद्याप उपलब्ध झालेला नाही त्यामुळे ह्या काव्यबहराचा उगम कशात असावा, ह्यासंबंधी अभ्यासकांत मतभेद आहेत. लोकगीते, चर्चमध्ये गाइली जाणारी सूक्ते (चर्च हिम्स), अरबी कवितेचा प्रभाव, मध्ययुगीन लॅटिन कवितेचे संस्कार ह्यांतून किंवा ह्यांपैकी काहींच्या प्रभावांतून ही परंपरा उभी राहिली असावी, असे सामान्यतः मानले जाते. बेर्नार द व्हांतादूर, गीरो द बॉर्नेय, बेर्त्रा द बॉर्न हे काही प्रसिद्ध त्रूबदूर होत. फ्रेंच भाषेत ⇨शासाँ द जॅस्त ह्या नावाने ओळखला जाणारा एक वीरकाव्यप्रकार आहे. तोही प्रॉव्हांसाल कवींनी हाताळला. प्रॉव्हांसाल वीरकाव्यांपैकी दोन विशेष उल्लेखनीय आहेत : पहिले जिरार द रुसियाँ हे दहा हजार ओळींचे एक काव्य असून त्यात शार्ल मार्टेल आणि त्याचा मांडलिक (व्हासल) रुसियाँचा जेरार ह्यांच्यातील संघर्ष प्रभावीपणे रंगविलेला आहे. दुसरे काव्य आल्बिजेन्शियनांविरुद्ध लढल्या गेलेल्या धर्मयुद्धावर (क्रूसेड) आधारलेले असून त्याचे दोन भाग आहेत आणि ते दोन वेगवेगळ्या व्यक्तींनी लिहिलेले आहेत. गीयोम द तूदेला हा पहिल्या भागाचा कर्ता होय. तो धर्मयुद्धाचा पुरस्कर्ता दिसतो. दुसरा भाग धर्मयुद्धाच्या कोणा कट्टर विरोधकाने लिहिलेला दिसतो. विचारांच्याच नव्हे, तर शैलीच्या दृष्टीनेही ह्या दोन भागांत लक्षणीय अंतर आहे. प्रॉव्हांसाल भाषेतील उत्कृष्ट काव्यशैलीचा नमुना म्हणून दुसऱ्या भागाचा निर्देश करता येईल. विख्यात रोमन तत्त्वज्ञ बोईथिअस ह्याचा ‘कॉन्सलेशन ऑफ फिलॉसफी’ (इं. शी.) हा ग्रंथ प्रॉव्हांसाल भाषेत आणण्याचा प्रयत्न झाला होता, हे त्या रूपांतराच्या त्रुटित स्वरूपात आढळणाऱ्या एका हस्तलिखितावरून दिसून येते. हे हस्तलिखित अकराव्या शतकातले दिसते. लिखित प्रॉव्हांसाल भाषेचे जे प्राचीन नमुने आढळतात, त्यांत ह्या अनुवादाचा अंतर्भाव होतो. संत फिडेस, संत एनिमिआ आणि संत ऑनॉरा ह्यांसारख्या काही संतांची पद्यमय चरित्रेही लिहिली गेली आहेत. प्रॉव्हांसालमधील रहस्य नाटकांची (मिस्टरी प्लेज) आणि अद्भुत नाटकांची (मिरॅकल प्लेज) निर्मिती मुख्यतः पंधराव्या-सोळाव्या शतकांत झाली तथापि ह्या प्रकारांतल्या काही नाट्यकृती तेराव्या-चौदाव्या शतकांतही आढळतात. ह्या भाषेत लिहिले गेलेले ती रोमान्स आज उपलब्ध आहेत. नॉव्हास दाल पापागाय ह्या कथाकाव्यात, आपल्या मालकाच्या प्रेमप्रकरणांत साहाय्य करणाऱ्या एका बोलक्या पोपटाचे वर्णन आले आहे. हा पोपटच त्या कादंबरीतील प्रमुख पात्र होय.
ह्या कालखंडातील गद्यकृतींत, तेराव्या शतकात लिहिल्या गेलेल्या त्रूबदूरांच्या काही चरित्रांचा समावेश होतो. संबंधित त्रूबदूरांच्या काव्यरचना समजावून सांगण्याचा प्रयत्नही ह्या चरित्रांतून झालेला आहे. काव्य, अलंकारशास्त्र आणि व्याकरण ह्यांना वाहिलेला लेइस दामॉर्स (सु. १३५०, इं. शी. द लॉज ऑफ लव्ह) हा ह्या कालखंडातील महत्त्वाचा गद्यग्रंथ होय. प्रेम ही एक कला आहे काव्यकलेप्रमाणेच ह्या कलेवरही काही नियमांचे नियंत्रण असते किंबहुना कविता व प्रेम ही एकजीव आणि एकात्मच होत, अशा भूमिकेतून सदर ग्रंथाला ‘द लॉज ऑफ लव्ह’ हे शीर्षक देण्यात आले आहे.
इ. स. १२०९ मध्ये झालेल्या आल्बिजेन्शियन धर्मयुद्धापासूनच दक्षिणेकडील स्वतंत्र फ्रेंच राज्यांची सत्ता संपुष्टात येण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. ह्या प्रक्रियेमुळे त्रूबदूरांना ह्या राज्यांकडून मिळणारा स्वागतशील आश्रयही कमी होत गेला. ह्याचा परिणाम प्रॉव्हांसाल साहित्यावरही झाल्यावाचून राहिला नाही. फ्रेंच सत्ता, संस्कृती आणि भाषा ह्यांच्या प्रभावामुळेही प्रॉव्हांसाल साहित्याची कोंडी झाली. तथापि ह्या भाषेतील साहित्यनिर्मिती पूर्णतः थांबली, असे म्हणता येणार नाही. दरबारी साहित्यिकांच्या वर्तुळातून बाहेर पडून ही भाषा जनसामान्यांच्या हाती गेली. त्यानंतरच्या प्रॉव्हांसाल साहित्याची गुणवत्ता मात्र उणावल्याचे दिसते. १३२३ किंवा १३२४ मध्ये द. फ्रान्समधील तूलूझ येथे प्रॉव्हांसाल कवींना उत्तेजन देण्यासाठी एक अकादमी स्थापन करण्यात आली. ह्या अकादमीतर्फे प्रॉव्हांसालमधील काव्यरचनेसाठी पारितोषिकेही देण्यात येऊ लागली.
सोळावे ते अठरावे शतक : सोळाव्या शतकात प्रॉव्हांसाल साहित्यात प्रबोधनाच्या खुणा दिसून येऊ लागल्या. ह्या प्रबोधनाचे नेतृत्व पी द गारॉस (सु. १५००-८१) ह्याच्याकडे होते तथापि तेव्हा प्रॉव्हांसाल भाषेच्या प्रदेशावर बोली तयार झालेल्या होत्या. गारॉस हा गस्कन. त्याने त्याच्या बोलीत डेव्हिडची सामरचना (साम्स ऑफ डेव्हिड) अनुवादिली आणि तिच्या वाड़्मयीन अभिव्यक्तिक्षमतेचा प्रत्यय दिला. प्रॉव्हांसालमधून तयार झालेल्या आपापल्या प्रादेशिक बोलींत लेखन करण्याची ही चळवळ ज्यांनी पुढे नेली त्यांच्यात रॅबस्टन्स व्हीलराइट, ओझ्ये गायार, लूई बेल्लो द ला बेल्लोदियॅर अशा साहित्यिकांचा समावेश होतो. तूलूझचा प्येअर गुदलँ (१५७९-१६४९) हा चतुरस्त्र साहित्यिक होता. त्याने मास्क, उद्देशिका, गीते, सुनीते अशी विविध प्रकारची रचना केली. त्याच्या वेचक कवितांचे अनुवाद विविध यूरोपीय भाषांत झालेले आहेत. सतराव्या शतकात फ्रांस्वा द कार्तेत (१५७१-१६५५) ह्यानेही एक श्रेष्ठ साहित्यिक म्हणून लौकिक मिळवला. त्याच्या रामुनॅ आणि मिरामुन्दो ह्या दोन सुखात्मिका आजही आवडीने वाचल्या जातात. अठराव्या शतकात कवितेबरोबरच नाटके, वीरकाव्य विडंबिका (मॉक-हिरॉइक पोएम), सुखात्मिका असे बरेचसे लेखन झालेले असले, तरी गुणवत्तेच्या दृष्टीने उल्लेखनीय अशा साहित्यकृती फारशा आढळत नाहीत.
एकोणिसावे व विसावे शतक : प्रॉव्हांसाल भाषा-साहित्याचे पुनरुज्जीवन एका नव्या उमेदीने करण्याचा प्रयत्न एकोणिसाव्या शतकात झाला आणि त्याचे नेतृत्त्व ⇨फ्रेदेरीक मीस्त्राल (१८३०-१९१४) ह्या कवीने केले. मीस्त्राल हा झोझेप रूमानीय (१८१८-९१) ह्या प्रॉव्हांसाल भाषेत रचना करणाऱ्या फ्रेंच कवीच्या प्रभावातून प्रॉव्हांसाल काव्यरचनेकडे वळला. १८५४ मध्ये आपल्या काही मित्रांच्या सहकार्याने, प्रॉव्हांसाल संस्कृतीच्या आणि मुख्यतः प्रॉव्हांसाल भाषेच्या पुनरुज्जीवनार्थ त्याने ‘फेलिब्रिज’ नावाची एक संघटना स्थापन केली. त्रूबदूरांनी संपन्न केलेल्या ह्या भाषेला तिचे प्राचीन वैभव पुन्हा प्राप्त करून देण्याचा त्याचा प्रयत्न जरी यशस्वी झाला नाही, तरी ह्या ध्येयपूर्तीच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून त्याने रचिलेल्या कवितांना मात्र प्रॉव्हांसाल साहित्यसंचितात मोलाची भर घातली. १९०४ मध्ये त्याला साहित्याचे नोबेल पारितोषिक देण्यात आले. त्याच्या मिरेय्यो ह्या महाकाव्यास आंतरराष्ट्रीय लोकप्रियता प्राप्त झाली. सर्व यूरोपीय भाषांत ह्या महाकाव्याचे अनुवाद झालेले आहेत. मीस्त्रालला प्रेरणा देणारा रूमानीय ह्यानेही प्रॉव्हांसाल साहित्याचे पुनरुज्जीवन करण्याच्या संदर्भात मोलाची कामगिरी बजावलेली आहे. फेलिब्रिजच्या संस्थापकांपैकी आणि नेत्यांपैकी तो एक होताच. फेलिब्रिज स्थापन होण्यापूर्वीच, १८५२ मध्ये, त्याने ली प्रोव्हांसालु हा आधुनिक प्रॉव्हांसाल कवींच्या रचनांचा एक संग्रह प्रसिद्ध केला होता. प्रॉव्हांसाल भाषेचे शुद्धलेखन कसे करावे, ह्याबाबतचे काही नियम बांधून देण्याचा पहिला प्रयत्न त्यानेच केला. त्याची स्वतःची कविता भावोत्कट असून त्याने गद्यलेखनही केलेले आहे. प्रसन्न विनोद हे त्याच्या लेखनाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य होय. झाक झास्मँ (१७९८-१८६४) हे आधुनिक प्रॉव्हांसाल कवितेच्या संदर्भातील एक विशेष उल्लेखनीय नाव होय. गरीबांच्या साध्यासुध्या जीवनांची भावोत्कट चित्रे त्याने आपल्या कवितेतून रंगविली. प्रॉव्हांसाल साहित्याच्या पुनरुज्जीवनाची जी चळवळ झाली, तिचा प्रभाव काही आधुनिक फ्रेंच साहित्यिकांवर पडलेला दिसतो.
कुलकर्णी, अ. र.