प्रार्थना : मानवाने ईश्वराला वा अन्य एखाद्या शक्तीला वा शक्तींना उद्देशून धार्मिक श्रद्धेने केलेले निःशब्द वा शब्दबद्ध असे स्तवन, उपकारस्मरण, आत्मनिवेदन, पश्चात्तापाची अभिव्यक्ती वा याचना म्हणजे प्रार्थना. प्रार्थना हा पूजेचाच एक प्रकार वा भाग होय. प्रार्थना धर्माचे अत्यंत महत्त्वाचे अंग आहे. प्रार्थना ही आदिम व प्रगत अशा बहुतेक सर्व समाजांतून व काळांतून आढळते. ‘प्रार्थना’ हा शब्द ‘प्र+अर्थ्‌’ (प्रकर्षाने याचना करणे) या सोपसर्ग धातूपासून बनला आहे. प्रार्थनेचे कर्मकांड गुंतागुंतीचे नाही. ती सहजसाध्य असूनही अत्यंत प्रभावी आहे, हे तिचे एक अत्यंत महत्त्वाचे वैशिष्ट्य होय. परंतु प्रत्येक कर्मकांडाचा प्रार्थना हा एक घटक असतो. प्रार्थना भावनोत्कट व उत्स्फूर्त असते परंतु काळाच्या ओघात तिला साचेबंदपणा, कृत्रिमता व आलंकारिकताही येते कित्येक प्रार्थना ह्या सुंदर, भव्य व काव्यमयही असतात.

आपण दुबळे आहोत आणि आपल्यापेक्षा कोणीतरी श्रेष्ठ असून आपले इष्ट साध्य करण्यासाठी आपण त्याच्यावर अवलंबून आहोत, या जाणिवेतून प्रार्थना निर्माण होते. विशेषतः संकटकाली प्रार्थना करण्याची प्रवृत्ती वाढते. कॉस्ता गीमारेईन्स या फ्रेंच मानसशास्त्रज्ञाच्या मते प्रार्थना ही एक जैविक गरज आहे परंतु हे मत मान्य झालेले नाही. विल्यम जेम्स, जोसेफ सीगोंद इत्यादींच्या मते प्रार्थनेत उपबोधाचा (सब्‌कॉन्शस) उद्रेक होत असतो. समाजशास्त्रज्ञांच्या मते प्रार्थनेचे स्वरूप सामाजिक परिस्थितीनुसार ठरत असते.

जादूटोणा व प्रार्थना यांत तत्त्वतः फरक आहे. जादूटोण्याद्वारे देवतेवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जातो आणि तिला एखादे कृत्य करावयास भाग पाडले जाते. याउलट, प्रार्थनेद्वारे देवतेला आवाहन करून तिला विनवले जाते. परंतु प्रार्थना ही प्रारंभी जादूटोण्याच्या स्वरूपातच होती, असे एक मत आहे. अशा यात्वात्मक प्रार्थनेत बिनचूक उच्चारांशिवाय फळ मिळत नाही, असे मानले जाते. आपल्या शत्रूंनी आपल्या देवतांची प्रार्थना करून त्यांना वश करू नये, म्हणून रोमन लोक प्रार्थनेत आपल्या देवतांची नावे गुप्त ठेवत असत. यावरून त्यांच्या प्रार्थना यात्वात्मक असल्याचे दिसते. जादूटोण्यातूनच प्रार्थनेची निर्मिती झाली आहे आणि जादूटोणा व प्रार्थना यांची निर्मिती स्वतंत्रपणे झाली आहे, अशी परस्परभिन्न मते आढळतात. काही वेळा प्रार्थना व ⇨जादूटोणा यांचे मिश्रण झालेले असल्यामुळे दोहोंचे वेगळेपण दाखविणे अवघड बनते.

सामान्यतः, प्रार्थना या शब्दबद्ध असतात आणि उच्चरवात म्हणतात परंतु काही वेळा मनाची एकाग्रता साधून व मौन धारण करूनही प्रार्थना केल्या जातात. अशा निशःब्द प्रार्थना अधिक प्रभावी असल्याचे मानतात कारण प्रार्थना ही हृदयाची हाक होय, असे म्हणतात. अशा प्रार्थनेत मानवी आत्मा ईश्वराशी तादात्म्य पावतो, अशी गूढ कल्पनाही आढळते. अनेकदा, धर्मशास्त्रांचे पठण करणे, हेच प्रार्थनेचे स्वरूप असते. प्रार्थनेत ढोंग नसावे आणि शब्दापेक्षा भावनेला व श्रद्धेला अधिक महत्त्व असावे, हे सर्व धर्मांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

देवतेला पिता, माता, प्रभू इ. शब्दांनी संबोधून व तिच्या नावाने आवाहन करून प्रार्थनेस प्रारंभ केला जातो. प्रार्थना या शब्दाचा अर्थच याचना असा असल्यामुळे प्रार्थनेत आरोग्यादी भौतिक पदार्थांच्या याचनेस महत्त्व असते. परंतु धर्म जसजसा उत्पन्न होत जातो, तसतशी भौतिक पदार्थांची याचना कमी होत जाते आणि प्रार्थनेचे नैतिक व आध्यात्मिक मूल्य वाढत जाते. देवतेने आपली इच्छा पूर्ण केली, म्हणून तिचे आभार मानण्यासाठीही प्रार्थना केली जाते. ईश्वराने मानवजातीला ख्रिस्ताची भेट दिली, म्हणून ख्रिस्ती लोक ईश्वराचे आभार मानतात. त्यांच्या ⇨युखॅरिस्ट-प्रार्थनेला आभार मानण्याची प्रार्थना, असे नावच देण्यात आले आहे. देवतेपुढे आपल्या पापांची कबुली देणे [⟶ पापनिवेदन], तिच्याविषयी आदर व्यक्त करणे, तिची स्तुती करणे, तिला शरण जाणे, तिच्या माहात्म्याचे वर्णन करणे, तिला बळी अर्पण करणे वा आश्वासन देणे, ⇨ नवस करणे, वश करण्यासाठी मनधरणी करणे, सुख-दु:ख व पश्चात्ताप व्यक्त करणे इ. हेतूंनी प्रार्थना केल्या जातात. देवता भक्ताकडे दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार काही वेळा प्रार्थनेत आढळते. ईश्वराचा सहवास प्राप्त करणे वा त्याच्याशी एकरूप होणे, हाही प्रार्थनेचा उद्देश असतो. काही वेळा प्रार्थनांचे स्वरूप करारांचे असते. प्रार्थना करताना टाळ्या वाजवणे, नमस्कार करणे, कपाळ जमिनीला टेकवणे इ. विविध शारीरिक आविर्भाव केले जातात.

विविध समाजांत सर्वोच्च ईश्वर, चित्‌शक्ती, देव-देवता, ⇨ पितर, ⇨ बुद्धासारखे सिद्ध वा ⇨तीर्थंकर इत्यादींना उद्देशून प्रार्थना केल्या जातात. काही आदिम जमातींत पशूची शिकार केल्यानंतर मृत पशूच्या

आत्म्याने सूड घेऊ नये म्हणून त्याची प्रार्थना करतात. [⟶ पशुपूजा]. शत्रूसाठीही प्रार्थना करावी असे येशूने म्हटले आहे. श्रेष्ठ देवाची प्रत्यक्ष रीत्या प्रार्थना न करता एखादा दुय्यम देव, संत वा प्राणी यांच्या मध्यस्थीने प्रार्थना करण्याची पद्धत काही वेळा आढळते. काही जणांच्या मते उच्चतर प्रार्थनेमध्ये प्रार्थना कोणाची म्हटली याला महत्त्व नसते, तर प्रार्थना म्हणजे एक आत्मसंवादच असतो. ज्या देवतेची प्रार्थना करावयाची, त्या देवतेला सर्वश्रेष्ठ मानण्याची प्रवृत्ती अनेकदा आढळते. आदिम लोक ज्या पदार्थात ⇨  माना नावाची शक्ती आहे, त्याची प्रार्थना करतात. प्रत्येक व्यक्तीला प्रार्थनेचा अधिकार असतोच परंतु काही वेळा ⇨ शामान, वडील, कुटुंबप्रमुख, ⇨ पुरोहित, इ. निवडक व्यक्तींना हा अधिकार दिलेला असतो. फक्त स्वतःसाठीच मागणे मागणाऱ्या प्रार्थना जशा असतात, तशाच स्वतःची मुलेबाळे, राष्ट्र, राजा, प्रजा, जमात, जमातीचा प्रमुख, कुटुंब, कुटुंबप्रमुख, यजमान इत्यादींसाठीही मागणे मागणाऱ्या प्रार्थना असतात. मृतात्म्यांना मरणोत्तर चांगली गती मिळावी, म्हणून त्यांच्यासाठीही प्रार्थना करण्याची पद्धत आढळते. [⟶ पितृपूजा].

प्रार्थनेद्वारे अतिमानवी शक्तीशी संपर्क साधावयाचा असतो, त्यामुळे प्रार्थना म्हणत असताना ती शक्ती उपस्थित राहून आपली प्रार्थना ऐकते व नंतर योग्य तो प्रतिसाद देते, अशी श्रद्धा असते. त्यामुळेच प्रार्थना हा मानव व देवता यांच्यातील संवाद आहे, साद-प्रतिसाद आहे, असे मानले जाते. हिंदूंच्या भक्तिसंप्रदायाप्रमाणे देव हा भजनात उपस्थित असतो तसेच ख्रिस्ती धर्माच्या सिद्धांताप्रमाणे ईश्वर हा सामुदायिक प्रार्थनेत उपस्थित असतो. देवतेला मानवी प्रार्थनेची गरज असल्यामुळे देवता व मानव यांचा संबंध दुहेरी असल्याचे काही जण मानतात.


प्रार्थनेचे वैयक्तिक व सामुदायिक असे दोन प्रकार आहेत. वैयक्तिक प्रार्थना एकेका व्यक्तीने केलेल्या असतात परंतु त्या व्यक्तीसाठी वा समुदायासाठीही असू शकतात तसेच सामुदायिक प्रार्थनाही समुदायासाठी वा व्यक्तीसाठी असू शकतात. यहुदी, ख्रिस्ती व इस्लाम या धर्मांत सामुदायिक प्रार्थनेला अत्यंत महत्त्व आहे. सामुदायिक प्रार्थनेमुळे बंधुत्व व सामाजिक ऐक्य निर्माण होते, याचे इस्लामी प्रार्थना हे उत्तम उदाहरण होय. प्रार्थना स्वतःसाठी न करता इतरांसाठी करण्याच्या कृतीतूनही मानवी नात्यांचे दृढीकरण होत असते. प्रार्थनेचे खाजगी व सार्वजनिक असेही दोन प्रकार आहेत.

प्रार्थना केव्हा व किती वेळा करावी, याविषयी विविध नियम आढळतात. नित्य व नैमित्तिक अशा दोन प्रकारच्या प्रार्थना असतात. इस्लाममध्ये प्रत्येकाने दररोज पाच वेळा प्रार्थना [⟶ नमाज] करावी असा नियम आहे. प्राचीन यहुदी लोक दिवसातून तीन वेळा प्रार्थना करीत आणि प्रारंभीच्या ख्रिस्ती लोकांनीही ती परंपरा चालू ठेवली होती. हिंदूंमध्ये प्रामुख्याने पूजेच्या वेळी प्रार्थना केली जाते. विविध धर्मांतून शुक्रवार, शनिवार, रविवार इ. विशिष्ट दिवस प्रार्थनेचे म्हणून मानले जातात. [⟶ चर्च चैत्य जैन मंदिर देवालय मशीद सिनॅगॉग]. जन्म, नामकरण, यौवनप्राप्ती, विवाह, मृत्यू, पेरणी, सुगी, शिकार, प्रवास, युद्ध इ. प्रसंगी प्रार्थना म्हटल्या जातात. देवतेला बळी अर्पण करताना तसेच कोणत्याही कामाला प्रारंभ करताना इष्ट देवतेची प्रार्थना म्हटली जाते. देवाचा अनुग्रह रहावा, संकटनाश व्हावा, कार्यसिद्धी व्हावी, यश प्राप्त व्हावे, म्हणून कार्यारंभी, ग्रंथारंभी प्रार्थना करूनच कार्यास किंवा ग्रंथ लिहिण्यास प्रारंभ करतात. युद्धात यश प्राप्त व्हावे, शत्रूचा पराभव व्हावा म्हणून सामुदायिक प्रार्थना होतात. ही गोष्ट पहिल्या व दुसऱ्या जागतिक युद्धाच्या इतिहासात नमूद केली आहे. मंदिर, राजवाडा, घर इ. ठिकाणी प्रार्थना म्हटल्या जातात. काही आफ्रिकी जमातींत प्रत्येक खेड्यात एक प्रार्थनावृक्ष असतो. लोक त्याच्याखाली जमून प्रार्थना करतात.

प्रार्थनांच्या निमित्ताने झालेली भावकाव्ये हा मानवी संस्कृतीचा एक मोठा ठेवा आहे. ⇨ ऋग्वेदाचे स्वरूप प्रार्थनांचे असून ⇨ बायबल, ⇨ अवेस्ता, ⇨ कुराण, ⇨ग्रंथसाहिब इ. धर्मग्रंथांतूनही प्रार्थना आहेत. प्रार्थनांमुळे संगीतकलेला प्रोत्साहन मिळाले असून, आदिवासींची नृत्ये याही एक प्रकारच्या प्रार्थनाच होत, असे म्हणणे शक्य आहे. तिबेटी लोक ध्वजावर व विशिष्ट चक्रावर प्रार्थना लिहीत असत. असे प्रार्थनाध्वज व विशेषतः प्रार्थनाचक्रे प्रसिद्ध आहेत. प्रार्थनांमधून त्या त्या मानवसमूहाची संस्कृती, आशाआकांक्षा आणि स्वप्ने व्यक्त होतात.

प्रार्थनेमुळे माणसाला आपल्याच मनाच्या गूढ सामर्थ्याची अनुभूती येते, प्रार्थना हे धर्माचे हृदय आहे, प्रार्थनेला श्वासोच्छ्‌वासाइतके महत्त्व आहे, प्रार्थनेशिवाय धर्म असूच शकत नाही, प्रार्थनेमुळे स्वर्गाची दारे उघडतात इ. प्रकारे प्रार्थनेचे माहात्म्य सांगितले जाते. प्रार्थनेमुळे मनोधैर्य वाढून सुरक्षिततेची भावना निर्माण होते. प्रार्थना करणे व मुसलमान असणे हे समानार्थक शब्द आहेत, या इस्लामी म्हणीवरून प्रार्थनेचे महत्त्व स्पष्ट होते. याउलट, प्रार्थना निष्फळ झाल्याच्या तक्रारीही पूर्वीपासूनच आढळतात. आधुनिक काळातही प्रार्थनेवर काही आक्षेप घेण्यात आले आहेत. उदा., कोणतीही घटना ही शास्त्रीय कारणांनी घडत असते, म्हणून प्रार्थनेचा काहीही उपयोग नाही लोक परस्परविरुद्ध अशा प्रार्थना करीत असल्यामुळे (विशिष्ट काळात कोणाला पाऊस हवा असतो, तर कोणाला नको असतो) ईश्वराला एकाच वेळी सर्वांच्या प्रार्थना पूर्ण करता येणार नाहीत प्रार्थनेमुळे मनुष्य दैववादी व दुबळा बनतो इत्यादी. प्रार्थना करणारे लोक नास्तिकांपेक्षा अधिक नीतिमान असतात, हे मतही हल्ली मान्य केले जात नाही.

पहा : धर्म पूजा.

संदर्भ : 1. Arintero, J. G. Trans, Stages in Prayer, London, 1957.

            2. Bounds, E. M. Power through Prayer, London, 1964.

            3. Butler, B. C. Prayer : An Adventure in Living, London, 1961.

            4. Heiler, Friedrich, Prayer : A Study in the History and Psychology of Religion, London, 1932.

            5. Underhill, Evelyn, Worship, New York, 1936.

साळुंखे, आ. ह.