प्राणि – समुदाय: अनुकूल जलवायुमान (दीर्घकालीन सरासरी हवामान) आणि परिस्थिती असलेल्या प्रदेशात आपणास अनेक प्राणिसमूह आढळतात. उदा., गवताळ प्रदेशात अनेक जातींचे कीटक, गायी, हरिण, शेळ्या, मेंढ्या यांसारखे पशू व त्यांवर उपजीविका करणारे लांडगा, वाघ यांसारखे हिंस्त्र पशू समुदायाने राहतात. हे प्राणि-समुदाय ते आढळणाऱ्या प्रदेशाच्या नावावरून ओळखले जातात. उदा., वाळवंटातील प्राणि-समुदाय, जंगलातील प्राणि-समुदाय इ. या प्रदेशाच्या विस्ताराप्रमाणे हा प्राणि-समुदाय विस्तारला जातो. डबक्यासारख्या लहान भागात आढळणारा प्राणि-समुदाय संख्येने कमी असतो. काही जातींचे खेकडे रिकाम्या शंखांमध्ये राहतात. शंखाच्या पृष्ठभागावर पोरिफेरा संघातील अगर सीलेंटेरेटा संघातील काही प्राणी चिकटून राहतात. अशा तऱ्हेने एक लहान प्राणि-समुदाय तयार होतो. लाकडाच्या कुजणाऱ्या ओंडक्यामध्ये अगर घोडा, गाय इ. प्राण्यांच्या जठरामध्ये अगर आतड्यामध्ये अनेक जातींचे परजीवी (दुसऱ्या जीवावर उपजीविका करणारे) प्राणी राहतात. या परजीवी प्राण्यांचा एक समुदाय तयार होतो. अशा निरनिराळ्या प्राणि-समुदायांवर शास्त्रज्ञांनी बरेच संशोधन केले आहे.

थीओफ्रॅस्टस (इ.स.पू.सु. ३७२-२८७) या ग्रीक शास्त्रज्ञांनी आणि ई. फॉर्ब्झ (१८४४) यांनी प्राणि-समुदायाचे वर्गीकरण केले. के. ए. मबिउस (१८८७) यांच्या मते निसर्गातील प्राण्यांच्या जमावाचे प्राणि-समुदायात रूपांतर होते. या समुदायाला ‘बायोसिनोस’ (Biocenose) ही संज्ञा त्यांनी वापरली. विसाव्या शतकात डॅनिश वनस्पतिशास्त्रज्ञ जे. ई. व्हार्मिंग (१९०९) यांनी वनस्पति-समुदाय आणि प्राणि-समुदाय यांचा अभ्यास एकत्रितपणे करावा असे प्रतिपादिले. चार्ल्‌स एल्टन (१९२०) यांनी प्राणि-समुदायातील प्राण्यांची संख्या, अन्नाची साखळी व परिस्थितीमधील वेगवेगळी आसरास्थाने यांच्या परस्परसंबंधावर लक्ष केंद्रित केले. एच्. उस्टिंग, आर्. हेसे, डब्ल्यू. ॲली, के. पी. श्मिट (१९५१) व एल्. आर्. डाइस (१९५२) यांनी जगातील निरनिराळ्या प्रदेशांतील वनस्पति-समुदायांचे व प्राणि-समुदायांचे निरीक्षण केले. यांशिवाय एफ्. ई. क्लेमेंट्स (१९३६), ए. जी. टॅन्स्ली (१९३९), जे. कर्टिस व आर्. मॅक्इन्टोश (१९५१), आर्. एच्. मॅक्आर्थर (१९६१), आर्. एफ्. डॉबिनमायर (१९६६), आर्. व्हिटकर (१९५१, १९६२, १९६७) आणि एच्. ए. ग्लिसन (१९२६) यांनी प्राणि-समुदायाच्या विविध गुणधर्मांचा अभ्यास केला आहे.

व्याख्या: अनेक प्राणिशास्त्रज्ञांनी प्राणि-समुदायाच्या वेगवेगळ्या व्याख्या दिलेल्या आहेत परंतु त्यांपैकी आर्. एल्. स्मिथ (१९६६) यांची व्याख्या जास्त योग्य वाटते. स्मिथ यांच्या मते ‘निसर्गात ठराविक ठिकाणी अनेक जातींचे प्राणी आणि वनस्पती एकत्र राहून एकमेकांना आधारभूत होतात आणि ऊर्जेचे दृढीकरण व वाटप करतात. अशा एकत्रित समूहाला समुदाय असे म्हणतात’. या व्याख्येत समुदायाची रचना आणि कार्य यांचा अंतर्भाव केला आहे.

लक्षणे : (१) प्राणिजातीची विविधता : समुदायातील वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी अन्न, निवारा आणि प्रजनन यांसाठी परस्परांवर आणि बाह्य परिस्थितीवर अवलंबून असतात.

(२) घटक : समुदायामध्ये शाकाहारी, मांसाहारी, परजीवी, मृतोपजीवी (प्राण्यांच्या विष्ठा, मृत प्राणी व मृत वनस्पती यांवर प्रत्यक्षपणे उपजीविका करणारे) इ. जातींचे प्राणी असतात.

(३) वर्चस्व : समुदायात ज्या जातीला परिस्थिती अनुकूल असते, त्या जातीच्या प्राण्यांचे वर्चस्व आढळते. उदा., वाळवंटात उंटाचे वर्चस्व असते.

(४) स्तरण : सरोवरासारख्या जलाशयातील पाण्याचे तापमान, प्रकाश, वनस्पती यांनुसार तीन आडवे स्तर अगर भाग होतात. या स्तरांत ठराविक जातींचे प्राणी आढळतात.

(५) क्रम : प्राणि-समुदाय निर्माण होत असताना एका जातीच्या प्राण्यावर उपजीविका करणारे दुसऱ्या जातीचे प्राणी, त्यांच्यावर उपजीविका करणारे तिसऱ्या जातीचे प्राणी असे क्रमाक्रमाने उत्पन्न होऊन प्राण्यांच्या जाती वाढत जातात. सर्वांत शेवटी परमोच्च बिंदूपर्यंत मात्र यांपैकी काही ठराविक जातींचे प्राणी समुदायात टिकाव धरून राहतात. इतर जाती नाश पावतात.

(६) पोषण-रचना व पोषण-समर्थता : सूर्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेमुळे वनस्पती आपले अन्न बनवितात. शाकाहारी प्राणी वनस्पती खाऊन व मांसाहारी प्राणी शाकाहारी प्राणी खाऊन ऊर्जा मिळवितात. अशा रीतीने वेगवेगळ्या जाती स्वतः ऊर्जा मिळ्वून ती इतरांनाही उपलब्ध करून देतात.

समुदायातील आवर्तिता: समुदायातील वेगवेगळ्या जातींचे प्राणी आपले चलनवलन, अन्नभक्षण, विश्रांती इ. कार्ये ठराविक वेळी करतात. काही जातींचे प्राणी दिवसा संचार करून उद्योगात राहतात व रात्री विश्रांती घेतात. यांना दिनचर प्राणी म्हणतात. याउलट काही प्राणी रात्री संचार करून उद्योगात राहतात व दिवसा विश्रांती घेतात. त्यांना निशाचर प्राणी म्हणतात. या आवर्तितेत दर चोवीस तासांत ठराविक क्रिया घडून येतात. याशिवाय हंगामी आवर्तिता आणि चांद्र आवर्तिता आहेत. हंगामी आवर्तितेमध्ये ऋतू बदलला म्हणजे हवामान बदलते. या बदलत्या हवामानामुळे प्राण्यांच्या शरीरात बदल घडून येतात. अनेक प्राण्यांचे प्रजननकार्य फक्त ठराविक ऋतूमध्येच होते. उदा., पक्षी, कुत्रा, गाय इत्यादी. चांद्र आवर्तितेमध्ये चंद्राच्या कलांचा समुद्रातील प्राण्यांच्या प्रजननावर परिणाम होतो. उदा., पलाओ जातीचे वलयी प्राणी (ॲनेलिडा) पौर्णिमेच्या रात्री समुद्राच्या पृष्ठभागावर येऊन प्रजनन करतात. [⟶ आवर्तिता, सजीवांतील].

प्राणि-समुदायातील प्रत्येक जातीच्या प्राण्याला त्याच्या प्रदेशात राहण्यासाठी एक ठराविक ठिकाण मिळालेले असते. या ठिकाणाला इंग्रजीत निच् (niche) असे म्हणतात. या ठिकाणी सहसा दुसऱ्या जातीचा प्राणी अतिक्रमण करीत नाही. उदा., पालीच्या तीन जाती आहेत. या प्रत्येक जातीचे वसतीचे ठिकाण ठरलेले असते. एक जात मानवाच्या घरात आढळते तर दुसरी जात झाडावर राहते तर तिसरी जात जमिनीवर दगडधोंड्यांचा ढिगाऱ्यात आढळते.

काही शास्त्रज्ञांच्या मते ‘निच्’ या शब्दात केवळ प्राण्यांच्या वस्तीच्या ठिकाणाचा समावेश न करता त्या प्राण्याचे समुदायातील महत्त्व व त्याचा इतर जातींवर होणारा परिणाम यांचाही अंतर्भाव करणे जरुरीचे आहे.

अशा रीतीने प्राणि-समुदायात अनेक जातींचे प्राणी विशिष्ट पद्धतीने वागून सर्व जातींना जगण्याची संधी उपलब्ध करून देतात व प्राप्त परिस्थितीत कालक्रमणा करून जीवन जगतात.

पहा : परिस्थितिविज्ञान.

संदर्भ : 1. Allee, W. C Emerson, A. E. Park, O. Park, T, Schmidt, K. P. Principles of Animal Ecology, Philadelphia, 1949.

2. Kendeigh, S. C. Ecology with Special Reference to Animals and Man, New Delhi, 1975.

3. Knight, C. B. Basic Concepts of Ecology, New York, 1965.

रानडे, द. र.