प्राणि-अलंकरण : पाळीव पशुपक्ष्यांना सजविण्याची कला. विशिष्ट प्रकारे प्राण्यांचे शरीर रंगविणे, त्यांना पानाफुलांनी सजविणे, नाना प्रकारच्या दागदागिन्यांनी नटविणे ही पद्धत प्राचीन काळापासून जगातील विविध समाजांत चालत आलेली आहे. विशेषतः पशुपालक व कृषिप्रधान समाजांत प्राण्यांच्या अलंकरणाची परंपरा महत्त्वाची ठरलेली दिसते.

सजविलेला घोडाप्राण्यांच्या अलंकरणामागे वेगवेगळी कारणे व उद्दिष्ट्ये असतात, उदा., पशुपूजक समाजांत त्या पूजेचा एक उपचार म्हणून पाळीव प्राण्यांना विशिष्ट प्रसंगी, विशिष्ट प्रकारे सजविण्यात येते तर कृषिप्रधान संस्कृतीत पशुधन हे सामाजिक व आर्थिक दर्जाचे निदर्शक मानले गेल्यामुळे आपले पशुधन जास्तीतजास्त चांगल्याप्रकारे सजवून-नटवून मिरविणे, हे प्रतिष्ठेचे लक्षण समजले जाते. पशूंविषयी आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांना ठराविक सणा-उत्सवांना अलंकृत करतात, उदा., ⇨ पोळा या सणाच्या दिवशी बैलांना व विजयादशमीस घोड्यांना सजविण्याची प्रथा रूढ आहे. पाळीव प्राण्यांच्या आधारे उपजीविका करणारे लोकसमूह व्यावहारिक हेतूने आपल्या प्राण्यांना सजवितात, उदा., नंदीवाले आपले नंदीबैल व माकडवाले आपली माकडे नटवून-सजवून आणि त्यांचे खेळ करून चरितार्थ चालवीत असतात. पूर्वी प्राण्याचे दान करताना त्याला अलंकृत करण्याची पद्धत होती, उदा., जनकराजाने याज्ञवल्क्याला ज्या हजार गायी दिल्या, त्यांच्या शिंगांना सोने बांधलेले होते. बळी द्यावयाच्या प्राण्यालाही अलंकृत करतात, उदा., ⇨ अश्वमेधासाठी सोडलेला घोडा अलंकृत असे. अश्वावर चढविलेले हे सुवर्णालंकार त्याला देवलोकी पोहोचवोत, असे ऋग्वेदात (१·१६२·१६) म्हटले आहे. शिकार करून मारलेल्या प्राण्याला सजवून त्याची मिरवणूक काढण्याची पद्धत आढळते. काही वेळा अलंकरणाचे स्वरूप यात्वात्मक असते. गाभण असलेल्या, व्यालेल्या, पुष्ट व देखण्या असलेल्या, तसेच इतर कारणांनी लक्षवेधक अशा प्राण्यांना दृष्ट लागू नये म्हणून त्यांना विशिष्ट साज चढविण्यात येतो. अधिक दूध मिळावे, वंध्यत्व नष्ट व्हावे किंवा असाच काही अन्य हेतू बाळगून ताईत, लिंबू, कवड्या इत्यादींनी दुभते प्राणी सजविले जातात. या अलंकरणाचा सुफलताविधीशी संबंध असल्याचे दिसते. रेडे व मेंढे यांच्या झुंजी लावतात, तेव्हा त्यांनाही सजविले जाते. त्यांचा रूबाब वाढविणे हा त्यामागे हेतू असतो. मेंढ्यांची झुंज लावताना त्यांच्या शिंगांना लोखंडाच्या शेंब्या बसवितात. दृष्ट लागू नये म्हणून पूर्वी झुंजीत विजयी झालेल्या कोंबड्यांच्या तुऱ्याला काजळ लावीत असत. बैलांच्या टोकदार शिंगांत पितळी शेंब्या आजही घालतात. त्यामुळे शिंगांचे सौंदर्य वाढते व त्यांपासून अपाय होण्याचा धोका कमी होतो. विदर्भ-महाराष्ट्रात पोळ्याच्या दिवशी बैलांची शिंगे रंगवून, त्यांना बेगड लावून शिंगांच्या टोकांवर विविध आकारांच्या शिंगोट्या चढवून व मस्तकावर कलापूर्ण बाशिंगे वा मखर बांधून त्यांना सजविण्याची प्रथा आहे. त्यांच्या अंगावर रंगाने वर्तुळे व पानाफुलांची नक्षी काढण्यात येते. तसेच पाठीवर वेधक झुली, गळ्यात फुलांच्या व मण्यांच्या माळा, पितळी साखळ्या आणि लहान आकाराची घंटाघुंगरे बांधून त्यांना अलंकृत करण्याची परंपरागत रूढी आहे. महाराष्ट्रात ⇨दिवाळीच्या सणात व तामिळनाडूत ⇨ पोंगळ या सणाच्या तिसऱ्या दिवशी गायींना फुलांच्या माळांनी शृंगारण्यात येते. काही वेळा प्राण्यांवर ओळखचिन्हे उमटवितात, उदा., पूर्वी राजाच्या पशूंवर राजचिन्हे उठविली जात. पशूंच्या गळ्यांत घंटा बांधण्यामागचा एक हेतू त्यांच्यापासून साप व हिंस्र पशू दूर जावेत, हा असतो. संगीतप्रियता हेही या अलंकरणामागचे एक उद्दिष्ट असून पशूंचे चालणे व घंटांचा आवाज यांच्या लयबद्धतेतून ते स्पष्टपणे दिसून येते. पशूंचा ठावठिकाणा समजण्यासही या आवाजाचा उपयोग होतो. अशा रीतीने व्याध संस्कृती, पशुपालन संस्कृती व कृषिप्रधान संस्कृती यांच्यामध्ये व्यक्तीची ऐपत व हौस त्याचप्रमाणे प्राण्याचा दर्जा व उपयुक्तता यांचाही अलंकरणावर प्रभाव पडतो. राजवैभवाचे प्रतीक असलेल्या हत्ती, घोडे, उंट इत्यादींना अलंकृत करण्यासाठी रंग, बेगड, इतर रंगीत वस्तू, धातू, कागद, कापड, मणी, फुले, आरसे, दोऱ्या, पट्टे, खाद्यपदार्थ इत्यादींचा उपयोग करण्यात येतो. नेहमीचे अलंकरण व प्रासंगिक अलंकरण यांत वेगळेपणा असतो. सोन्याच्या माळा, चांदीचे तोडे इ. मौल्यवान वस्तूंनी हत्तींना अलंकृत केले जाते. हत्तीच्या दातांना सोने बांधल्याचा (सुंदरकांड ५·५) व त्याच्या अंगावर सोन्याची वा सोनेरी झूल असल्याचा (अरण्यकांड ५२·२३) निर्देश वाल्मीकिरामायणात उपमांच्या रूपाने आला आहे. घोड्यांनाही सोन्याचांदीच्या दागिन्यांनी सजविले जाते. विशेषतः गळा, मस्तक आणि नितंबाचा भाग सजविण्यात येतो. दसऱ्याच्या दिवशी हत्ती-घोड्यांना सजविण्यासंबंधीचे राजविधान असे, की या दिवशी सकाळी हत्ती-घोड्यांना स्नान घालून व वस्त्रालंकारांनी शृंगारून राजवाड्यासमोर उभे करावे. चौथ्या प्रहरी लवाजम्यानिशी राजाने शस्त्रसज्ज होऊन त्यांवर स्वार व्हावे आणि सीमोल्लंघनास निघावे. दसऱ्याच्या दिवशी पेशव्यांचे सर्व हत्ती-घोडे व उंट यांना फुलांच्या माळा आणि उंची वस्त्रे तसेच सोन्यामोत्यांचे कंठे घालून सजविण्यात येई. म्हैसूरच्या महाराजांच्या दसऱ्याच्या मिरवणुकीतील हत्ती सोन्यारुप्यांच्या माळा आणि रंगीबेरंगी फुलांचे हार अशा नाना प्रकारच्या अलंकारांनी विशेष सुशोभित केलेले असतात [⟶ दसरा]. आजही दिल्लीला प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या संचलनप्रसंगी असलेल्या हत्तींना फुलांच्या माळांनी व रंगीत झुलींनी श्रृंगारण्यात येते.

अलंकृत गजराज, प्रजासत्ताक दिन, दिल्ली, १९६७.वेदकाळात अलंकारांनी श्रृंगारलेला घोडा मिरवणुकीच्या अग्रभागी चालवीत असत. या घोड्याच्या पायांत सोन्यारुप्यांचे तोडे व पाठीवर शेपटीपर्यंत नक्षीकामयुक्त पट्टा आणि गळ्यात अलंकार घालण्यात येत. आजही लग्नाच्या मिरवणुकीसमोर जरतारी जीन आणि नाना अलंकारांनी सजविलेला घोडा वाद्यांच्या तालावर ठुमकत चालविण्याचा प्रघात आहे. रंग, बेगड, घंटा, चाळ, बाशिंग, तोडे, फुगे, मणी इ. वस्तूंनी बैलांना सजवितात. कोल्हापूर भागात भाऊबीजेच्या दिवशी म्हशींच्या अंगावरचे केस अशा पद्धतीने कापले जातात, की उरलेले केस व कापलेल्या केसांचा भाग मिळून अलंकरणाचा भास व्हावा. घंटा, घंट्यांची माळ, पत्र्याच्या छोट्या छोट्या पेट्यांची माळ इत्यादींनी म्हशी, शेळ्या, मेंढ्या सजवितात. कुत्रा व मांजर यांच्या गळ्यातील पट्ट्यांतून घुंगरे जडविली जातात तर कबुतरे, कोंबड्या, पोपट इत्यादींच्या पायांत छोटी छोटी कडी वा घुंगरे बांधण्याची प्रथा आहे.

पहा : पशुपूजा पोळा.

साळुंखे, आ. ह. कोकड, अ. दि. जोशी, चंद्रहास