प्राणि भूगोल : प्राण्यांचा प्रसार, या प्रसाराचे भौगोलिक संबंध व त्याची कारणमीमांसा हे विषय प्राणिभूगोल या शास्त्राच्या कक्षेत येतात. निरनिराळे प्राणी पृथ्वीवर कोठेकोठे आहेत, ते तेथे कोठून व कसे आले असावेत, भौगोलिक दृष्ट्या त्यांचे आकृतिबंध कसे निर्माण झाले व त्याची काय या सर्व प्रश्नांचा विचार प्राणिभूगोलात केला जातो. या आकृतिबंधाच्या अभ्यासावरून प्राण्यांच्या क्रमविकासासंबंधी (उत्क्रांतीसंबंधी) पृथ्वीवर असलेल्या भूप्रदेश व जलप्रदेशांसंबंधी, तसेच हजारो वर्षांपूर्वीच्या या प्रदेशातील जलवायुमानासंबंधी (दीर्घकालीन सरासरी हवामानासंबंधी) काही अंदाज करणे शक्य होते.
प्राणिभूगोलाच्या दृष्टिकोणातून प्राण्यांच्या प्रसाराचा केलेला अभ्यास व ⇨परिस्थितिविज्ञानाच्या दृष्टिकोणातून केलेला अभ्यास यांत फरक आहे. प्राण्यांचे ठोकळमानाने बनलेले आकृतिबंध हे प्राणिभूगोलाच्या कक्षेत येतात, तर प्राण्यांचे स्थानिक गट व त्यांचे भोवतालच्या परिस्थितीशी असलेले संबंध हे परिस्थितिविज्ञानाच्या कक्षेत येतात. उदा., गवत खाणारे प्राणी आफ्रिका व ऑस्ट्रेलिया या दोन्ही प्रदेशांत आढळतात. गवत खाण्यास त्यांची अनुकूलता आणि निरनिराळ्या जागी निरनिराळ्या प्रकारच्या गवतांमुळे या प्राण्यांच्या प्रसारावर पडलेले बंधन हे प्रश्न परिस्थितिविज्ञानाच्या कक्षेत येतात. आफ्रिकेत गवत खाणाऱ्या प्राण्यांत प्रामुख्याने झीब्रा व हरणे आढळतात पण ऑस्ट्रेलियातील गवत खाणारे प्राणी म्हणजे मुख्यत्वेकरून कांगारू हे होत. या वस्तुस्थितीचा अभ्यास व कारणमीमांसा ही प्राणिभूगोलाच्या कक्षेत येतात. परिस्थितिविज्ञानाच्या प्रमुख ठोकताळ्यांचा स्थूलमानाने प्राणिभूगोलात विचार केला जातो.
इतिहास: शिकारी जनावरे व हिंस्र पशू कोठे राहतात यांविषयी मानवास नेहमीच उत्सुकता वाटत असावी. अठराव्या शतकात व एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात याविषयी स्थूलमानाने बरीच माहिती उपलब्ध होती पण शास्त्रीय दृष्टिकोणातून या माहितीचा अभ्यास चार्लस डार्विन यांनी १८५९ साली मांडलेला आपला क्रमविकासाचा सिद्धांत [⟶ क्रमविकास ] व त्याच्या पुष्ठ्यर्थ प्रसिद्ध केलेली माहिती उपलब्ध झाल्यानंतर सुरू झाला. डार्विन यांचा सिद्धांत प्रसिद्ध होण्यापूर्वी दोन वर्षे अगोदर (१८५७) पी. एल्. स्क्लेटर या शास्त्रज्ञांनी पक्ष्यांच्या प्रसाराचा अभ्यास करून आपले सिद्धांत मांडले. या अभ्यासांच्या आधारे त्यांनी जगाचे निरनिराळे विभाग केले. हे विभाग आजही पुष्कळांना मान्य आहेत. या विभागांना त्यांनी निरनिराळी उत्पत्तिस्थाने मानली. डार्विन यांनी आपल्या क्रमविकासाच्या सिद्धांताच्या आधाराने विभागांत असलेल्या प्राण्यांच्या विविधतेचे विशदीकरण केले.
प्राणिभूगोलाचा डार्विन यांच्या क्रमविकास सिद्धांताशी घनिष्ठ संबंध आहे. ‘बीगल’ या जहाजावरून पर्यटन करीत असताना डार्विन यांनी निरनिराळ्या प्रदेशांतील प्राण्याचे व वनस्पतींचे निरीक्षण केले. दक्षिण अमेरिकेत असताना त्यांना निरनिराळ्या प्रदेशांत निरनिराळे प्राणी आढळले. त्यांतील एका जातीतील प्राण्यांत निरनिराळ्या प्रदेशांत जरी विविधता आढळली, तरी या सर्वांची मूळ रचना एकच आहे, असे त्यांना दिसले व यावरून एकाच जातीच्या प्राण्यापासून हा क्रमविकास झाला आहे, असे अनुमान त्यांनी काढले. दक्षिण अमेरिकेजवळच्या गालॅपागस बेटांवरील प्राण्यांच्या बाबतीतही त्यांना असे आढळून आले की, एका जातीच्या विविधता दर्शविणाऱ्या प्राण्यांची उत्पत्ती दक्षिण अमेरिकेत असलेल्या मूळ प्राण्यापासून झाली असावी. अशा रीतीने डार्विन यांनी आपला क्रमविकासाचा सिद्धांत पुराव्यानिशी मांडला. प्राण्यांचे आकृतिबंध क्रमविकासामुळे अस्तित्वात आले असावेत, त्यांचा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रसार झाला असावा व हळूहळू त्यांच्यात फरक पडून यथाकाल नव्या जाती अस्तित्वात आल्या असाव्यात, असे त्यांचे म्हणणे होते. डार्विन यांच्या ओरिजिनऑफस्पीशीज या युगप्रवर्तक ग्रंथात ‘भौगोलिक प्रसार’ या शीर्षकाखाली त्यांनी लिहिलेली दोन प्रकरणे केवळ ऐतिहासिक दृष्ट्याच नव्हे, तर शास्त्रीय दृष्ट्या आजही फार महत्त्वाची समजली जातात.
ए. आर्. वॉलिस या डार्विन यांच्या समकालीन शास्त्रज्ञांनीही मलाया द्वीपकल्पातील प्राण्यांच्या प्रसाराचा अभ्यास करून क्रमविकासाच्या सिद्धांतास पुष्टी दिली. वॉलिस हेही फार प्रसिद्ध प्राणिभूगोलवैज्ञानिक होते. १८७६ साली त्यांनी दोन खंडांत लिहिलेला दजिऑग्राफिकल डिस्ट्रिब्यूशनऑफॲनिमल्स हा ग्रंथ प्रसिद्ध आहे.
प्राणिभूगोलाचे निष्कर्ष पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेल्या) प्राण्यांच्या अभ्यासावर आधारलेले आहेत कारण बरेचसे पृष्ठवंशी प्राणी परिचित आहेत व त्यांचे पुष्कळ जीवाश्म (शिळारूप अवशेष) उपलब्ध आहेत. या अभ्यासावरून काढलेले निष्कर्ष बऱ्याचशा अपृष्ठवंशी प्राण्यांनाही लागू पडतात. पृष्ठवंशी प्राण्यांतही मासे, उभयचर (जमिनीवर व पाण्यातही राहणारे) प्राणी व सस्तन प्राणी यांचे आकृतिबंध प्रामुख्याने जास्त आढळतात.
प्राण्यांच्या प्रसाराचा अभ्यास दोन निरनिराळ्या दृष्टिकोणांतून करता येतो. पहिल्या प्रकारात प्राण्यांचे गट उदा., मासे, उभयचर आणि सरीसृप (सरपटणारे प्राणी) कसे प्रसार पावले आहेत, याचे निरीक्षण केले जाते. या प्रकारास ‘भौगोलिक प्राणिविज्ञान’ हे नाव वॉलिस यांनी दिले आहे. दुसऱ्या प्रकारात पृथ्वीचे निरनिराळे विभाग करून त्यांत असणाऱ्या प्राण्यांचा अभ्यास करण्यात येतो. या प्रकारास वॉलिस यांनी ‘प्राणिभूगोल’ ही संज्ञा दिली आहे. प्रथम निरनिराळ्या वर्गांतील प्राण्यांचा प्रसार आणि त्यांचा क्रमविकास याचा अभ्यास करून नंतर पृथ्वीचे विभाग करून त्यांतील प्राणी गटांचा अभ्यास करणे, हे तार्किक दृष्ट्या जास्त सुसंगत वाटते.
डार्विन व वॉलिस यांच्या अगोदर जी. एल्. एल्. ब्यूफाँ या प्रकृतिवैज्ञानिकांनी १७४० मध्ये जगातील प्राणिभिन्नत्वाच्या कारणाकडे शास्त्रज्ञांचे प्रथम लक्ष वेधले. त्यांच्या मते नैसर्गिक अडथळ्यामुळे लांबवरच्या प्रदेशांत प्राण्यांची ये-जा होऊ शकली नाही. त्यामुळे निरनिराळ्या विभागांत निरनिराळे प्राणी आढळून येतात.
प्राणिभिन्नतेच्या स्वरूपाप्रमाणे जगाचे विभाग करण्याची पहिली कल्पना जे. सी. फ्राबीत्सीउस (१७४५ – १८०८) या डॅनिश कीटकशास्त्रज्ञांची आहे. त्यांनी कीटकप्रसारानुसार जगाचे आठ विभाग सुचविले. त्यानंतर दुसरा प्रयत्न जी. आर्. ट्रेव्हिरानुस यांनी केला. त्यांनी १८०३ मध्ये अपृष्ठवंशी व पृष्ठवंशी प्राण्यांचा प्रसार विचारात घेऊन जगाचे नवे विभाग सुचविले परंतु हे विभाग लवकरच इतिहासजमा झाले. फ्रीड्रिख टीडेमान (१७८१ – १८६१) यांनी १८१० मध्ये पर्यावरण (परिसर) व प्राणिस्थलांतर या दोन कारणांमुळे प्राणिप्रसारावर होणारे परिणाम किंवा प्राणिप्रसाराला घातली जाणारी मर्यादा याबद्दल शास्त्रशुद्ध विवेचन केले. त्यामुळे प्राणिभूगोलाच्या अध्ययनास नवी दिशा मिळाली. डेसमोलिनस यांनी १८२२ च्या सुमारास निरनिराळ्या भूभागांत एकाच प्रकारची प्राणिसृष्टी का आढळते या समस्येची उकल करण्यासाठी ‘उत्पत्तीची सद्दृश केंदे’ हा विचार पुढे मांडला. त्यानुसार एकाच जातीचे प्राणी एकाच वेळी जगाच्या निरनिराळ्या भूप्रदेशांत उत्पन्न झाले असावेत असा त्यांनी तर्क केला परंतु सबळ पुराव्याच्या अभावी हा विचार मागे पडला.
इ. स. १८५१ च्या सुमारास प्राणिभूगोलदृष्ट्या एक महत्त्वाची घटना घडून आली. चार्ल्स लायेल यांनी प्रिन्सिपल्सऑफजिऑलाजी हा जगन्मान्य ग्रंथ शास्त्रज्ञांपुढे ठेवला. या ग्रंथात लायेल यांनी पृथ्वीचा भूवैज्ञानिक इतिहास व पृथ्वीच्या स्तरातील प्राणि-अवशेष यांच्या साहाय्याने भूतकाळातील प्राणिप्रसारासंबंधी व प्राणि-उत्पत्तिकेंद्रांसंबंधी साधार माहिती दिली आहे. यामुळे नव्याचे प्राणिवार विभाग रचना करताना विद्यमान प्राण्यांच्या पूर्वजांच्या प्रसाराचा व उत्पत्तिकेंद्राचा विचार करणे आवश्यक आहे, असे नवीन सूत्र निर्माण झाले. दुसरी उल्लेखनीय घटना म्हणजे एल्. एफ्. श्मार्डा या शास्त्रज्ञांनी प्राण्यांच्या मूळ वसतिकेंद्रापासून त्यांच्या दूरवरच्या विस्तारास कारणीभूत झालेल्या नैसर्गिक साधनांची (उदा., नद्या, वारा इत्यादींची) मीमांसा करून जगाचे पंधरा विभाग तयार केले परंतु हे विभाग शास्त्रज्ञांना मान्य झाले नाहीत.
पी. एल्. स्क्लेटर यांनी १८५७ साली जगाचे सहा विभाग पाडले. या विभागांची उभारणी करताना त्यांनी पक्षी वर्गांपैकी ज्यात चिमणीचा समावेश होतो अशा पॅसेरिफॉर्मिस गणातील प्रसार विचारात घेतला. या पक्षी गणाचीच निवड करण्याचा उद्देश प्राणिप्रसारदृष्ट्या महत्त्वाचा आहे. निवड करण्याचे पहिले कारण या गणाच्या प्रसाराची सविस्तर नोंद उपलब्ध होती. दुसरे कारण या गणातील प्राणिजाती जगभर पसरलेल्या आहेत. तिसरे व महत्त्वाचे कारण म्हणजे या गणातील पक्ष्यांना हवेत बराच वेळ उडत राहण्याची ताकद नसल्यामुळे हे पक्षी फार दूरवर स्थलांतर करू शकत नाहीत. स्क्लेटर यांच्या या विभागांना सुद्धा फारशी मान्यता लाभली नाही. कारण पक्षिप्रसारात नैसर्गिक अडथळ्यांना फारसे महत्त्व नसल्यामुळे प्राणिभूगोलदृष्ट्या पक्षी वर्गाला प्राधान्य देऊन प्राणिविभाग निर्माण करू नयेत, अशा मताचे बरेच प्राणिशास्त्रज्ञ होते. १८५८ मध्ये ए. सी. एल्. जी. गुंथर या सुप्रसिद्ध सरीसृपविज्ञांनी सरीसृप प्राण्यांचा प्रसार विचारात घेऊन प्राणिविभाग सुचविले. हे विभाग व स्क्लेटर यांचे विभाग तंतोतंत जुळत होते. त्यामुळे स्क्लेटर यांच्या विभागांना परत प्रसिद्धी मिळाली.
अँड्रू युरे यांनी १८६६ मध्ये सस्तन प्राण्यांचा विस्तार विचारात घेऊन जगाचे विभाग पाडले. सस्तन प्राण्यांना प्राधान्य देण्याचे कारण सस्तन प्राणी हे सरीसृप व पक्षी या वर्गांनंतर उदयास आले आहेत व त्यांच्या उत्पत्तिस्थानापासून चौफेर पसरण्यास त्यांना फारच थोडा अवधी (भूवैज्ञानिक परिमाणाच्या दृष्टीने) मिळाल्यामुळे त्यांचे उत्पत्तिस्थान नक्की करता येते. वॉलिस यांनी १८७६ मध्ये सस्तन प्राण्यांना प्राधान्य देऊन युरे यांच्या विभागांत थोडाफार बदल करून नवीन विभाग केले. हे विभाग मात्र सर्वमान्य झाले.
प्राण्यांचा प्रसार : प्राणिप्रसारासंबंधीची सयुक्तिक कारणे डी. एस्. जॉर्डन व व्ही. एल्. केलॉग यांनी १९०७ मध्ये सांगितली आहेत. या कारणांचा गोषवारा पुढीलप्रमाणे आहे : आजचा प्राणिप्रसार हा विद्यमान सरहद्दी व भूतकाळातील पर्यावरण, त्याचप्रमाणे भूभागात झालेली उलथापालथ, प्राणिप्रसारास योग्य असे मार्ग व नैसर्गिक बंधने यांना अनुसरून झालेला आहे.
प्रथम आपण निरनिराळ्या प्राण्यांचा प्रसार कसा झाला याचा विचार करू.
मासे : जी. एस्. मायर यांनी प्राणिभूगोलाच्या दृष्टीने गोड्या पाण्यातील माशांचे तीन गट केले : (१) प्रमुख, (२) दुय्यम व (३) परिसरीय. जे मासे फक्त गोड्या पाण्यातच जगू शकतात व समुद्रात जिवंत राहू शकत नाहीत ते ‘प्रमुख’ गटातील मासे होत. दीर्घ काळ गोड्या पाण्यात राहिल्यामुळे या गटातील माशांचा निरनिराळ्या भूप्रदेशांतील गोड्या पाण्यात प्रसार झाला असावा. जे मासे साधारणपणे गोड्या पाण्यात राहतात पण वेळ आली, तर काही काळ समुद्राच्या पाण्यातही जिवंत राहू शकतात ते ‘दुय्यम’ या गटात मोडतात. यांची उत्पत्ती खाऱ्या पाण्यातील माशांपासून झाली असावी व यांचा प्रसार समुद्रकिनाऱ्यावरील लहान लहान प्रवाहांतून गोड्या पाण्यात झाला असावा. ‘परिसरीय’ गटातील मासे विनाप्रयास गोड्या पाण्यातून समुद्रात व समुद्रातून गोड्या पाण्यात ये-जा करू शकतात. यामुळे निरनिराळ्या प्रदेशांत यांचा प्रसार समुद्रातून झाला असावा. गोड्या पाण्यातील वर निर्देश केलेल्या प्रमुख गटातील मासे जमिनीवरील गोड्या पाण्यातच राहत असल्यामुळे प्राणिभूगोलाच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहेत.
‘प्रमुख’ गटातील माशांचा प्रसार
बिचिर (पॉलिप्टेरिडी) पॅडलफिश (पॉलिओडोंटिडी) बोफिन (एमिडी) फुप्फुसमीन (लंगफिश सेरॅटोडोंटिडी) फुप्फुसमीन (लेपिडोसायरनिडी) मूनआइज (हायोडोंटिडी) सायप्रिनिफॉर्मीस (ऑस्टॅरिओफायझी)
मड मिनो (अंब्रिडी), ब्लॅकफिश (डॅलिइडी), पाइक आणि पिकरेल(इसासिडी)
ट्राउच पर्च (परकॉप्सिडी), पायरेट पर्च (आफ्रिडोडेरिडी)
गोड्या पाण्यातील बास (सेंट्रारकिडी)
पर्च (पर्सीडी)
लॅबिरिंथ मासे (ॲनॅबँटिडी), काटेरी ईल (मॅस्टाकेंबिलिडी) |
– आफ्रिका – चीन, उत्तर अमेरिका – पूर्व-उत्तर अमेरिका – ऑस्ट्रेलिया – आफ्रिका-दक्षिण अमेरिका – पूर्व-उत्तर अमेरिका – ऑस्ट्रेलिया सोडून सर्व खंडे
समशीतोष्ण यूरेशिया, उत्तर अमेरिका.
उत्तर अमेरिका
– उत्तर अमेरिका
-समशीतोष्ण यूरेशिया, उत्तर अमेरिका
उष्ण प्रदेशीय आशिया व आफ्रिका. |
‘दुय्यम’ गटातील माशांचा प्रसार
गारपाइक (लेपिसोस्टेइडी) टॉप मिनो व जरायुज (पिलांना जन्म देणारे) मिनो (सायप्रिनोडोंटिस) सिक्लिडी |
-पूर्व-उत्तर अमेरिका व मध्य अमेरिका. -उष्ण यूरेशिया, आफ्रिका, अमेरिका.
– आफ्रिका, उष्ण प्रदेशीय अमेरिका. |
‘परिसरीय’ गटातील माशांचा प्रसार
लँप्री (पेट्रोमायझांटिडी), स्टर्जन (एसिपेन्सरिडी), सामन-ट्राउट (सामोनिडी), गोड्या पाण्यातील ईल (अँग्विलिडी), स्टिकलबॅक (गॅस्टरोस्टेइडी) व इतर पुष्कळ जाती |
समशीतोष्ण यूरेशिया, उत्तर अमेरिका व पृथ्वीवर इतरत्रही.
– पृथ्वीच्या निरनिराळ्या विभागांत. |
प्रमुख गटातील गोड्या पाण्यातील मासे मोठ्या खंडांत व या खंडांपासून नजीकच्या भूतकाळात निर्माण झालेल्या बेटांत आढळतात. ऑस्ट्रेलिया खंड हे बेटासारखे आहे. यात दक्षिण क्वीन्सलँड या प्रदेशात गोड्या पाण्यात राहणारा फुप्फुसमीन हा येथे कसा आला असावा याविषयी असा अंदाज करण्यात आला आहे की, या माशाचे पूर्वज समुद्रातून ऑस्ट्रेलिया खंडात आले असावेत. हा अंदाज ऑस्ट्रेलियातील गोड्या पाण्यातील इतर माशांच्या बाबतीतही लागू पडतो. आशिया खंडातील प्रमुख गटातील मासे सुमात्रा, जावा, बोर्निओ या बेटांवर आशिया खंडाच्या मुख्य प्रदेशातून, ही बेटे आशिया खंडापासून विलग होण्यापूर्वी आले असावेत. याउलट या विभागातील मासे माकॅसर सामुद्रधुनी व सेलेबीझ बेटे येथे सापडत नाहीत कारण ही बेटे पूर्वीसुद्धा आशिया खंडाच्या भूभागाशी संलग्न नव्हती. इतरत्र या प्रमुख गटातील मासे ब्रिटिश बेटे, श्रीलंका, तैवान (फॉर्मोसा), जपान, त्रिनिदाद या बेटांवर आढळतात कारण ही बेटे पुरातन काळात सु. १०,००० वर्षांपूर्वी मुख्य भूप्रदेशाशी संलग्न होती.
या प्रमुख गटातील जे मासे आफ्रिका खंडात आहेत ते मॅलॅगॅसी (मादागास्कर) बेटात नाहीत, तसेच जे उत्तर व दक्षिण अमेरिकेत आहेत ते वेस्ट इंडिजमध्ये नाहीत. यावरून मॅलॅगॅसी, वेस्ट इंडीज, तसेच सेलेबीझ ते ऑस्ट्रेलिया ही बेटे मुख्य भूप्रदेशाशी संलग्न नसावीत, असे अनुमान निघते.
दुय्यम गटातील गोड्या पाण्यातील मासे काही काळ समुद्राच्या पाण्यात राहू शकतात. यामुळे मुख्य भूप्रदेशातून समुद्र पार करून ते मॅलॅगॅसी, वेस्ट इंडीज व सेलेबीझ या बेटांत जाऊ शकले. मध्य अमेरिकेत प्रमुख गटापेक्षा या दुय्यम गटातील मासे जास्त प्रमाणात आहेत. यावरून असे अनुमान निघते की, काही वर्षांपूर्वी मध्य अमेरिकेचा भूभाग हे एक बेट अगर द्वीपकल्प असावे व त्यामुळे प्रमुख गटातील (जे समुद्राच्या पाण्यात जिवंत राहू शकत नाहीत अशा) माशांना या भूभागात जाणे जमले नसावे.
वरील विवेचनावरून असे दिसते की, गोड्या पाण्यातील माशांच्या प्रसारास खारे पाणी हा एक मोठाच अडथळा आहे. याखेरीज जलवायुमान हाही एक महत्त्वाचा घटक आहे. काही मासे उष्ण प्रदेशीय भागातच राहतात, तर काही समशीतोष्ण प्रदेश पसंत करतात उदा., पाइक आणि पिकरेल हे गोड्या पाण्यातील मासे समशीतोष्ण यूरेशियात व उत्तर अमेरिकेत सापडतात पण ते उष्ण प्रदेशांत कधीही जात नाहीत.
काही परिसरीय मासे, उदा., सामोनाइड हे थंड गोड्या पाण्यात आफ्रिकेच्या उत्तर समशीतोष्ण प्रदेशात सापडतात व तेथून ते दक्षिण समशीतोष्ण प्रदेशात उष्ण प्रदेश ओलांडून जातात पण उष्ण प्रदेशांत कधीच राहत नाहीत. हे परिसरीय मासे समुद्रातही राहू शकत असल्यामुळे इतर अडथळ्यांपेक्षा जलवायुमान हाच यांच्या प्रसाराच्या बाबतीत महत्त्वाचा अडथळा आहे.
खारे पाणी व जलवायुमान यांशिवाय गोड्या पाण्यातील माशांच्या प्रसारास क्रमविकासामुळे निर्माण झालेले प्रभावी गण हाही एक महत्त्वाचा अडथळा आहे. गोड्या पाण्यातील माशांचा एक गण सायप्रिनिफॉर्मिस (ऑस्टॅरियोफायझी) हा सर्वांत प्रभावी गण आहे. प्रमुख गटातील ८०% मासे या प्रभावी गणातील आहेत. हे मासे ऑस्ट्रेलिया सोडून सर्व खंडांतील गोड्या पाण्यात आढळतात. या सर्व ठिकाणच्या माशांचा अभ्यास केल्यावर असे आढळले की, त्यांच्या क्रमविकासात दोन प्रवाह आहेत. सायप्रिनिफॉर्मिस या गणाचा उगम आशिया-यूरोप या उष्ण भूप्रदेशात क्रिटेशस कल्पात (सु. १४ ते ९ कोटी वर्षांपूर्वीच्या काळात) झाला आणि तेथून हे मासे ऑस्ट्रेलिया सोडून इतर सर्व भूप्रदेशांत गोड्या पाण्यात स्थलांतरित झाले असावेत. ते दक्षिण अमेरिकेत गेल्यावर तेथे त्यांचा क्रमविकास झाला असावा. यानंतर क्रिटेशस कल्पातच सायप्रिनिफॉर्म कुलाच्या माशांचा पुढचा क्रमविकास व प्रसार सुरू झाला असावा. हे मासे आशियाच्या उष्ण कटिबंधातून सर्व दिशांनी जमिनीवरील गोड्या पाण्याच्या प्रवाहात जिकडे जाणे शक्य झाले तिकडे गेले असावेत. आशिया खंडाच्या व यूरोप खंडाच्या समशीतोष्ण प्रदेशात जाऊन तेथील पूर्वीच्या माशांचा नाश करून तेथे यांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले असावे. हे मासे आफ्रिका व उत्तर अमेरिका या खंडांतही गेले व बऱ्याच संख्येने तेथे राहिले. पण या भागात त्यांनी पूर्वीच्या माशांचा यूरेशियासारखा संपूर्ण नाश केला नाही. हे दक्षिण अमेरिकेत गेले नाहीत. तेथे पूर्वी असलेल्या मार्जारमीनाचे प्रभुत्व कायम राहिले. ते ऑस्ट्रेलियातही पोहोचू शकले नाहीत.
खारे पाणी, जलवायुमान, क्रमविकास व प्रसार या चार कारणांवर सध्या अस्तित्वात असलेले गोड्या पाण्यातील माशांचे आकृतिबंध अवलंबून असून ते खालीलप्रमाणे आहेत.
यूरेशिया – सायप्रिनिफॉर्म – प्रभावी
उदा., सकर, कार्प, मिनो.
उत्तर अमेरिका -सायप्रिनिफॉर्म, इतर मासे } मिश्र प्रभाव
दक्षिण अमेरिका -सायप्रिनिफॉर्म – अभाव
आदि सायप्रिनिफॉर्मीस -प्रभावी
आफ्रिका -सायप्रिनिफॉर्म, इतर मासे }मिश्र प्रभाव
ऑस्ट्रेलिया -सायप्रिनिफॉर्म -अभाव
न्यू गिनी, मॅलॅगॅसी, वेस्ट इंडीज (त्रिनिदाद सोडून) } परिसरीय मासे -प्रभावी.
दक्षिण अमेरिकेतील फुप्फुसमीन व आफ्रिकेतील फुप्फुसमीन हे एकाच कुलातील मासे होत. याचप्रमाणे इतर कुलांतील दोन्ही प्रदेशांत असलेले पुष्कळ मासे एकमेकांशी संबद्ध आहेत. यावरून वरकरणी असे अनुमान काढता येईल की, काही काळापूर्वी दक्षिण अमेरिका व आफ्रिका हे एकमेकांशी संलग्न होते पण हे खरे नाही. या दोन्ही प्रदेशांतील माशांचे विश्लेषण केले असता असे आढळून येते की, दक्षिण अमेरिकेतील माशांच्या जाती आफ्रिकेतील माशांच्या जातींशी जुळत नाहीत. जर हे दोन प्रदेश एकमेकांशी संलग्न असते, तर माशांच्या जातींत इतका फरक पडला नसता. सध्या अस्तित्वात असलेल्या माशांच्या जातींचे विश्लेषण केले असता जगात कोठेही ⇨खंडविप्लव झाला असल्याचे आढळत नाही. दक्षिण अमेरिकेच्या आणि ऑस्ट्रेलियाच्या अगर ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकेच्या गोड्या पाण्यातील माशांचे परस्परसंबंध आढळत नाहीत, तसेच या माशांच्या अभ्यासावरून मॅलॅगॅसी हे बेट मुख्य खंडाशी संलग्न असल्याचा पुरावाही मिळत नाही. गोड्या पाण्यातील माशांच्या प्रसारावरून खंडविप्लवास पुरावा मिळत नाही परंतु आशिया-यूरोप-आफ्रिका येथील उष्ण कटिबंधातील सायप्रिनिफॉर्मीस या गणातील प्रभावी माशांचा प्रसार कसा झाला असावा, याची कल्पना येते.
उभयचरप्राणी: या प्राण्यांचे प्रामुख्याने तीन गण आहेत व हे सर्व फार पुरातन आहेत पण यांचा प्रसार अलीकडेच म्हणजे क्रिटेशस कल्पाच्या शेवटी व तृतीय कल्पाच्या (सु. ६·५ ते २ कोटी वर्षांपूर्वीच्या काळाच्या) प्रारंभी झाला असावा.
सिसिलियन (ॲपोडा किंवा जिम्नोफायोना) हे कृमीसारखे जमिनीत किंवा पाण्यात राहणारे उभयचर होत. ते आफ्रिकेत (मॅलॅगॅसी सोडून), हिंदी महासागरातील सिशल्स बेटांत, आशियाच्या उष्ण कटिबंधात, तसेच सुमात्रा, जावा, बोर्निओ व दक्षिण फिलिपीन्स आणि दक्षिण मेक्सिको ते उत्तर अर्जेंटिना या अमेरिकेच्या उष्ण कटिबंधी प्रदेशात सापडतात. यांचा भौगोलिक इतिहास ज्ञात नाही.
सॅलॅमँडर व न्यूट (कॉडेटा किंवा यूरोडेला) हे उभयचर मुख्यत्वेकरून उत्तर समशीतोष्ण प्रदेशात सापडतात. यांपैकी फार थोडे आग्नेय आशिया व अमेरिकेत ॲमेझॉन नदीच्या दक्षिणेस आढळतात. हे अपवाद सोडले, तर उष्ण कटिबंधात हे प्राणी आढळत नाहीत. ते दक्षिण गोलार्धातील खंडांतही आढळत नाहीत. सॅलॅमँडरचा भौगोलिक इतिहास ज्ञात नाही पण त्यांच्या प्रसारावरून असे आढळून येते की, हा हळूहळू नामशेष होत जाणारा गट आहे.
बेडूक व भेक (सलाएन्शिया किंवा ॲन्यूरा) हे सध्याचे प्रभावी उभयचर होत. ते जगात (उत्तर व दक्षिण ध्रुव व काही दूरची बेटे सोडून) सर्वत्र आढळतात. ऑस्ट्रेलियासारख्या खंडीय बेटातही बेडूक जाऊ शकले यावरून असे दिसते की, समुद्राच्या खाऱ्या पाण्यातून जाण्याची त्यांची क्षमता गोड्या पाण्यातील माशांपेक्षा खचितच जास्त आहे. त्याचा प्रसार खंडीय बेटावरच नाही, तर वेस्ट इंडीज, मॅलॅगॅसी, सिशल्स, फिलिपीन्स, मलया द्वीपकल्प, सालोमन बेटे, न्यूझीलंड व फिजी बेटे या महासागरी बेटांवरही झाला आहे. चालू काळातील सर्वांत आद्य बेडूक उत्तर अमेरिका व न्यूझीलंड येथे आढळतो. जास्त विकसित बेडकांचे दोन भौगोलिक विभाग करता येतील : जमिनीवर राहणाऱ्या बेडकांचा एक विभाग व वृक्षवासी बेडकांचा दुसरा विभाग.
जमिनीवर राहणाऱ्या लेप्टोडॅक्टिलिडी या कुलातील बेडूक ऑस्ट्रेलिया, अमेरिकेचा उष्ण कटिबंधी प्रदेश व दक्षिण आफ्रिकेत आढळतात. भारतात या जातीच्या बेडकांचे जीवाश्मही आढळतात. रॅनिडी कुलाचे बेडूक आफ्रिका, यूरेशिया, उत्तर अमेरिका, न्यू गिनी, ऑस्ट्रेलिया, मध्य व दक्षिण अमेरिका येथेही आहेत. यावरून असे दिसते की, एकेकाळी लेप्टोडॅक्टिलिडी कुल फार प्रभावी होते पण कालांतराने त्याची जागा रॅनिडी कुलाने घेतली. ॲटिलोपोडीडी या कुलाचे बेडूक बहुतेककरून अमेरिकेच्या उष्ण कटिबंधात आढळतात. ब्यूफो वंशाचे भेक सुरुवातीस आफ्रिकेत होते. तेथून त्यांचा प्रसार यूरेशिया आणि उत्तर व दक्षिण अमेरिका या भागांत झाला. ऑस्ट्रेलियात ते गेले नाहीत.
झाडावर राहणाऱ्या बेडकांची दोन कुले आहेत. यांपैकी हायलिडी या कुलातीलहायला या वंशाचा बेडूक अमेरिकेत उष्ण कटिबंधापासून समशीतोष्ण कटिबंधातून उत्तर ध्रुवापर्यंत आढळतो. या कुलातील काही जाती आशिया, यूरोप, उत्तर आफ्रिका, दक्षिण अरेबिया व इंडोचायना येथेही आहेत. न्यू गिनी व ऑस्ट्रेलियाच्या समशीतोष्ण प्रदेशातही हे आढळतात. मात्र सहाराच्या दक्षिणेस आफ्रिकेत, आशियाच्या उष्ण कटिबंधात व मलाया द्वीपकल्पात ते आढळत नाहीत. दुसऱ्या ऱ्हॅकोफोरिडी या कुलातील बेडूक जेथे हायलिडी कुलातील बेडूक नाहीत अशा ठिकाणी प्रामुख्याने दिसतात. यावरून असे अनुमान निघते की ऱ्हॅकोफोरिडी कुलातील बेडूक जे जास्त प्रभावी आहेत व त्यांच्या आगमनानंतर त्यांनी हायलिडी कुलातील बेडकांची जागा घेतली असावी. ज्याप्रमाणे आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका या दोन प्रदेशांतील गोड्या पाण्यातील माशांतील संबंध या दोन प्रदेशांच्या संलग्नतेशी निगडित नसून त्यांच्या प्रसाराशी व क्रमविकासाशी निगडित आहेत, त्याचप्रमाणे पिपिडी या कुलातील बेडकांच्या बाबतीत वस्तुस्थिती आढळते. या कुलातील बेडूक हे मुख्यत्वे जलचर आहेत व आफ्रिकेतील व दक्षिण अमेरिकेतील पिपिडी कुलातील बेडकांचे परस्परसंबंध त्यांच्या प्रसारावर व क्रमविकासावर आधारलेले आहेत. लेपिडॅक्टिलिडी व हायलिडी ही कुले सध्या प्रामुख्याने दक्षिण अमेरिका व ऑस्ट्रेलिया या प्रदेशांत आढळतात व त्यांचे परस्परसंबंधही खंडांच्या संलग्नतेपेक्षा त्यांच्या प्रसारक्रियेवर व क्रमविकासावर अवलंबून आहेत.
सरीसृपप्राणी : हे प्राणी प्रामुख्याने उष्ण कटिबंधात राहतात. यूरोपच्या उत्तरेस उत्तर ध्रुवाजवळ अपवाद म्हणून पालीची व सर्पाची एक एक जात आढळली आहे. उत्तर समशीतोष्ण कटिबंधातही सरीसृप प्राणी विशेष आढळत नाहीत. दक्षिण समशीतोष्ण कटिबंध व दक्षिण ध्रुवाजवळील प्रदेशांतही वरीलप्रमाणेच परिस्थिती आढळते. निरनिराळ्या बेटांवर मात्र सरडे, साप व कासवे यांची बरीच संख्या आढळते.
ॲलिगेटरवमगर : क्रोकोडिलिया गणातील हे सरीसृप प्राणी बहुतः उष्ण कटिबंधात आढळतात पण खरे ॲलिगेटर जास्त करून उष्ण समशीतोष्ण प्रदेशात राहतात. सध्या अस्तित्वात असलेल्या ॲलिगेटरांच्या दोन जाती मुख्यत्वे अमेरिकेत व चीनमध्ये आढळतात. या प्राण्यांचे जीवाश्म उत्तर अमेरिकेच्या पूर्व भागात सापडले आहेत.
कासवे : ही उष्ण कटिबंधात आढळतात. यांच्या काही जाती येथून समशीतोष्ण भागातही गेल्या असाव्यात. उत्तर अमेरिकेच्या पूर्व भागात या प्राण्यांची संख्या बरीच आहे. आशियाच्या काही भागांत आणि ब्रिटिश बेटांत हे सापडत नाहीत. दक्षिण गोलार्धामध्ये दक्षिण ऑस्ट्रेलियात हे आहेत पण टास्मेनिया व अर्जेंटिना येथे ते आढळत नाहीत. गोड्या पाण्यातील जलचर कासवे आफ्रिका, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, यूरेशिया आणि उत्तर अमेरिका येथे आढळतात. पेलोमेड्युसिडी या कुलातील कासवे आफ्रिका, मॅलॅगॅसी व दक्षिण अमेरिका येथे आहेत, तर त्यांचे जीवाश्म यूरेशियात आणि उत्तर अमेरिकेत सापडतात. चेलिड्रिडी या कुलातील कासवे दक्षिण अमेरिका व ऑस्ट्रेलिया या प्रदेशांत आहेत पण त्यांचे जीवाश्म इतरत्र कोठेही आढळलेले नाहीत. जलचर कासवे दक्षिण अमेरिकेतून जलमार्गे ऑस्ट्रेलियात गेली असावीत. टेस्ट्यूडिनिडी कुलातील टेस्ट्यूडो वंशाची कासवे दक्षिण आशियात तृतीय कल्पाच्या प्रारंभी असावीत व तेथून ती ऑस्ट्रेलिया सोडून इतर सर्व खंडात प्रसार पावली असावीत. पुढे उत्तर अमेरिकेत त्यांचा अंत झाला असावा, कारण या खंडात त्यांचे जीवाश्म आढळतात पण आफ्रिका, मॅलॅगॅसी, दक्षिण यूरेशिया आणि दक्षिण अमेरिका येथे त्यांचा विकास झाला असावा. हा वंश दक्षिण अमेरिकेत मायोसीन काळात (सु. दोन कोटी वर्षांपूर्वीच्या काळात) गेला असावा. या वेळी दक्षिण अमेरिका खंड उत्तर अमेरिका खंडापासून विभक्त होते. हा मोठा वंश अजूनही हिंदी महासागराच्या निरनिराळ्या बेटांवर आढळतो. या वंशाचे जीवाश्मही वेस्ट इंडीजमधील काही बेटांवर आढळले आहेत. या वंशातील बऱ्याच जातींनी जरी जमिनीवर वस्ती केलेली असली, तरी तेथे जाण्यास त्यांना हजारो किलोमीटर समुद्रप्रवास करावा लागला असेल, असे अनुमान निघते.
ट्युआटारा: (स्फेनोडॉन). हे सरड्यासारखे प्राणी न्यूझीलंड बेटावर सापडतात. ऱ्हिंकोसेफॅलिया गणाचे हे वंशज होत. पूर्व व मध्य मध्यजीव महाकल्पात (सु. १८·५ ते ९ कोटी वर्षांपूर्वीच्या काळात) यांचा प्रसार बराच विस्तृत होता पण पूर्व क्रिटेशस कल्पानंतरचे यांचे जीवाश्म कोठेही सापडलेले नाहीत.
सरडे : यांचा फारच मोठा गट आहे आणि त्यात विविध जाती आहेत. इतर प्राण्यांच्या प्रसाराच्या तुलनेने यांचा प्रसार फार दूरवर व जेथे इतर उभयचर प्राणी पोहोचू शकले नाहीत अशा बेटांवर झाला आहे. हिंदी महासागरातील मॅस्करीन बेटे फिजी, टोंगा, न्यू कॅलेडोनिया व सामोआ ही पश्चिम पॅसिफिक समुद्रातील बेटे न्यूझीलंड, पूर्व पॅसिफिक महासागरातील गालॅपागस बेटे व अटलांटिक महासागरातील वेस्ट इंडीज, बर्म्यूडा, कानेरी, मादीरा आणि केपव्हर्द बेटे या ठिकाणी उभयचर प्राण्यांपेक्षा या सरीसृप प्राण्याच्या विविध जाती विकास पावल्या आहेत. गेक्कोनिडी कुलातीलगेक्को वंशाचे सरीसृप प्राणी उष्ण कटिबंधात बरेच आहेत. त्यांचा विशेष प्रसार समशीतोष्ण प्रदेशात झालेला नाही. यावरून असे अनुमान निघते की, प्राण्यांचा गट कितीही प्रभावी असला, तरी जलवायुमानाचा परिणाम त्याच्या प्रसारावर जास्त प्रभावकारक ठरतो.
साप : बोइडी कुलातील बोइनी या उपकुलात असलेले सर्प विशेषेकरून अमेरिकेत आहेत, तर पायथोनिनी या उपकुलातील सर्प यूरेशिया व आफ्रिका (मॅलॅगॅसी सोडून) येथे आहेत. मॅलॅगॅसीमधील सर्प संझीनिनी या उपकुलातील आहेत. सध्या जिवंत असलेल्या सर्पांत कोल्युब्रिडी सर्वांत मोठे कुल आहे. ऑस्ट्रेलिया खंड सोडून जगात इतरत्र कोठेही कोल्युब्रिडी कुलातील सर्प आढळतात. ऑस्ट्रेलियातील साप इलॅपिडी या कुलातील आहेत. यांत काही विषारी जातीही आहेत. ऑस्ट्रेलियाच्या बाहेर आढळणारे एलापिडी कुलाचे साप म्हणजे नाग व प्रवालसर्प होत. भारतात हे आढळतात. ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यावरील प्रदेशात कोल्युब्रिडी कुलाचे साप कमी प्रमाणात आहेत. हळूहळू ते तेथील इलॅपिडी कुलाच्या सापांचा नाश करून प्रभावी ठरतील, असे अनुमान निघते. व्हायपरिनी उपकुलातील व्हायपेरा वंशाचे साप आफ्रिकेत व यूरेशियात पुष्कळ आहेत. यांपैकी काहींचा प्रसार आशिया खंडातून अमेरिकेत झाला असावा.
या सर्व सरीसृप प्राण्यांच्या भौगोलिक प्रसाराचे समालोचन केल्यावर असे आढळते की, त्याचा विशिष्ट असा आकृतिबंध झालेला नाही. पृथ्वीच्या मुख्य भूभागावर (यूरोप, आशिया, आफ्रिका) त्यांचा क्रमविकास झालेला दिसतो व त्यांतील काही जातींचा अमेरिका व ऑस्ट्रेलिया येथे प्रसार झालेला आढळतो.
पक्षी : हे प्राणी नियततापी (परिसराच्या तापमानात बदल होत असला, तरी ज्यांच्या शरीराचे तापमान एका ठराविक पातळीवर स्थिर असते असे) आहेत आणि जगात सर्वत्र सापडतात. उत्तर व दक्षिण ध्रुवांच्या थंड प्रदेशात व विषुववृत्ताच्या उष्ण प्रदेशातही यांच्या पुष्कळ जाती आहेत. तरीही खारे पाणी व जलवायुमान यांवरच यांचे आकृतिबंध अवलंबून आहेत. पक्ष्यांच्या शेकडा ८५ जाती उष्ण कटिबंधात आढळतात. ध्रुवीय प्रदेशात फारच थोडे पक्षी राहतात. ग्रीनलंड या थंड प्रदेशात पक्ष्यांच्या अवघ्या १४ जाती आढळल्या आहेत. महासागरी बेटांवर मुख्य खंडातील पक्ष्यांपेक्षा थोड्या जातींचे पक्षी आढळतात, तरीही बऱ्याच दूरवरच्या बेटांत पक्षी जाऊन पोहोचले आहेत. याउलट पाण्याने विभागून थोड्या अंतरावर असलेल्या बेटांतील व भूप्रदेशातील पक्षी निरनिराळ्या जातींचे असतात, असेही आढळले आहे. आशिया खंडातून ऑस्ट्रेलियात स्थलांतर करण्यास मधे असलेले मलाया द्वीपकल्प सोईस्कर असूनही आशिया, न्यू गिनी आणि ऑस्ट्रेलिया या ठिकाणचे पक्षी निरनिराळे आहेत. दक्षिण आशियात पक्ष्यांची पुष्कळ कुले आहेत पण त्यांपैकी फक्त काहीच ऑस्ट्रेलियात आढळतात. न्यू गिनी व ऑस्ट्रेलिया येथे असलेली पक्ष्यांची काही कुले इतरत्र कोठेही आढळत नाहीत उदा., कॅसोवेरी (न्यू गिनी) व एमू (ऑस्ट्रेलिया). न्यू गिनी व ऑस्ट्रेलिया या भूप्रदेशांत बऱ्याच पोपटांच्या व कबूतरांच्या जाती आहेत. त्या बाहेरून आलेल्या नसाव्यात. त्यांचा क्रमविकास येथेच झालेला असावा. तृतीय कल्पात दक्षिण अमेरिका खंड बेटासारखे होते. तेथेही स्वतंत्ररीत्या क्रमविकास पावलेल्या पक्ष्यांच्या पुष्कळ जाती आढळतात.
पक्ष्यांच्या पुष्कळ जाती असल्यामुळे त्यांच्या आकृतिबंधांचा अभ्यास करणे कठीण आहे पण त्यातल्या त्यात न उडणाऱ्या पक्ष्यांच्या बाबतीत काही निष्कर्ष काढणे शक्य आहे. सर्व न उडणाऱ्या पक्ष्यांच्या समूहास ‘रॅटाइट’ म्हणतात. या समूहातील पक्षी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जमिनीवरील व दोन भूप्रदेशांतील अडथळे ओलांडून प्रसार पावले असावेत व या नव्या भूप्रदेशात समाभिरूपी क्रमविकासाने [⟶ क्रमविकास] त्याचे नवे गट झाले असावेत. त्यांचे पाच उपसमूहांत विभाजन होऊ शकते व या प्रत्येक उपसमूहाचा विकास निरनिराळ्या वंशजांपासून झाला असावा असे दिसते. हे उपसमूह पुढीलप्रमाणे : (१) आफ्रिकेतील शहामृग – यांचे जीवाश्म दक्षिण यूरेशियात सापडतात, (२) मॅलॅगॅसीमधील नामशेष झालेले हत्ती पक्षी, (३) न्यू गिनीमधील कॅसोवेरी, एमू आणि त्यांचे नामशेष झालेले वंशज, (४) न्यूझीलंडमधील किवी आणि (५) दक्षिण अमेरिकेतील रीआ.
शहामृगाच्या उडणाऱ्या पूर्वजांचे जीवाश्म यूरोपात सापडतात. दक्षिण व मध्य अमेरिकेत आढळणारा व उडणारा टीनमस हा रीआचा पूर्वज असावा. इतर लहान न उडणाऱ्या पक्ष्यांचे उडणारे पूर्वज इतरत्र मोठ्या भूप्रदेशांत न आढळता ते लहान बेटांवर आढळतात. यांपैकी काही नामशेषही झाले आहेत. न्यूझीलंडमध्ये मोआ व किवी हेच न उडणारे पक्षी आहेत असे नाही, तर तेथे न उडणारे असे रेल, हंस, पोपट वगैरे इतरही पक्षी आहेत. मॅस्करीन बेटावरही नामशेष झालेले बरेच न उडणारे पक्षी होते. मॉरिशस बेटावर असलेल्या डोडो या न उडणाऱ्या पक्ष्याशी संबंधी असलेले पक्षी रेयून्यों व रोड्रीगेस या बेटांवर आढळतात. यांचा क्रमविकास जमिनीवरच्या दाणे खाणाऱ्या कबूतरापासून झाला असावा व निरनिराळ्या बेटांवर यांचा प्रसार झाल्यावर त्यांच्या उडणाऱ्या पंखांचा नाश झाला असावा. मॉरिशस बेटावर न उडणारे पोपट आहेत. मलाया द्वीपकल्पात असलेले रेल पक्षी बाजूच्या बेटांवर गेल्यानंतर क्रमविकासाने न उडणारे झाले असावेत.
सस्तन प्राणी : हे प्राणी नियततापी असले, तरी थंड प्रदेशात राहू शकतात पण यांचे आकृतिबंध जलवायुमानावर अवलंबून असतात. या प्राण्यांच्या विविध जाती उष्ण कटिबंधात आढळतात आणि जसजसे आपण उत्तर ध्रुवाकडे व दक्षिण ध्रुवाकडे जाऊ तसतशी यांची संख्या कमी होत जाते. आशिया खंडातील (सुमात्रा, जावा, बोर्निओसहित) उष्ण प्रदेशात सरासरी २५० सस्तन प्राण्यांच्या जाती आहेत. याउलट आशियाच्या ध्रुवीय प्रदेशात फक्त आठ जाती आहेत. उष्ण कटिबंधातील जातींची कुले समशीतोष्ण कटिबंधातील जातींच्या कुलांपेक्षा पुष्कळ आहेत. यूरेशियाप्रमाणेच उत्तर व दक्षिण अमेरिकेत जसजसे आपण उत्तर व दक्षिण ध्रुवाकडे जाऊ लागतो, तसतशी या प्राण्यांची संख्या व विविधता कमी होऊ लागते. नवीन खंडीय बेटावर सस्तन प्राण्यांची संख्या सागरी बेटापेक्षा अधिक असते.
अंडजस्तनीप्राणी : (मोनोट्रिम अंडी घालणारे सस्तन प्राणी). या गणाचे प्लॅटिपस हे प्राणी पूर्व ऑस्ट्रेलियात, तर एकिड्ना हे प्राणी ऑस्ट्रेलिया व न्यू गिनी या ठिकाणी आढळतात. ऑस्ट्रेलियाच्या बाहेर इतरत्र कोठेही हे प्राणी आढळत नाहीत. त्यामुळे त्यांच्या प्रसाराची भौगोलिक माहिती कोठेही मिळत नाही.
शिशुधानप्राणी : (मार्सुपिएल). या प्राण्यांच्या (उदा., कांगारू) मादीच्या उदरावर असलेल्या पिशवीत (शिशुधानीत) पिल्लाची पूर्ण वाढ होते. हे मुख्यत्वे करून ऑस्ट्रेलिया, दक्षिण व मध्य अमेरिका व पूर्व-उत्तर अमेरिकेत आढळतात. यांचे पूर्वज जीवाश्म रूपाने यूरेशिया व उत्तर अमेरिकेत सापडले आहेत. आशिया व उत्तर अमेरिकेतून ते ऑस्ट्रेलिया व दक्षिण अमेरिकेत गेले असण्याची शक्यता आहे. तेथे काही जाती क्रमविकासाने उत्पन्न झाल्या असाव्यात.
कीटकभक्षीप्राणी : (इन्सेक्टिव्होरा). हे प्राणी उत्तर क्रिटेशस कल्पात निर्माण होऊन आफ्रिका, यूरेशिया व उत्तर अमेरिका खंडांत गेले असावेत. ऑस्ट्रेलियात ते आढळत नाहीत व यांपैकी एकच जाती दक्षिण अमेरिकेत आढळते. काही जाती वेस्ट इंडीज, मॅलॅगॅसी व पश्चिम आफ्रिका येथेही आढळतात. श्रू हे प्राणी आफ्रिका, यूरेशिया आणि उत्तर अमेरिका व दक्षिण अमेरिकेतही आहेत, तर छछुंदर (मोल) हे प्राणी यूरेशिया व उत्तर अमेरिकेत आढळतात.
दंतविहीनप्राणी : (एडेंटाटा). या प्राण्यांचे पूर्वज उत्तर अमेरिकेत असावेत पण सध्या जिवंत असलेल्या सर्व जाती दक्षिण अमेरिकेतच आहेत. सध्या अस्तित्वात असलेल्या जाती म्हणजे मुंगीखाऊ, ट्री स्लॉथ व आर्मडिलो या होत.
मांसाहारीगण : (कार्निव्होरा). या गणाचे सस्तन प्राणी सध्या ऑस्ट्रेलियाखेरीज इतर सर्व खंडांत आढळतात. दक्षिण अमेरिकेत त्यांचा प्रसार मायोसीन काळापर्यंत झाला नव्हता. पूर्वी पुष्कळ प्रसार झालेली बरीचशी कुले आता नष्ट झाली आहेत व त्यांचे जीवाश्म आढळतात. या गणात कोल्हा, कुत्रा, लांडगा, मुंगूस, ऊद मांजर, मांजर, वाघ, सिंह व चित्ता या प्राण्यांचा समावेश होतो.
खुरीप्राणी : (अंग्युलेट). ऑस्ट्रेलिया सोडून इतर सर्व खंडांत या प्राण्यांचे जीवाश्म आढळतात. तृतीय कल्पात यांचा मुख्य भूखंडातून दक्षिण अमेरिकेत प्रसार झाला असावा व नंतर मुख्य भूखंडात व दक्षिण अमेरिकेत त्यांचा स्वंतत्र रीत्या क्रमविकास झाला असावा.
पूर्व इओसीन काळात (सु. ५·५ कोटी वर्षांपूर्वीच्या काळात) घोड्यांचे पूर्वज यूरोप व उत्तर अमेरिका येथे असावेत. त्यांचा पुढील क्रमविकास उत्तर अमेरिकेत झाला. सध्याच्या घोड्यांचा वंश प्लायोसीन कल्पात उत्तर अमेरिकेहून एका मार्गाने यूरेशियात व आफ्रिकेत आणि दुसऱ्या मार्गाने दक्षिण अमेरिकेत गेला असावा. या प्रसारानंतर अमेरिकेत त्याचा लोप झाला. या घोड्यांच्या यूरेशियातील वंशजापासून क्रमविकासाने यूरेशियाच्या काही भागांतील व आफ्रिकेतील गाढवे आणि आफ्रिकेतील झीब्रा याची उत्पत्ती झाली असावी.
तृतीय कल्पात टॅपिर हे प्राणी यूरेशियात व उत्तर अमेरिकेत होते. प्लाइस्टोसीन काळात (सु. ६ लक्ष वर्षांपूर्वीच्या काळात) ते आफ्रिकेत गेले पण त्यांचा प्रसार दक्षिण अमेरिकेत झाला नाही. यानंतर त्यांचा प्रसार यूरोप, आशिया, उत्तर व दक्षिण अमेरिका या खंडांच्या समशीतोष्ण प्रदेशांत झाला. यानंतर त्यांच्यातील बऱ्याच जातींचा लोप होऊन फक्त एक जात मलायात आणि तीन दक्षिण अमेरिकेत शिल्लक राहिल्या. गेंडे (ऱ्हिनोसेरॉस) हे प्राणीही प्लाइस्टोसीन काळात आफ्रिका, यूरेशिया आणि उत्तर अमेरिका येथे होते पण ते दक्षिण अमेरिकेत कधीच गेले नाहीत. सध्या त्यांचे दोन वंश आफ्रिकेत व दोन आशियाच्या उष्ण कटिबंधात आढळतात. डुकरे ही फक्त आफ्रिका, यूरेशिया आणि काही पॅसिफिक महासागरातील बेटे यांच्यातच मर्यादित आहेत. ती अमेरिकेत किंवा ऑस्ट्रेलियात नव्हती. त्यांचा प्रसार सर्व खंडांत मानवामुळे झाला. तृतीय कल्पात पाणघोडे (हिप्पोपोटॅमस) हे आफ्रिका, यूरेशिया व उत्तर अमेरिका या खंडांत आढळतात. सध्याचे पाणघोडे फक्त आफ्रिका खंडातच मर्यादित आहेत. प्लाइस्टोसीन काळात उंट यूरेशियात आणि दक्षिण अमेरिकेत होते पण त्यानंतर उत्तर अमेरिकेत ते नाश पावले. सध्या ते आशिया व उत्तर आफ्रिकेत उंट म्हणून व दक्षिण अमेरिकेत लामा म्हणून अस्तित्वात आहेत. ऑलिगोसीन काळात (सु. ३·५ कोटी वर्षांपूर्वीच्या काळात) हरणे यूरेशियात होती व पुढे ती उत्तर अमेरिकेत गेली. प्लाइस्टोसीन काळात ती आफ्रिकेत व दक्षिण अमेरिकेत गेली. सध्या ती यूरेशियाच्या समशीतोष्ण व उष्ण कटिबंधांत विपुल आहेत. जिराफ प्रथम आशिया व आफ्रिका या खंडांत होते. पुढे पूर्व प्लायोसीन काळात ते यूरोपात गेले. पुढे ते आफ्रिकेत उघड्या मैदानात राहू लागले. जिराफाशीच संबंधी असलेले ओकापी हे प्राणी घनदाट जंगलांत राहतात. यांच्यापैकीच प्राँगहॉर्न हे प्राणी उत्तर अमेरिकेत आढळतात.
गोकुल : (बोव्हिडी). या कुलात शेळ्या, मेंढ्या, गुरेढोरे यांचा समावेश आहे. या कुलातील प्राण्यांचा क्रमविकास व प्रसार अगदी अलीकडील काळातील आहे. या प्राण्यांचा उगम आफ्रिका आणि यूरेशिया येथे झाला असावा व तेथून त्यांच्यापैकी काहींचा प्रसार प्लाइस्टोसीन काळात उत्तर अमेरिकेत झाला असावा पण यांच्यापैकी कोणतेही प्राणी दक्षिण आफ्रिकेत गेले नाहीत. दक्षिण अमेरिकेतील खुरी प्राणी तृतीय कल्पातील आहेत व ते इतरत्र असलेल्या खुरी प्राण्यांपेक्षा भिन्न आहेत. यांतील पुष्कळशा प्राण्यांचे जीवाश्म पाहता ते सध्या जिवंत असलेल्या कोणत्याही खुरी प्राण्याशी संबंध दर्शवीत नाहीत. या जुन्या खुरी प्राण्यांपैकी सर्व नामशेष झाले आहेत. सध्या जे जिवंत खुरी प्राणी दक्षिण अमेरिकेत आढळतात ते सर्व जगाच्या इतर भागांतून प्लायोसीन आणि प्लाइस्टोसीन या काळात आले असावेत.
प्रोबॉसिडिया : या गणात हत्तीचा समावेश आहे. यांचा उगम तृतीय कल्पाच्या प्रारंभी आफ्रिकेत झाला आणि मध्य तृतीय कल्पात ते यूरेशियात आले असावेत. मायोसीन ते प्लाइस्टोसीन या काळांच्या दरम्यान अदमासे यांच्या बारा जाती उत्तर अमेरिकेत व प्लायोसीन ते प्लाइस्टोसीनच्या दरम्यान तीन ते चार जाती दक्षिण अमेरिकेत गेल्या असाव्यात. प्लाइस्टोसीनमध्ये हे प्राणी ऑस्ट्रेलिया सोडून सर्वत्र आढळत असावेत. सध्या त्यांच्या दोनच जाती हयात आहेत, त्यांपैकी एक आफ्रिकेत व एक आशियात आहे.
कृंतकगण : हे भक्ष्य कुरतडून खाणारे प्राणी होत. तृतीय कल्पाच्या प्रारंभी या प्राण्यांची निरनिराळी कुले आफ्रिका, यूरेशिया आणि उत्तर अमेरिका येथे होती. यांपैकी एका कुलातील काही वंश तृतीय कल्पाच्या शेवटी व प्लाइस्टोसीन काळात ऑस्ट्रेलियात गेले व त्यांच्यापासून सध्याच्या ऑस्ट्रेलियन कृंतक प्राण्यांचा विकास झाला. दक्षिण आणि उत्तर अमेरिका तृतीय कल्पाच्या शेवटी जेव्हा जमिनीने जोडले गेले तेव्हा दक्षिण अमेरिकेतून काही कृंतक प्राणी उत्तर अमेरिकेत आले. त्यांपैकी सध्या साळीच्या जातीचे कृंतक प्राणी जिवंत आहेत. काही उंदीर व खारी यांचा यूरेशिया व उत्तर अमेरिकेतून दक्षिण अमेरिकेत प्रसार झाला.
वटवाघळे:(बॅट्स). यूरेशिया, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या खंडांच्या उष्ण प्रदेशांत ऑलिगोसीन काळापासून फलभक्षी वटवाघळे आढळतात. यांची प्रसारक्षमता चांगली आहे. त्यामुळे मुख्य भूखंडातून हिंदी व पॅसिफिक महासागरांतील पुष्कळ बेटांवरही यांचा प्रसार झाला आहे परंतु ते अमेरिकेत पोहोचले नाहीत.
बरेच सस्तन प्राणी मायोसीन व प्लायोसीन ह्या काळानंतर नामशेष झाले आहेत. मोठ्या आकारमानाचे बरेच सस्तन प्राणी प्लाइस्टोसीन काळानंतर नष्ट झाले. नजिकच्या काळात जे प्राणी नामशेष झाले, त्याला मानवही कारणीभूत आहे. या प्राण्यांच्या नामशेष होण्यामुळे सध्या जिवंत असलेल्या प्राण्यांच्या भौगोलिक प्रसारामध्ये सातत्य आढळत नाही. सस्तन प्राण्यांच्या प्रसाराचे सिंहावलोकन केले असता असे आढळते की, या प्राण्यांचा फैलाव दोन गणांतील सस्तन प्राण्यांपासून झाला असावा. हे दोन गण म्हणजे (१) अपरास्तनी (ज्यांच्या गर्भाला वार असते असे) व (२) शिशुधान स्तनी हे होत. ऑस्ट्रेलियातील अंडजस्तनी प्राणी सोडता जगातील इतर सर्व सस्तन प्राण्यांचा विकास या दोन गणांपासून झाला असावा. तृतीय कल्पात तीन निरनिराळ्या प्रदेशांत या सस्तन प्राण्यांचा प्रसार झाला असावा. आद्य कीटकभक्षी प्राण्यांचा अपरास्तनी प्राण्यांत विकास होऊन त्यांचा प्रसार आफ्रिका, यूरेशिया आणि उत्तर अमेरिकेत झाला असावा. शिशुधान प्राणी ऑस्ट्रेलियात विकास पावले नंतर काही शिशुधान प्राणी व काही अपरास्तनी प्राणी दक्षिण अमेरिकेत गेले व तेथे विकास पावले.
ऑस्ट्रेलिया व दक्षिण अमेरिका येथील सस्तन प्राणिसमूह जगातील इतरत्र आढळणाऱ्या प्राणिसमूहांपेक्षा पूर्वीचा असावा, अशी एक समजूत आहे. या समजुतीनुसार ऑस्ट्रेलियातील शिशुधान प्राणी हे जगात अपरास्तनी प्राण्यांचा उदय होण्यापूर्वी असावेत, ही समजूत चुकीची आहे. अपरास्तनी प्राणी हे शिशुधान प्राण्यांइतकेच जुने आहेत. सस्तन प्राणी जगाच्या सर्व भागांत एकाच वेळी विकास पावत होते. दुसरीही एक चुकीची समजूत अशी आहे की, सस्तन प्राणी ऑस्ट्रेलिया व दक्षिण अमेरिका या खंडांत ही खंडे जेव्हा जमिनीने मुख्य खंडांशी संलग्न होती तेव्हा गेले असावेत पण या समजूतीसही विशेष आधार नाही. ऑस्ट्रेलिया व दक्षिण अमेरिका येथील प्राण्यांचा विकास, जे काही तुरळक प्राणी पाण्याचे अडथळे ओलांडून त्या प्रदेशांत जाऊ शकले त्यांच्यापासून झाला असावा.
प्राणिजातीवर आधारलेले जगाचे विभाग : वर दिलेल्या प्राण्यांच्या प्रसारावरून असे आढळून येईल की, आफ्रिका, यूरेशिया व उत्तर अमेरिका या खंडांत ज्या पुष्कळ प्रकारच्या प्राणिजाती आहेत त्यांतील बऱ्याच प्राणिजाती ऑस्ट्रेलिया व दक्षिण अमेरिकेत आढळत नाहीत. याउलट ऑस्ट्रेलिया व न्यू गिनी आणि दक्षिण अमेरिका या प्रदेशांत अशा काही प्राणिजाती आहेत की, त्या इतरत्र आढळत नाहीत. हे विचारात घेऊन सर्व जगाचे तीन प्रविभाग पाडता येतील. त्यातील पहिल्या प्रविभागात आफ्रिका, यूरेशिया व उत्तर अमेरिका, दुसऱ्या प्रविभागात दक्षिण अमेरिका व त्याजवळची बेटे आणि तिसऱ्या प्रविभागात ऑस्ट्रेलिया व त्याजवळची बेटे असतील. या विभागणीवर आधारलेले वॉलिस यांचे वर्गीकरण कोष्टक क्र. १ मध्ये दिले आहे व आ. १ मध्ये नकाशारूपाने दर्शविले आहे.
वॉलिस यांनी केलेल्या वर्गीकरणात के. श्मिट यांनी १९५४ मध्ये काही सुधारणा सुचविल्या. त्यांनी वॉलिस वर्गीकरणातील नवउत्तर ध्रुवीय विभागाचे नवउत्तर ध्रुवीय व कॅरिबियन, इथिओपियन विभागाचे इथिओपियन व मॅलॅगॅसी हे उपविभाग पाडले आणि दाक्षिणात्य भूमी प्रविभागाचे ऑस्ट्रेलियन व ओशियानियन असे विभाग पाडून ऑस्ट्रेलियन विभागाचे ऑस्ट्रेलियन व पापुअन आणि ओशियानियन विभागाचे न्यूझीलंडीयन, ओशियानिक व अंटार्क्टिक असे उपविभाग पाडले. तथापि स्क्लेटर-वॉलिस वर्गीकरण मूलतः मान्यता पावलेले असल्यामुळे खालील वर्णन या वर्गीकरणानुसार दिलेले आहे.
कोष्टक क्र. १ प्राणिजातीवर आधारलेले जगातील भूप्रदेशाचे विभाग (वॉलिस वर्गीकरणानुसार)
पहिला प्रविभाग –
विभाग
इथिओपियन
प्राच्य (ओरिएंटल)
पुराउत्तर ध्रवीय (पॅलिआर्क्टिक)
नवउत्तर ध्रुवीय (नीआर्क्टिक)
|
उत्तरभूमी (आर्कटोगीया किंवा मेमॉगीया)
भूप्रदेश
आफ्रिका (सहाराच्या दक्षिणेस), दक्षिण अरेबियाचा काही भाग. आशिया (उष्ण कटिबंध) व त्याजवळची खंडीय बेटे, श्रीलंका, सुमात्रा, जावा, बोर्निओ, तैवान आणि इतर लहान बेटे. उष्ण कटिबंधावरील यूरोप व आशिया, ॲटलास पर्वताचा आफ्रिकेचा उत्तरेकडील समशीतोष्ण कोपरा. उत्तर अमेरिका (मेक्सिकोचा उष्ण प्रदेश सोडून). |
(पुराउत्तर ध्रुवीय व नवउत्तर ध्रुवीय हे दोन्ही प्रदेश एकत्र होलार्क्टिक म्हणूनही दाखविले जातात).
दुसरा प्रविभाग – नवभूमी (निओगीया)
विभाग
नव उष्ण कटिबंध प्रदेश (निओट्रॉपिकल) |
भूप्रदेश
दक्षिण व मध्य अमेरिका, उष्ण मेक्सिको. |
तिसरा प्रविभाग – दाक्षिणात्य भूमी (नोटोगीया)
विभाग ऑस्ट्रेलियन प्रदेश |
भूप्रदेश ऑस्ट्रेलिया व न्यू गिनी व त्यांच्याशी निगडित इतर बेटे. |
इथिओपियनवप्राच्यप्रदेश : या प्रदेशातील प्राणिजातींत खूप वैचित्र्य आढळते. काही प्राणिजाती सारख्या, तर काही खूपच निराळ्या आहेत. उदा., मार्जारमीन व लॅबिरिंथ मासे दोन्ही प्रदेशांत आढळतात, तर फुप्फुसमीन फक्त आफ्रिकेत आणि निरनिराळे सायप्रिनीड प्राच्य प्रदेशात आढळतात. आफ्रिकेत भूवैज्ञानिक दृष्ट्या खूप जुने गोड्या पाण्यातील मासे आढळतात, तर अगदी अलीकडच्या काळातील मासे प्राच्य प्रदेशात आहेत. सिसिलियन, बेडूक व ऱ्हॅकोफोरस हे उभयचर दोन्ही प्रदेशांत आहेत, तर पिपीड फक्त आफ्रिकेत व पेलोबॅटीड फक्त प्राच्य प्रदेशांत आहेत. सर्वसाधारणपणे आफ्रिकेत पुष्कळ सरडे आहेत, तर प्राच्य प्रदेशामध्ये पुष्कळ साप आहेत. दोन्ही प्रदेशांत पुष्कळ पक्षी आहेत. आफ्रिकेत पुष्कळ हनी गाइड, खाटीक पक्षी आणि सूर्य पक्षी आहेत, तर प्राच्य प्रदेशामध्ये पुष्कळ फेझंट व पिट्टा आहेत. आफ्रिकेत शहामृग व गिनी फाउल आहेत, तर प्राच्य प्रदेशात फक्त एकच फेरी ब्ल्यूबर्ड आहे. या दोन्ही प्रदेशांत जुन्या जगातील माकडे, कपी, मोठी मांजरे, हत्ती, गेंडे, रानरेडे, हरणे आणि वटवाघळे आहेत पण आफ्रिकेत असलेले सोनेरी छछुंदर, एलेफंट श्रू, झीब्रा, पाणघोडा व जिराफ हे प्राणी प्राच्य प्रदेशामध्ये नाहीत. याउलट प्राच्य प्रदेशात असलेली अस्वले, हरणे, उडणारे लेमूर व टॅपिर हे प्राणी आफ्रिकेत नाहीत.
पुरावनवध्रुवीयप्रदेश : या प्रदेशात यूरेशियाचा व उत्तर अमेरिकेचा समावेश होतो. यातील माशांच्या जाती वैशिष्ट्यपूर्ण आहेत. उभयचर प्राण्यांपैकी दोन्हीही प्रदेशांत सिसिलियन आढळत नाहीत पण सॅलॅमँडर, बेडूक, भेक व झाडावरचे बेडूक पुष्कळ आहेत. सरीसृप प्राणी, पक्षी व सस्तन प्राण्यांच्या जाती या प्रदेशात इथिओपियन व प्राच्य प्रदेशांच्या मानाने थोड्या आहेत. सरीसृप प्राण्यांचे कोणत्याही कुलातील प्राणी उत्तर समशीतोष्ण प्रदेशात आढळत नाहीत. सस्तन प्राण्यांपैकी छछुंदर, प्राँगहॉर्न व काही कृंतक प्राणी या प्रदेशात आढळतात.
नवाउष्णकटिबंधीप्रदेश : यातील पृष्ठवंशी प्राण्यांच्या जाती वैशिष्ट्यपूर्ण आहेत. या प्रदेशातील पुष्कळशा माशांचे संबंध जुन्या आफ्रिकी माशांशी आहेत. या प्रदेशात सिसिलियन, सॅलॅमँडर, बेडूक वगैरे बरेच उभयचर प्राणी आहेत आणि काहींचे संबंध आफ्रिका, ऑस्ट्रेलिया व उत्तर अमेरिका या खंडांतील जातींशी असावेत असे दिसते. या प्रदेशातील सरीसृप प्राण्यांत कासवे, मगरी वगैरेंचा समावेश आहे. पक्ष्यांच्याही पुष्कळ जाती या प्रदेशात आढळतात. सस्तन प्राण्यांपैकी शिशुधान प्राणी, दंतहीन प्राणी, माकडे व कृंतक प्राणी हे जुने वर्ग व उत्तर अमेरिकेतून आलेले नवे वर्ग येथे आहेत.
ऑस्ट्रेलियनप्रदेश : न्यू गिनी व ऑस्ट्रेलियन या प्रदेशांत जरी नव्या उष्ण कटिबंधी प्रदेशाइतके वैचित्र्यपूर्ण प्राणी नसले, तरी येथील प्राण्यांची काही वैशिष्ट्ये आहेत. येथील मासे खाऱ्या पाण्यातून आलेले आहेत व त्यांच्या जातीही थोड्या आहेत. या माशांत काही फुप्फुसमीनही आहेत. बेडकांच्या फक्त दोन जाती आढळतात. सरीसृप प्राणी पुष्कळ आहेत व त्यांचे संबंध प्राच्य प्रदेशातील प्राण्यांशी असावेत. पक्ष्यांच्या जाती बऱ्याच आहेत. त्यांपैकी पुष्कळांचे संबंध आशियातील जातींशी असावेत. आफ्रिका किंवा दक्षिण अमेरिकेतील पक्ष्यांशी यांचे संबंध आढळून येत नाही. सस्तन प्राण्यांत थोडे अंडजस्तनी, बरेच शिशुधान प्राणी, काही कृंतक प्राणी व काही वटवाघळे आढळतात. शिशुधान प्राण्यांचा क्रमविकास बराच झाला आहे व काही ठिकाणी त्यांनी अपरास्तनी प्राण्यांवर मात केली आहे. क्रमविकासामुळे काही शिशुधान प्राणी लांडगे, उंदीर, खारी व ससे यांप्रमाणे दिसतात. कांगारू हे चरणारे प्राणी आहेत आणि इतर प्रदेशांतील खुरी प्राण्यांची जागा त्यांनी या प्रदेशात घेतल्याचे आढळते.
जेथे जेथे दोन निरनिराळे प्राणिसमूह एकमेकांजवळ येतात, तेथे संक्रमणात्मक जाती दिसून येतात. स्थूलमानाने प्रत्येक प्राणिसमूहाच्या सीमा ठरलेल्या असतात पण काही समूहांतील काही जाती या रेषा ओलांडून जातात.
वॉलिसरेषा: प्राण्यांच्या खंडित प्रसाराचे वॉलिस रेषा हे एक उत्तम उदाहरण आहे. ही काल्पनिक रेषा आग्नेय आशियातील बाली व लाँबॉक या बेटांमधून गेली आहे. प्राणिप्रसाराच्या दृष्टीने ही अगदी लक्ष्मणरेषाच आहे. या दोन बेटांमध्ये फक्त काही किलोमीटरांचेच अंतर आहे, तरीसुद्धा या दोन बेटांत अगदी वेगळी प्राणिसृष्टी दिसते. बाली बेटांच्या उत्तरेस हिंस्र श्वापदे, वानरे व खुरी प्राणी वावरतात, तर लाँबॉक बेटापासून ऑस्ट्रेलियापर्यंत अगदी वेगळ्या अशा शिशुधान स्तनी प्राण्यांची वसाहत नजरेस पडते.
जवळजवळ असणाऱ्या प्रदेशांतील प्राण्यांना जोडणारे (संक्रमणी) प्राणी या दोन प्रदेशांच्या सीमेजवळ आढळतात. हे प्राणी सहसा त्यांनी जोडलेल्या प्राण्यांच्या दर्जाचे असत नाहीत. हे सीमेजवळचे प्रदेश म्हणजे दोन प्रदेशांतील प्राण्यांचे एकमेकांशी होणारे संकर टाळण्याचे अडथळे होत. उदा., अरेबिया व त्याच्या निकटचे प्रदेश हे इथिओपियन व प्राच्य या प्रदेशांतील प्राण्यांना एकमेकांत मिसळण्यात व प्रसार होण्यात येणारे अळथळे होत. सहाराचे वाळवंटही इथिओपियन व पुराउत्तर ध्रुवीय या प्रदेशांतील प्राण्यांच्या प्रसारास अडथळा आहे. या दृष्टिकोनातून वॉलिस रेषा व न्यू गिनीच्या पश्चिम सीमा यांच्यामध्ये असणारा वॉलिसिया या नावाने ओळखला जाणारा प्रदेश म्हणजे प्राच्य व ऑस्ट्रेलियन प्राणिजातींना निराळे ठेवणारा एक मोठा अडथळा आहे. या कल्पनेतून माक्स वेबर यांनी १९३७ मध्ये सुचविलेल्या व त्यांच्याच नावाने ओळखण्यात येणाऱ्या वेबर रेषेचा उगम झाला. ही रेषा वॉलिसिया प्रदेशातून जाते व अडथळे म्हणून गणल्या जाणाऱ्या या बेटांना विभागते. प्राच्य व ऑस्ट्रेलियन हे विभाग दुभागणारी म्हणून ही वेबर रेषा समजली जाते. याउलट प्राच्य आणि पुराउत्तर ध्रुवीय या दोन प्रदेशांत प्राण्यांच्या प्रसारास कसलाही अडथळा नाही.
बेटांचा प्राणिभूगोल : वॉलिस यांनी बेटांचे पुढील दोन विभाग केले : (१) खंडीय बेटे व (२) महासागरी बेटे. त्यांच्या मते खंडीय बेटे हे मूळ खंडापासून विलग झालेले भूप्रदेश होत. या बेटांत खंडीय भूकवचात असलेल्या खडकांसारखे खडक आढळतात. यांतील प्राणी, विशेषतः सस्तन प्राणी व गोड्या पाण्यातील मासे, खंडातील प्राण्यांसारखेच असतात. ब्रिटिश बेटे, जपान, श्रीलंका, तैवान, सुमात्रा, जावा, बोर्निओ, न्यू गिनी, टास्मेनिया व त्रिनिदाद यांचा खंडीय बेटांत समावेश होतो. याउलट महासागरी बेटे समुद्रात (वा महासागरात) उत्पन्न झालेली असतात. त्यांच्या भूकवचात ज्वालामुखी खडक असतात. त्यांच्यावर असलेल्या प्राणिजातीत खंडीय प्रदेशांत असणाऱ्या पृष्ठवंशी व सस्तन प्राण्यांचा अभाव असतो. हवाई बेटे ही या प्रकारची बेटे होत.
या दोन प्रकारच्या बेटांखेरीज इतर काही बेटे अशी आहेत की, ती जरी फार जुनी असली, तरी त्यांचा प्राणिभूगोल खंडीय बेटांपेक्षा निराळा आहे. मॅलॅगॅसी, न्यू कॅलेडोनिया, न्यूझीलंड व खंडप्राय असलेले ऑस्ट्रेलियाचे बेट यांचा या प्रकारात समावेश होतो. या अशा जुन्या बेटांत खंडीय प्रदेशापेक्षा निराळ्या प्राणिजाती असतात, याची दखल वॉलिस यांनी घेतली नव्हती. न्यूझीलंडमध्ये सध्या अस्तित्वात असलेला स्फेनोडॉन हा प्राणी या बेटावरील मध्यजीव महाकल्पातील जीवाश्मांत आढळतो पण याच काळातील खंडीय प्रदेशातील खडकांत याचे अवशेष सापडत नाहीत. फिलिपीन्स व वेस्ट इंडीज हे द्वीपसमूह खंडीय प्रदेशाच्या अगदी जवळ आहेत व म्हणून तेथे खंडीय प्रदेशातील बऱ्याच प्राणिजाती आढळतात. यावरून असे अनुमान निघते की, काही जुन्या बेटांतील त्याच बेटात क्रमविकास झालेले प्राणी सोडून इतर प्राणी, त्यांच्या पाण्यातून पोहून जाण्याच्या अगर पाण्यावरून जाण्याच्या क्षमतेनुसार या बेटांत गेले असावेत.
सागरीप्राणिभूगोल: प्राणिप्रसारानुसार ज्याप्रमाणे जगातील भूप्रदेशाचे विभाग व उपविभाग केले आहेत तितक्या काटेकोरपणे सागरी प्रदेशाचे विभाग व उपविभाग अजून केलेले नाहीत. असे विभाग करण्याचे प्रयत्न अठराव्या शतकाच्या सुरुवातीपासूनच होत आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर सागरी प्राणिसर्वेक्षण व महासागरवैज्ञानिक अभ्यासास राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरुवात झाली. सुरुवातीपासून हिंदी महासागर याबाबतीत बऱ्याच प्रमाणात दुर्लक्षिलेला राहिला होता परंतु आता त्यावरही लक्ष केंद्रित झाल्यामुळे काही वर्षांनी सर्व सागरांचे प्राणिवार विभाग व उपविभाग तयार होतील.
सागरी प्राण्यांचा प्रसार विशेषतः समुद्रप्रवाह, पाण्यातील प्रकाशाचे मान, पाण्याचे तापमान, खोली, खारेपणा वगैरे गोष्टींवर अवलंबून आहे. त्यानुसार सागराचे चार विभाग करता येतात. या विभागांसंबंधीची माहिती कोष्टक क्र. २ मध्ये दिली आहे.
कोष्टक क्र. २ प्राण्यांच्या प्रसारानुसार पडणारे सागरी विभाग
विभाग १) भरती-ओहोटीने भिजणारा किनारा २)सागराचा पृष्ठभाग ३) सूर्यकिरण पोहोचणारा भाग ४) सूर्यकिरण न पोहोचणारा भाग |
खोली — ० ते १० मी. २०० मी. २०० मी. पेक्षा जास्त |
प्राणी खेकडे, गोगलगायी, समुद्रफूल. मासे, खेकडे वगैरेंच्या बाल्यावस्था. मासे मासे, शेवंडे. |
भारताचाप्राणिभूगोल : वॉलिस वर्गीकरणातील प्राच्य विभागात भारताचा समावेश होतो. या खंडप्राय प्रदेशाचे प्राणिवार उपविभाग करणे हे कठीण कार्य आहे. कारण या खंडप्राय प्रदेशाचे संपूर्णपणे प्राणिसर्वेक्षण झालेले नाही. त्यामुळे भारतातील निरनिराळ्या भागांतील प्राण्यांचा एकमेकांशी कोणत्या प्रकारचा संबंध आहे, हे फारसे स्पष्ट झालेले नाही.
आजपर्यंत झालेल्या सर्वेक्षणावरून असे अनुमान काढता येते की, भारतातील प्राण्यांचे पूर्व यूरोप, आफ्रिका व मलेशिया या ठिकाणच्या प्राण्यांशी फारच साम्य आहे. यामुळे प्राणिभूगोलदृष्ट्या भारतातील प्राण्यांची उत्पत्ती, प्रसार व परस्परसंबंध यांबद्दल ठामपणे काही सांगता येत नाही.
इतिहास : भारताचे प्राणिवार उपविभाग करण्याचा दृष्टीने जर्डन यांनी १८६२ साली पहिला प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी पक्षिप्रसार विचारात घेतला होता. त्यानंतर गुंथर यांनी १८६४ मध्ये सरीसृप प्राण्यांच्या प्रसारानुसार उपविभाग सुचविले. १८७० मध्ये डब्ल्यू. टी. ब्लॅनफोर्ड या भूवैज्ञानिक व प्राणिभूगोलविज्ञांनी जमिनीवरील गोगलगायींना प्राधान्य देऊन नवीन उपविभाग तयार केले. इल्यूइस या पक्षितज्ञांनी १८७३ मध्ये पक्षिप्रसाराचे संशोधन करून जर्डन यांच्या उपविभागांत काही बदल सुचविले. १८८८ मध्ये ब्लॅनफोर्ड यांनी सस्तन प्राणिवर्गाचा प्रसार विचारात घेऊन उपविभाग पाडले. १९११ मध्ये एन्. ॲनन्डेल, १९२१ मध्ये ख्रिस्तोफर्स व १९२३ मध्ये टी. ए. स्टीफनसन यांनी गोड्या पाण्यातील स्पंज, ॲनॉफेलीस डास व गांडूळ या प्राण्यांचा प्रसार विचारात घेऊन उपविभागांच्या नवीन मर्यादा शास्त्रज्ञांपुढे ठेवल्या. त्यानंतर १९३१ मध्ये मालकम स्मिथ व १९३५ मध्ये बी. सी. महेंद्र यांनी अनुक्रमे सरीसृप व उभयचर प्राणिवर्गाच्या प्रसाराच्या साहाय्याने नवीन उपविभाग सुचविले. अजून शास्त्रज्ञांच्या दृष्टीने सर्वमान्य उपविभाग तयार झाले नाहीत. त्यामुळे प्रचलित असलेले उपविभाग व त्यांतील प्राणिसृष्टीची माहितीच पुढे दिली आहे.
भारताच्या उपविभागांत सामावलेला प्रदेश, त्यातील प्राणिसृष्टी व त्या प्राणिसृष्टीचे जगातील प्राणिसृष्टीशी साम्य वगैरे माहिती कोष्टक क्र. ३ मध्ये दिली आहे.
कोष्टक क्र. ३. भारतातील प्राणिभौगोलिक उपविभाग व त्यांतील प्राणिसृष्टी
उपविभाग (१) हिमालयाचा परिसर (अ) हिमालयाची वृक्षरहित बर्फाच्छादित शिखरे प्रदेश – लडाख, तिबेट. जुन्या उत्तर ध्रुवीय प्रदेशातील प्राण्यांशी साम्य (आ) हिमालयाच्या उतारावरील घनदाट अरण्ये प्रदेश – काश्मीर ते भूतान आफ्रिकेतील प्राणिसृष्टीशी साम्य (इ) हिमालयाच्या पायथ्यालगतचा दलदलीचा व गवताळ प्रदेश
(२) गंगा सिंधू नद्यांचा परिसर (अ) वालुकामय प्रदेश प्रदेश – पंजाब, राजस्थान, गुजरात. (आ) गंगा-यमुना परिसर प्रदेश – मध्यप्रदेश, उ. प्रदेश, बिहार, पं. बंगाल. ब्रह्मदेशातील प्राणिसृष्टीशी साम्य (इ) आसाममधील जंगलांचा भाग
(३) द्वीपकल्पाचा प्रदेश (अ) दख्खन प्रदेश – पश्चिम घाट आणि पूर्व घाटामधील पठारी टापू, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तमिळनाडू व कर्नाटक. (आ) मलबार प्रदेश – तापी नदीपासून ते त्रावणकोरपर्यंत पश्चिम घाटाचा डोंगराळ प्रदेश.
|
प्राणिसृष्टी
तिबेटी मेंढी, भराल, याक.
वाघ, हत्ती, गवा, सांबर, काश्मीरी मृग.
रानरेडे, चितळ, डुक्कर, हरिण, बारशिंगा.
वाळवंटी कोल्हा, ससा, जरबिल, हरिण, कुरंग (गॅझेल). बारशिंगा, गेंडा.
रानरेडा, गेंडा.
हरिण, नीलगाय, कोल्हा,लांडगा, सांबर, चितळ, हत्ती.
सरीसृप, उभयचर, सिंहपुच्छ माकड, लोरिस, लंगूर.
|
या उपविभागांत पूर्व यूरोप, आफ्रिका, मलेशिया या ठिकाणच्या प्राण्यांची भेसळ दृष्टीस पडते. त्यामुळे ब्लॅनफोर्ड यांनी काही प्राणिसमूहांस ‘आर्य घटक’ असे नाव दिले आहे, कारण आर्य लोकांप्रमाणे या प्राण्यांनी दक्षिणेकडे स्थलांतर केले असावे आणि मूळच्याच स्थायी समूहाला द्रविड घटक असे नामाभिधान दिले आहे.
पहा : परिस्थितिज्ञान पुराप्राणिविज्ञान.
संदर्भ : 1. Allee, W. C. Schmidt, K. P. Ecological Animal Geography, New York, 1951.
2. Darlington, P. J. Zoogeography : The Geographical Distribution of Animals, New York, 1957.
3. Prasad, B, Zoogeography of India, 1942.
4. Pratter, S. H. Wild life of Indian Empire, Journal of the Bombay Natural History Society, Bombay, 1933.
5. Wilma, G. Animal Geography, London, 1962.
केतकर, श. म. इनामदार, ना. भा.
“