प्रस्वेदन : काही घन पदार्थांच्या अंगी असलेला, हवेतील आर्द्रता (ओलेपणा) शोषून घेण्याचा गुण. असे पदार्थ पाण्यात विरघळणारे असतात. त्यामुळे त्यांना पृष्ठभागावर हवेतील बाष्पाचे संद्रवण (वाफेचे पाण्यात रूपांतर) होऊन जेव्हा सूक्ष्म जलबिंदू तयार होतात त्या वेळी त्या जलबिंदूंत पदार्थ विरघळतो व त्याचा संतृप्त (पदार्थ विरघळण्याची कमाल मर्यादा गाठलेला) विद्राव तयार होतो. या विद्रावातील पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग हवेतील बाष्पाच्या संद्रवण क्रियेच्या वेगापेक्षा कमी असतो. म्हणजेच संतृप्त विद्रावातील पाण्याचा आंशिक बाष्पदाब हवेतील जल बाष्पाच्या आंशिक बाष्पदाबापेक्षा कमी असतो. म्हणून हवेतील अधिकाधिक बाष्प पदार्थाच्या पृष्ठावर द्रवरूप होत जाते व त्यात अधिकाधिक पदार्थ विरघळत जातो. विद्रावाचा बाष्पदाब आणि हवेतील बाष्पाचा दाब यांमध्ये समतोल निर्माण होईपर्यंत हवेतून आर्द्रताशोषणाची क्रिया चालू राहते.

प्रस्वेदनाचा वेग पदार्थपरत्वे वेगवेगळा असतो. तथापि पदार्थाचा जास्त पृष्ठभाग उघडा असेल व हवा जास्त दमट असेल, तर प्रस्वेदन जास्त त्वरेने घडते.

एखाद्या पदार्थात प्रस्वेदी पदार्थाची भेसळ असली तर मूळ पदार्थ ओला होऊन त्याच्या गुठळ्या बनतात किंवा तो पाझरतो. अशुद्ध मिठात मॅग्नेशियम क्लोराइड ह्या प्रस्वेदी पदार्थाची अशुद्धी असते व त्यामुळेच ते पाझरते. मोठे खडे असलेल्या मिठापेक्षा दळलेले मीठ जास्त लवकर पाझरते तसेच उन्हाळ्यापेक्षा पावसाळ्यात ते लवकर पाझरते, याचा खुलासा वरील विवेचनावरून होईल. घट्ट झाकणाच्या बरण्यांत ते कमी पाझरते कारण त्याचा हवेशी संपर्क तुटतो हे होय.

झिंक क्लोराइड, फेरिक क्लोराइड, कॅल्शियम नायट्रेट, कॅल्शियम क्लोराइड, मॅग्नेशियम क्लोराइड, सोडियम हायड्रॉक्साइड व ॲल्युमिनियम क्लोराइड हेक्झॅहायड्रेट ही प्रस्वेदी पदार्थांची काही उदाहरणे होत.

कॅल्शियम क्लोराइड व मॅग्नेशियम क्लोराइड यांचा उपयोग प्रयोगशाळेतील काही उपकरणांत हवा कोरडी राखण्यासाठी केला जातो. तळघरातील दमट हवा कोरडी व्हावी म्हणून व रस्त्यावरील धुरळा सर्वत्र उडू नये म्हणून कोरडी कॅल्शियम क्लोराइडाची भुकटी वापरतात.

शेजवलकर, वा. ग.