प्रसूति-पूतिज्वर : प्रसवोत्तर काळात (प्रसूतीनंतर गर्भाशयाचे निवर्तन होईपर्यंत म्हणजे मूळचे आकानमान पुन्हा प्राप्त होईपर्यंतच्या काळात, सहा ते आठ आठवडे) ३८° से. किंवा जास्त तापमान चोवीस तास किंवा जास्त वेळ टिकून राहणाऱ्या, प्रसूतीनंतर किंवा गर्भस्रावानंतर (गर्भधारणेनंतर ३ ते ७ महिन्यांपर्यंतच्या काळात होणाऱ्या गर्भपातानंतर) चौदा दिवसांच्या आत उद्भवणाऱ्या, बहुतकरून जननमार्गाच्या सूक्ष्मजंतु-संक्रमणापासून होणाऱ्या ज्वराला ‘प्रसूति-पूतिज्वर’किंवा ‘बाळंत रोग’म्हणतात. इंग्लंड व वेल्समधील ‘प्युएरपेरल पायरेक्सिया रेग्युलेशन्स, १९५१’या कायद्यावर आधारित अशी वरील व्याख्या भारतात आजही उपयोगात आहे. तिकडे हा रोग ‘अधिसूचनीय’म्हणजे रोग्याची माहिती योग्य त्या आरोग्याधिकाऱ्यास कळविण्याचे वैद्यकीय व्यावसायिकांवर बंधन आहे. पाश्चात्य वैद्यकातील ⇨रासायनी चिकित्सेच्या उपयोगानंतर या रोगाचे प्रमाण बरेच घटले आहे. गर्भारपण व प्रसूती यांत स्त्रियांच्या संख्येपेक्षा प्रसवोत्तर काळात अधिक स्त्रिया मृत्यू पावतात.
प्रसवोत्तर काळात ज्वर येण्याची पुढील कारणे आहेत : (१) प्रसूति-पूतिता : जननमार्गाच्या जखमांचे सूक्ष्मजंतु-संक्रामण (२) मूत्रमार्ग जंतु-संक्रामण : (अ) मूत्राशय शोथ (मूत्राशयाची दाहयुक्त सूज), (आ) मूत्रद्रोण-वृक्क शोथ (मूत्रनलिकेचा श्रोणितील–ओटीपोटातील–भाग व मूत्रपिंड यांची दाहयुक्त सूज) (३) स्तनांचे जंतुसंक्रामण (४) मध्योद्भवी जंतु-संक्रामण : मध्येच उद्भवणारे (अशक्तपणा, रक्तक्षय यांसारखा आजार चालू असताना सुरु होणारे) तीव्र श्वासनलिका शोथ, ⇨ न्यूमोनिया, क्षय वगैरे रोग (५) वेदनायुक्त श्वेत शोथ : पायातील मोठ्या नीलेच्या शोथामुळे उद्भवणारी सूज.
प्रस्तुत नोंदीत फक्त जननमार्गाच्या सूक्ष्मजंतू-संक्रामणजन्य विकृतीची माहिती दिली आहे.
इतिहास : या विकृतीविषयी फार प्राचीन काळापासून माहिती असावी. सुश्रुत व वाग्भट या आयुर्वेदाचार्यांनी तिचा ‘सूतिका रोग’असा उल्लेख केला आहे. सुखप्रसूतीनंतर कधीकधी व कष्ट प्रसूतीनंतर पुष्कळ वेळा हा रोग संभवतो, असे त्यांनी नमूद केले आहे. हिपॉक्राटीझ (इ. स. पू. सु. ४६०–३७५) या प्राचीन ग्रीक वैद्यांनी या रोगाचे वर्णन केले आहे. १७९५ मध्ये स्कॉटलंडमधील ॲलेक्झांडर गार्डन यांनी लिहिलेल्या ट्रिटाइज ऑन द एपिडेमिक प्युएरपेरल फीव्हर ऑफ ॲबरडीन या पुस्तकात या रोगाच्या कारणाविषयी आधुनिक विचारांशी जुळणारे विचार प्रथम मांडले. ‘हवेतील अनिष्टकारक घटकांमुळे’हा रोग होतो, हा त्यांच्या काळातील गैरसमज घालवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. हा रोग एका रोग्याकडून दुसऱ्याकडे तपासणाऱ्या किंवा प्रसूती करणाऱ्या सुईणी वाहून नेतात व तो सांसर्गिक असल्याचा भरपूर पुरावा मिळाला आहे. या गार्डन यांच्या विधानामुळे सुईणी संतापल्या व गार्डन अप्रिय झाले. १८४३ मध्ये ओ. डब्ल्यू. होम्स यांनी अमेरिकेत आणि आय्. पी. सिमेलव्हाईस यांनी व्हिएन्ना येथे याच रोगासंबंधी स्वतंत्रपणे काही विचार मांडले [⟶जंतुनाशके पूतिरोधके]. लूई पाश्चर यांनी १८७९ मध्ये हा रोग सूक्ष्मजंतूजन्य असल्याचे दाखवून दिले.
संप्राप्ती : रोगकारणांचा विचार पुढील तीन विभागांत विभागता येतो : (अ) संक्रामक सूक्ष्मजंतूंचे प्रकार, (आ) संक्रामणाचे मूळ आणि (इ) प्रवृत्तिकर कारणे.
संक्रामक सूक्ष्मजंतूंचे प्रकार : यांचे पुढील तीन प्रकार आहेत : (२) ऑक्सिजीवी : (जगण्यासाठी व वाढ होण्यासाठी ज्यांना मुक्त ऑक्सिजन आवश्यक असतो असे) हीमोलिटिक स्ट्रेप्टोकोकाय ग्रेड ए (रक्तातील तांबड्या पेशींतील हीमोग्लोबिन हे रंगद्रव्य अलग करू शकणारे स्ट्रेप्टोकोकाय सूक्ष्मजंतू). (२) अनॉक्सिजीवी : स्ट्रेप्टोकोकाय, स्टॅफिलोकोकाय, एश्चेरिकिया कोलाय. (३) विशिष्ट सूक्ष्मजंतू : नायसरिया गोनोऱ्हिया [परम्याचे सूक्ष्मजंतू ⟶ परमा], क्लॉस्ट्रिडियम वेल्चाय [वायुकोथाचे सूक्ष्मजंतू ⟶ कोथ], क्लॉस्ट्रिडियम टेटॅनी [धनुर्वाताचे सूक्ष्मजंतू ⟶ धनुर्वात]. वरील प्रकारांपैकी कोणताही एक किंवा अधिक सूक्ष्मजंतू मिळून रोग उत्पन्न होतो.
संक्रामणाचे मूळ : हे (१) अंतर्जात, (२) आत्मजात अथवा (३) बहिर्जात असू शकते.
(१) अंतर्जात संक्रामण अनॉक्सिजीवी स्ट्रेप्टोकोकायमुळे होते. योनिमार्गात हे सूक्ष्मजंतू असतात व बहुसंख्य वेळा या रोगास कारणीभूत असतात.
(२) आत्मजात संक्रामणामध्ये शरीराच्या इतर भागांतील सूक्ष्मजंतू रक्तप्रवाहातून वाहत जाऊन जननमार्गात वाढून रोग उत्पन्न करतात. उदा., पायोरिया या हिरड्यांच्या रोगाचे सूक्ष्मजंतू किंवा केसतूट या रोगाचे सूक्ष्मजंतू. बहुतकरून स्ट्रेप्टोकॉकस हीमोलिटिकस व क्लॉस्ट्रिडियम वेल्चाय हे सूक्ष्मजंतू अशा प्रकारच्या संक्रामणास कारणीभूत असतात.
(३) बहिर्जात संक्रामणास स्ट्रेप्टोकोकाय व स्टॅफिलोकोकाय कारणीभूत असतात. बिंदुक संक्रामण (दूषित व्यक्तीच्या नाक व घसा या भागातील सूक्ष्मजंतू खोकल्याच्या उबळीबरोबर बाहेर पडणाऱ्या असंख्य बारीक थेंबांतून जवळच्या दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात शिरणे), रोग्यांनी वापरलेल्या वस्तू, रोग्यांची योनिमार्ग तपासणी इ. गोष्टी बहिर्जात संक्रामणास कारणीभूत होतात.
प्रवृत्तिकर कारण : (१) वय, सर्वसाधारण आरोग्य, थकवा वगैरेंवर रोग्याची प्रतिकारशक्ती अवलंबून असते.
(२) स्थानीय प्रतिकारशक्ती योनिमार्गातील स्रावाच्या पीएच मूल्यावर [⟶पीएच मूल्य] अवलंबून असते. [⟶प्रदर].
प्रथमगर्भा स्त्रीमध्ये गर्भाशयाच्या ग्रीवेचे (मानेसारख्या भागाचे) तोंड श्लेष्मस्रावाच्या (बुळबुळीत स्रावाच्या) बुचासारख्या गोळ्यामुळे बंद असते. त्यामुळे सूक्ष्मजंतूंचा गर्भाशयात प्रवेश होत नाही. प्रसूतीच्या वेळी कळा सुरू होताच हा गोळा बाहेर फेकला जातो व सूक्ष्मजंतूंना आत शिरण्याची संधी मिळते. म्हणून दीर्घप्रसूतीत संक्रामणाचा धोका अधिक असतो.
(३) प्रसूतीचा प्रकार : प्राकृतिक (सर्वसाधारण) प्रसूतीनंतर जननमार्गातील ऊतकाचे (समान रचना व कार्य असलेल्या पेशींच्या समूहाचे) विदारण जेव्हा अत्यल्प असते तेव्हा अंतर्जात संक्रामणाविरुद्ध संरक्षणात्मक योजना पुरेशा असतात. तरीदेखील स्ट्रेप्टोकॉकस हीमोलिटिकस मारक पूतिता उत्पन्न करू शकतात. एवढेच नव्हे, तर ८०% ते ९०% मृत्यू या सूक्ष्मजंतूंच्या संक्रामणामुळेच होत असत. कष्टप्रसूती किंवा दीर्घप्रसूती, प्रमाणापेक्षा जादा ऊतक इजा, जरूरीपेक्षा जास्त वेळा केली गेलेली योनिमार्ग तपासणी, संदंश (गर्भाच्या डोक्यास पकडावयाचा विशिष्ट चिमटा) लावून केलेली प्रसूती, मस्तक छेदन (विशिष्ट उपकरणांनी गर्भाच्या डोक्यास भोक पाडून त्याचे आकारमान लहान करावयाची शस्त्रक्रिया) आणि गर्भाशयात हात घालून वार बाहेर काढणे या सर्व गोष्टी सूक्ष्मजंतूंच्या संक्रामणास मदत करतात.
विकृतिस्थाने : प्रसूति-पूतितेची विकृतिस्थाने पुढीलप्रमाणे असू शकतात : (१) जननमार्ग : (अ) वारस्थान : यामुळे तीव्र गर्भाशयांतशोथ आणि तीव्र गर्भाशयशोथ उत्पन्न होतो. (आ) गर्भाशय ग्रीवा : सौम्य स्वरूपाचे संक्रामण. सूक्ष्मजंतू तीव्र विषयुक्त असल्यास संक्रामण आजूबाजूच्या ऊतकात फैलावते. (इ) विटप (स्त्रीच्या बाह्य जननेंद्रियाच्या अवतीभवती असलेला भाग) व योनिमार्ग : या भागांच्या प्रसूतिजन्य विदारित जखमांमध्ये संक्रामण होते. (२) जननमार्गाच्या बाहेरील स्थाने : (अ) श्रोणी : श्रोणिभागात संक्रामण फैलावून परागर्भाशय संयोजी ऊतकशोथ (योनिमार्गाच्या वरील गर्भाशयाच्या तंतुमय अस्तराचा शोथ), श्रोणि-पर्युदरशोथ (उदरातील इंद्रियांवर पसरलेल्या पातळ पटलाच्या श्रोणीशी संबंधित असलेल्या भागाचा शोथ), तीव्र अंडवाहिनी-अंडाकोशशोथ (स्त्रीबीजे उत्पन्न करणारी ग्रंथी आणि ती गर्भाशयात वाहून नेणारी नलिका यांचा शोथ), श्रोणि-नीलाशोथ या विकृती उद्भवतात. (आ) श्रोणिबाह्य : ⇨जंतुविषरक्तता, ⇨ पूयरक्तता आणि पायातील नीलाक्लथनशोथ (नीलेमध्ये रक्ताची गुठळी अडकल्यामुळे उद्भवणारा शोथ).
अलीकडील प्रतिजैव (अँटिबायॉटिक) औषधांच्या वापरापासून संक्रामण न फैलावता जननमार्गापुरते मर्यादित ठेवता येते.
लक्षणे : जोरदार संक्रामण असल्यास प्रसूतीनंतर ताबडतोब आणि सौम्य असल्यास पहिल्या आठवड्यात तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी रोगाची सुरुवात होते. अलीकडे पूर्वीप्रमाणे रोगस्वरूप गंभीर न आढळता सौम्य प्रकार व तोही कधीकधीच आढळतो. थंडी वाजून ज्वर येतो. डोकेदुखी, भूक मंदावणे, उलट्या, चेहरा फिका पडणे, हृदयाच्या गतीत वाढ होणे ही लक्षणे आढळतात. पर्युदरशोथात ओटीपोटात दुखते. योनिमार्ग व विटप भागात वेदना होत असल्यास त्या भागाचे संक्रामण असावे. सूतिस्राव [प्रसवोत्तर काळात योनिमार्गातून येणारा स्त्राव ⟶ प्रसवोत्तर परिचर्या] प्रमाणापेक्षा कमी होतो किंवा वाढून दुर्गंधीयुक्त बनतो. कमी सूतिस्राव गंभीर रोगाचे द्योतक असतो. गर्भाशय उदर परिस्पर्शनाने (पोटावरून हाताने चाचपडून) तपासल्यास मऊ, आकारमानाने मोठे व स्पर्शासह्य (स्पर्श सहन न होणारे) असते.
निदान : रोग्याची संपूर्ण शारीरिक तपासणी व पुढील प्रयोगशालीय तपासण्या आवश्यक असतात : (१) रक्त तपासणी : रक्तातील पांढऱ्या कोशिकांची (पेशींची) संख्या वाढलेली असून त्यांत बहुरूप कोशिकांचे (ज्यांतील केंद्रकाचे म्हणजे कोशिकेतील प्रक्रियांवर नियंत्रण ठेवणाऱ्या गोलसर पुंजांचे अशा प्रकारे खंड पडलेले असतात की, कोशिकेत अनेक केंद्रके असल्यासारखे वाटते, अशा कोशिकांचे) आधिक्य आढळते. (२) रक्ताची जंतुसंर्वधन तपासणी : रोग्याच्या नीलेतील रक्त काढून त्याची ऑक्सिजीवी आणि अनॉक्सिजीवी सूक्ष्मजंतूंकरिता करावयाची तपासणी. (३) मूत्र तपासणी : सुषिरीने (रबरी किंवा धातूच्या नळीने) मूत्राशयातून मूत्र काढून करण्यात येणारी तपासणी. (४) गर्भाशय ग्रीवा व योनिमार्ग स्राव तपासणी : गर्भाशयात उपकरण घालून कापसाचा बोळा स्रावात भिजवून तपासण्याची केव्हाही गरज नसते. फक्त ग्रीवा व जवळचा (म्हणजे वरचा) योनिमार्ग स्राव तपासल्यास पुरतो. सूक्ष्मदर्शकीय व जंतुसंर्वधन परीक्षा करतात.
चिकित्सा : सर्वसाधारण चिकित्सेत पुढील गोष्टींचा समावेश होतो. (१) रोग्यास खेळती हवा असणाऱ्या खोलीत पूर्ण विश्रांत द्यावी. (२) झोपेकरिता योग्य ती शामक औषधे द्यावीत. (३) पचनास हलका परंतु भरपूर कॅलरीयुक्त आहार द्यावा. (४) तोंडाने भरपूर पाणी व जरूर पडल्यास नीलेतून लवण-विद्राव द्यावा. (५) बद्धकोष्ठावर किंवा अतिसारावर इलाज करावा. (६) रक्तक्षयात लोह द्यावे. (७) आईपासून मूल अलग ठेवावे.
विशिष्ट चिकित्सेकरिता ॲम्पिसिलीन (जिलेटीनवेष्ट, कॅपसूल) २५० मिग्रॅ. दर सहा तासात १ वेष्ट द्यावे. सूक्ष्मजंतू तपासणीनंतर योग्य ते प्रतिजैव औषध द्यावे. विटप जखम शिवलेली असल्यास व ती दूषित झालेली असल्यास काही टाके काढून टाकून निचरा होऊ द्यावा. वारेचा तुकडा आत राहून गेला असल्यास बोटाने काढून टाकावा. योनिमार्ग कोणत्याही द्रवाने फवारू नये.
प्रतिबंधात्मक उपाय : प्रसूति-पूतिज्वर हे अजूनही मातृक विकृतीचे व मृत्यूचे कारण असल्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय महत्त्वाचे ठरतात. हे उपाय तीन कालखंडांत विभागता येतात : (१) प्रसवपूर्व काल, (२) प्रसूतिकाल आणि (३) प्रसवोत्तर काल. यांपैकी प्रसवपूर्व काल व प्रसवोत्तर काल यांमध्ये करावयाच्या उपायांसंबंधीची माहिती अनुक्रमे ‘प्रसवपूर्व परिचर्या’व ‘प्रसवोत्तर परिचर्या’या नोंदींत दिली आहे. प्रसूतिकालामध्ये पूर्ण निर्जंतुकीकरण, योनिमार्ग तपासणी टाळणे, प्राकृतिक प्रसूतीमध्ये उल्बकोश (भ्रूणाभोवती सगळ्या बाजूंनी बंद असलेली कोशिकामय पातळ पटलाची पिशवी) शक्यतो लवकर फुटू न देणे, कष्टप्रसूतीमध्ये ऊतकाला इजा शक्य तो कमी होण्याकडे लक्ष पुरविणे आणि ऊतक विदारण झाल्यास शक्य तो लवकर योग्य उपाय योजणे यांचा समावेश होतो.
भालेराव, कमल य. भालेराव, य. त्र्यं.
आयुर्वेदीय चिकित्सा : या रोगात बाळंतपणात ज्वर येण्याला सुरुवात होते. अशा वेळी नागरमोथा, हळद, दारूहळद इ. योनिदोषहर व दोषपाचक असा मुस्तादिगणाचा काढा द्यावा. योनिदोष, ज्वर व वेदनाहर महायोगराज गुग्गुळू, आल्याचा रस व साखर ह्यांतून द्यावा. मुस्तादिगणाचा योनीमध्ये बस्तीही द्यावा.
बाळंतिणीच्या शरीरात जेव्हा ज्वर मुरतो, जीर्ण होतो तेव्हा सुवर्णमालिनी वसंत वर्धमान पिंपळीबरोबर द्यावा, ह्या विकाराबरोबर रसक्षीणेतची वा शुक्रक्षीणतेची लक्षणे असल्यास ती चिकित्सा करावी. नारायण तेलाचा किंवा निर्गुंड्यादि तेलाचा अभ्यंग करावा.
पटवर्धन, शुभदा अ.
संदर्भ : 1. Baird, D. D.Ed., Combined Textbook of Obstetrics and Gynaecology, Edinburgh, 1962.
2. Dawn, C. S. Textbook of Obstetrics, Calcutta, 1974.
“