प्रशिखा : भूगोलविज्ञानातील या संज्ञेचा अर्थ तीव्र उताराच्या बाजू असलेले कटक (डोंगररांग). प्रशिखेच्या दोन्ही बाजू जवळजवळ उभ्या कड्यासारख्या असतात. हिमालय, आल्प्स वगैरेंच्या हिमाच्छादित भागांत दोन हिमगव्हरांच्या उभ्या बाजू हिमानी क्रियेने झिजून विरुद्ध दिशांनी एकत्र आल्यामुळे प्रशिखा तयार होतात. यांनाच अमेरिकेत ‘कोम्-रिज’ म्हणतात. अनेक हिमगव्हरे एकमेकांच्या शेजारी पाठीला पाठ लागून असली, म्हणजे त्यांच्या उभ्या कडा झिजत जाऊन त्यांमधील भागाची रुंदी खूपच कमी होते आणि हिमगव्हरांचे उभे भाग एकमेकांस भिडून शिखरासारखे टोकदार गिरिशृंग तयार होते. स्वित्झर्लंड व इटली यांच्या सीमेवरील ⇨ मॅटरहॉर्न हे याचेच उदाहरण होय.

कुमठेकर, ज. ब.