प्रवाळभस्म : घरगुती पित्तनाशक औषध. औषधाकरिता घ्यावयाचे प्रवाळ लाल चिकण चकचकीत असावे. रेषायुक्त, पांढरे, काळे, अन्य द्रव्य निगडित वा पोकळ असे नसावे. जितके आकारमानाने मोठे तितके चांगले. हे रत्न समजले जाते. [⟶ पोवळे]. प्रवाळांच्या शुद्धीकरिता ते लिंबुरस व चौपट पाणी यांत २४ तास ठेवावे व मग ते धुवून घ्यावे. शुद्ध केलेले प्रवाळ जाळून भस्म करून वापरावे. असे भस्म अग्निवर्धक होते परंतु प्रवाळाची पिष्टी करूनच बहुतेक वापरतात. पित्ताने विशेषतः अम्लपित्ताने डोके दुखणे, वांती, रसक्षीणतेने हृदयात दुखणे, धडधडणे, चक्कर येणे, अस्थिक्षीणता इत्यादींवर प्रवाळभस्म उपयुक्त आहे.
जोशी, वेणीमाधवशास्त्री