प्रयोगशाळेतील प्राणी : सजीवामध्ये प्राकृतिक (नेहमीच्या), तसेच रोगी अवस्थेतील शरीरात होणाऱ्या क्रियांचा अभ्यास करण्यासाठी प्रयोगशाळांतून विविध प्राण्यांचा वापर करण्याची प्रथा आहे, अशा प्राण्यांना प्रयोगशाळेतील प्राणी म्हणतात. अशा अभ्यासासाठी शास्त्रीय व मानवतावादी दृष्टिकोनांतून मानवाशिवाय इतर प्राण्यांचा वापर करण्यात येतो. वैद्यकशास्त्रातील सर्व शाखांच्या अभ्यासासाठी अशा प्राण्यांचा सर्रास वापर झाल्याचे दिसून येते. बेडूक, उंदीर, घुशी, गिनीपिग (उंदराच्या जातीतील प्राणी), ससे, हॅमस्टर (कुरतडून खाणारा उंदरासारखा प्राणी), कोंबड्या, कबूतरे, कुत्री, माकडे हे प्राणी सामान्यपणे वापरण्यात येतात. यांशिवाय अभ्यासाच्या विशिष्ट हेतूनुसार आणखी काही प्राण्यांचा वापरही होत असतो. अमेरिकेमध्ये दरवर्षी २ कोटी ८० लाख उंदरांचा व २५ लाख माकडांचा उपयोग होतो.

शरीरक्रियाविज्ञानामधील (शरीरातील क्रिया कशा प्रकारे घडून येतात याच्या अभ्यासाच्या शास्त्रामधील) बहुतेक प्रयोग कुत्र्यावर करण्यात आले आहेत. छाती व हृदयावरील शस्त्रक्रियेतील प्रगती, रक्ताधान (रक्त देणे) व प्लाविकेच्या (रक्तातील पेशी ज्यात लोंबकळत असतात अशा रक्ताच्या द्रव भागाच्या) बदली वापरता येतील अशा पदार्थांच्या संशोधनाबाबतचे प्रयोग, चयापचयातील (शरीरात सतत होणाऱ्या भौतिक-रासायनिक घडामोडींतील) विकृतीमुळे मनुष्यामध्ये होणाऱ्या मधुमेह, मारक पांडुरोग व ⇨डिसन रोग यांवरील संशोधनातील प्रगती हे कुत्र्यावर केलेल्या प्रयोगांमुळेच शक्य झाले. अवसाद (तीव्र आघातानंतर दिसून येणारा सार्वदेहिक प्रक्षोभ) व दूषित जखमांचे शरीरावर होणारे परिणाम यांबाबतीतील पहिल्या महायुद्धानंतर कुत्र्यावर झालेल्या संशोधनामुळे दुसऱ्या महायुद्धात हजारो सैनिकांचे प्राण वाचविणे शक्य झाले. अन्नामध्ये मिसळावयाच्या पदार्थांची युक्तायुक्तता, औषधे, जैव पदार्थ, प्रदूषण, जीवनसत्त्वे, सौंदर्यप्रसाधने यांच्या संशोधनासंबंधीच्या प्रयोगांत उंदीर, घुशी, गिनीपिग, कुत्री व माकडे या प्राण्यांचा उपयोग झाला व आजही होत आहे. आनुवंशिकीचा अभ्यास ⇨ ड्रॉसोफिला या फळमाशीवरील प्रयोगांनी केला गेला. अंतराळ प्रवासामध्ये मानवावर होणाऱ्या परिणामांचा अंदाज घेण्यासाठी कुत्री व माकडे यांसारख्या प्राण्यांचा वापर करण्यात आला. रशियाने १९५७ मध्ये स्पुटनिक-२ या अवकाश यानात ६ किग्रॅ. वजनाची कुत्री, तर ज्युपिटर या अमेरिकेने पाठविलेल्या यानात दोन माकडे पाठविली होती. या प्राण्यांना पाठविण्यापूर्वी योग्य ते प्रशिक्षण देण्यात आले होते.

औषधे तयार करणाऱ्या कारखान्यांना तिथे तयार होणाऱ्या औषधांचा दरएक संच मनुष्यात वापरण्याआधी प्राण्यावरील प्रयोगांनी मनुष्यात वापरण्यासाठी सुरक्षित असल्याबद्दलची चाचणी करणे आवश्यक असते. उदा., प्रतिजैव (अँटिबायॉटिक) औषधांच्या प्रत्येक संचातील नमुन्यांची सशावर व उंदरावर चाचणी घ्यावी लागते. सशावरील तपासणीमुळे औषध बनविताना ताप आणणारे अशुद्ध घटक औषधात राहिलेले नाहीत याची खात्री पटते, तर उंदरावरील चाचणीमुळे त्यात काही विशारी पदार्थ नाहीत, याबद्दल माहिती मिळते. औषध टोचल्यावर रक्तदाब कमी होणार नाही याबद्दलची माहिती कुत्र्यामधील चाचणीने मिळते. कॉर्टिकोट्रोपिक [अधिवृक्क बाह्यकाला उत्तेजित करणाऱ्या ⟶ अधिवृक्क ग्रंथी]औषधांच्या प्रत्येक संचाची ससे, उंदीर, कुत्रे, कोंबड्या व घुशी या प्राण्यांवरील प्रयोगांनी तपासणी होते. जीवनसत्त्वांचे मूल्यमापन प्रयोगशाळेतील प्राण्यांवर करण्यात येते. जीवनसत्त्वांच्या शरीरवाढीवर होणाऱ्या परिणामाचे मापन उंदीर, कुत्रे, गिनीपिग आणि कोंबड्या या प्राण्यांवर करतात. क जीवनसत्त्वासंबंधीचे प्रयोग उंदरीणीवर करतात. या प्राण्यांना जीवनसत्त्वरहित अन्न देण्यात येते व जीवनसत्त्वन्यूनतेमुळे दिसणाऱ्या लक्षणांचा अभ्यास करतात. त्यानंतर मर्यादित मात्रेत पुन्हा जीवनसत्त्व देण्यात येते व न्यूनतेमुळे दिसणारी लक्षणे नाहीशी होतात की काय ते पाहतात. सौंदर्यप्रसाधाने प्रायोगिक प्राण्यांच्या त्वचेवर घासून लावून विक्षोभ वा अधिहृषतेची [एखाद्या बाह्य पदार्थाच्या दुसऱ्या संपर्काच्या वेळी दिसून येणारी विकृत प्रतिक्रिया ⟶ॲलर्जी]लक्षणे दिसतात काय ते पाहतात. अमेरिकेच्या औषधिकोशाच्या पंधराव्या आवृत्तीमध्ये १६८ हून अधिक औषधांच्या प्रकारांची नोंद असून त्यांच्या चाचणीसाठी, विशेषतः सुरक्षितता, प्रभावीपणा व उपयुक्तता यांकरिता, कुठच्या ना कुठच्या प्राण्यावर चाचणी घेणे आवश्यक असते. गेल्या काही वर्षांत वैद्यकशास्त्रामधील किंवा जैव पदार्थाविषयी झालेल्या आश्चर्यकारक प्रगतीमध्ये प्राण्यांवरील प्रयोगांचा समावेश नाही, अशी एकही बाब दाखविता येणार नाही.

प्रयोगासाठी कोणता प्राणी योग्य आहे, हे त्या प्रयोगाच्या हेतूवर अवलंबून असते. एखाद्या सूक्ष्मजंतूची तीव्रता अधिक तीव्र करावयाची असल्यास ज्या प्राण्याच्या शरीरामध्ये हे सूक्ष्मजंतू सहज वाढतील असाच प्राणी उपयुक्त ठरतो. प्लेगच्या सूक्ष्मजंतूंच्या प्रयोगाच्या वेळी गिनीपिगांपेक्षा उंदीर उपयुक्त ठरतात. तसेच विषासंबंधीच्या प्रयोगात ससा अगर गिनीपिगापेक्षा उंदीर अधिक उपयुक्त असतात. रोगनिदानासाठी गिनीपिग हा प्राणी सर्वसामान्यपणे उपयुक्त असल्यचे दिसून आले आहे. व्हायरसाच्या वाढीसाठी कोंबडीच्या अंड्यातील कोवळे गर्भ किंवा आईचे दूध पीत असलेली उंदराची पिले उपयोगात आणतात. काही विशिष्ट प्रकारच्या चाचण्यांसाठी विशिष्ट वयांचे व वजनाचे प्राणी घेणे आवश्यक असते. वर उल्लेखिलेल्या चाचण्यांसाठी कोणता प्राणी अधिक उपयुक्त ठरेल, हेही निरनिराळ्या प्राण्यांवरील प्रयोगांतून माहीत होते.

बहुतेक लसउत्पादन केंद्र, औषधे तयार करण्याचे कारखाने किंवा वैद्यकीय संशोधन केंद्र त्यांना लागणाऱ्या प्रयोगशाळेतील प्राण्यांचा नियमित पुरवठा व्हावा यासाठी त्यांचा स्वतंत्र प्रजनन विभाग स्थापन करतात. अलीकडे प्रयोगशाळेतील प्राणी निर्जंतुक असावेत या दृष्टीने पाश्चात्य देशांतील अशा प्रजनन विभागांचे प्रयत्न होत आहेत. याकरिता सूक्ष्मजंतुविरहित वातावरणात असे प्राणी वाढविण्याचे तंत्र विकसित करण्यात आले आहे. या तंत्रानुसार शस्त्रक्रिया करून मादीच्या गर्भाशयातूनन पिले बाहेर काढण्यात येऊन त्यांना निर्जंतुक केलेल्या वातावरणात वाढविण्यात येते. असे प्राणी प्रयोगासाठी वापरल्याने प्रयोगाचे निष्कर्ष अधिक बिनचूक मिळू शकतात, असा दावा करण्यात आला आहे. ⇨ ऊतकसंवर्धन (समान रचना व कार्य असलेल्या पेशींचा समूह शरीराबाहेर कृत्रिम रीत्या वाढविण्याच्या) तंत्राचा अधिकाधिक वापर होऊ लागल्यापासून प्रयोगशाळांमध्ये प्राण्यांच्या ऐवजी अशा कृत्रिम रीत्या वाढविलेल्या ऊतक पेशींचा वापर वाढत असून प्राण्यांचा वापर कमी होऊ लागला आहे.

मानवाच्या रोगराईच्या संबंधात त्याच्या स्वास्थ्यासाठी प्रयोगशाळेत प्राणी वापरणे क्षम्य मानले, तरी सौंदर्यप्रसाधने, लाकडाला व जमिनीला चकाकी आणण्यासाठी, तसेच मुलांच्या खेळण्याच्या संबंधात वापरण्यासाठी बनविलेली रसायने यांकरिताही अनेक प्राणी वापरण्यात येतात वा मारले जातात, हे कितपत सयुक्तिक आहे असा प्रश्न पडतो. लढाईत वापरल्या जाणाऱ्या शस्त्रास्त्रांच्या चाचणीच्या संबंधातही असे प्राणी वापरण्यात येतात. अती द्रुतगती गोळ्यांच्या चाचणीसाठी शेकडो मेंढ्यांचा उपयोग केला जातो. अशा प्राण्यांचे अनन्वित हाल होतात, हे तर गर्हणीयच मानले पाहिजे. प्राण्यांवरील काही प्रयोगांत, विशेषतः प्रायोगिक शस्त्रक्रियेसाठी वापरलेल्या प्राण्यांना इजा पोहोचते, त्रास होतो व कधीकधी मृत्यूही येतो. म्हणून अशा प्रयोगांचे समर्थन जीवदयेच्या दृष्टिकोनातून करणे कितपत योग्य होईल, हा वादाचा मुद्दा आहे.


कायदे : एकोणिसाव्या शतकाच्या मध्याच्या सुमारास प्रयोगासाठी प्राण्यांचा वापर करण्यास विरोध होऊ लागला. याच सुमारास क्लोद बेर्नार (१८१३–६८) या फ्रेंच संशोधकांनी शरीरक्रियाविज्ञानासंबंधी प्राण्यांवर केलेल्या प्रयोगांद्वारे केलेल्या प्रगतीमुळे वैद्यकशास्त्राचा बराच फायदा झाला, ही गोष्टही जनमानसासमोर होती. तरीसुद्धा जिवंत प्राण्यावरील विच्छेदनविषयक प्रयोगांना संघटित विरोध होऊ लागला. खुद्द बेर्नार यांची पत्नी व मुलगी अशा संघटनेच्या नेत्या बनल्या.

इंग्लंडमध्ये सोसायटी फॉर प्रोटेक्शन ऑफ ॲनिमल्स लाएबल टू व्हिव्हिसेक्शन नावाची एक संस्था १८७५ मध्ये स्थापन करण्यात आली. या संबंधात १८७५ व १९०६ साली असे दोन शाही आयोग ग्रेट ब्रिटनमध्ये नेमण्यात आले व १८७६ साली प्राण्यांचा क्रौर्यबंदी कायदाही करण्यात आला. या कायद्यान्वये प्रयोगशाळेतील प्राण्यांच्या वापरावर काही बंधने घालण्यात आली. स्तनी प्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणी, मासे व बेडकासारखे उभयचर (जमिनीवर व पाण्यातही राहणारे) प्राणी या कायद्याच्या कक्षेत येतात अपृष्ठवंशी (ज्यांना पाठीचा कणा नाही असे) प्राणी येत नाहीत. प्राण्यावर प्रयोग करण्यासाठी गृहखात्याकडून परवाना घ्यावा लागतो. तसेच शस्त्रक्रियाविज्ञाला सरावासाठी प्राण्यांचा वापर करण्याला बंदी आहे तथापि शस्त्रक्रियाशास्त्राच्या प्रगतीसाठी प्राण्याचा वापर करण्याला प्रतिबंध नाही पण अशा वेळी शुद्धिहारक द्रव्यांचा वापर केलाच पाहिजे, असा दंडक आहे. घोडे, गाढवे, खेचरे, कुत्री व मांजरे या प्राण्यांच्या वापरासाठी स्वतंत्र परवाना घेणे जरूर आहे. सिडनी लिट्लवुड यांच्या अध्यक्षतेखाली १९६३ मध्ये प्राण्यांवरील प्रयोगाबाबत एक समिती नेमण्यात आली. समितीने १९६५ मध्ये केलेल्या शिफारशींनुसार कायद्याचे पालन व्हावे यासाठी निरीक्षकांची संख्या वाढविण्यात आली. ब्रिटनमध्ये या कायद्याचे पालन चोख पण संयमाने करण्यात येते. यामुळे प्रायोगिक प्राण्यांना जीवदयेच्या दृष्टिकोनातून वागणूक मिळते आणि शास्त्रीय प्रयोगांतही खंड पडत नाही. वैद्यकशास्त्राच्या प्रगतीसाठी प्राण्यांवरील प्रयोगांची उपयुक्तता लक्षात घेऊन या प्राण्यांना कमी कमी इजा कशी पोहोचेल किंवा कमीत कमी प्राणी वापरले जातील, याची दक्षता घेण्यासाठीच हे कायदे मुख्यत्वे असल्याचे दिसून येते.

अमेरिकेमध्ये प्राण्यांवरील प्रयोगांना बंदी करण्यासंबंधी १८९७ पासून कायदा करण्याचे निष्फळ प्रयत्न झाले परंतु बऱ्याच राज्यांनी १९४५ नंतर कुत्री व मांजरे यांच्या व्यापारावर, विशेषतः प्रयोगांसाठी पुरविल्या जाणाऱ्या प्राण्यांच्या व्यापारावर, कायद्याने निर्बंध घातले. १९६६ मध्ये अमेरिकन काँग्रेसने कायदा करून हे निर्बंध ससे, गिनीपिग, हॅमस्टर व नरवानर गणातील (प्रायमेट्स गणातील) मनुष्य सोडून सर्व प्राण्यांना लागू केले.

कॅनडा, पाकिस्तान, द. आफ्रिका, न्यूझीलंड व यूरोपमधील फ्रान्स, नेदर्लंड्स, पोर्तुगाल, ग्रीस, यूगोस्लाव्हिया व रशिया या देशांत प्रायोगिक प्राण्यांच्या बाबतीत कायद्याचे काहीही बंधन नाही. इतर काही देशांत प्राण्यावर प्रयोग करण्यासाठी कायद्याने परवाना घेणे आवश्यक आहे, तसेच प्रयोगाची टाचणे व नोंदवह्या ठेवणे कायद्याने बंधनकारक आहे. ऑस्ट्रेलियातील सर्व राज्यांत कायदे केलेले आहेत पण ते पाळले जातात का नाही यासाठी निरीक्षक मात्र नाहीत.

भारतामध्ये प्राण्यांच्या क्रौर्यबंदी कायद्यामध्ये १९६० साली सुधारणा करून चवथ्या परिच्छेदात प्रयोगशाळेतील प्राण्यांचा समावेश करण्यात आला. त्यानुसार केंद्र शासनाने एक समिती (कमिटी फॉर द परपज ऑफ कंट्रोलिंग अँड सुपरवायझिंग एक्सपेरिमेंट्स ऑन ॲनिमल्स) स्थापन करून या प्राण्यांना संरक्षण व स्वास्थ्य देण्याच्या दृष्टीने देशातील सर्व प्रयोगशाळांना बंधनकारक राहतील, असे नियम केले आहेत. या समितीचे अधिकारी प्रयोगशाळांची वारंवार तपासणी करून या नियमांचे योग्य पालन होते की नाही, याची खात्री करून घेतात व हे नियम पाळणे भाग पाडतात. [⟶ प्राण्यांविषयीची निर्दयता].

बालपक्षाघाताच्या (पोलिओच्या) लसीच्या चाचणीसाठी व इतर अनेक प्रकारच्या जीववैद्यकीय संशोधनासाठी भारतातून अमेरिका व इतर देशांना ऱ्हीसस जातीची माकडे निर्यात करण्यात येत होती परंतु ही माकडे अण्वस्त्रांसंबंधीच्या संशोधानाकरिता वापरण्यात येत असल्याच्या संशयामुळे एप्रिल १९७८ नंतर या निर्यातीवर बंदी घालण्यात आली.

प्रयोगशाळेतील प्राण्यांचे रोग : ससे, उंदीर, घुशी, गिनीपिग व हॅमस्टर या प्राण्यांना काही संसर्गजन्य रोग होतात. यांत बदराणुजन्य रोग, साल्‌मोनेलोसिस, टॉक्सोप्लाझ्मोसिस हे रोग उंदीर, घुशी, गिनीपिग व ससे या प्राण्यांना तर पाश्चुरलोसिस व स्पायरोकीटोसिस हे सशांना होणारे प्रमुख रोग आहेत. सर्वसाधारणपणे अशा रोगांवर उपाययोजना श्रेयस्कर नसते. बहुधा रोगी व संस्पर्शित असे सर्व प्राणी मारून टाकतात. रोगप्रसारामुळे होणारे आणखी नुकसान तरी यामुळे टळते.

दीक्षित, श्री. गं.