प्रयाग : उत्तर प्रदेशातील गंगा–यमुना संगमावरील तार्थस्थान. प्रयाग म्हणजेच अलाहाबाद. हे यमुनेच्या डाव्या तीरावर असून पूर्वीपासून ‘तीर्थराज प्रयाग’ म्हणून ओळखले जाते. वाल्मिकी रामायणापासून पुराणांपर्यंत त्याचे ग्रांथिक उल्लेख आढळतात.
हरवलेले चारही वेद परत मिळाल्यावर प्रजापतीने येथे यज्ञ केला, म्हणून यास ‘प्रयाग’ असे म्हणतात. त्याविषयी इतरही अनेक आख्यायिका प्रचलित आहेत. येथील गंगा, यमुना व सरस्वती यांच्या त्रिवेणी संगमावर दर वर्षी माघमेळा व दर बारा वर्षांनी ⇨ कुंभमेळा भरतो. सरस्वती नदी प्रत्यक्ष दाखविता येत नाही म्हणून ती गुप्तरूपाने आहे असे म्हणतात. त्रिस्थळी यात्रेपैकी हे एक असून धार्मिक दृष्ट्या याचे स्थान अद्वितीय आहे. त्रिवेणीमाधव, सोमेश्वर, वासुकीश्वर, प्रयागवेणीमाधव अशी अनेक तीर्थस्थाने या क्षेत्राच्या परिसरात असून येथील जुन्या किल्ल्याच्या तळघरात प्राचीन अक्षय्यवटाचे खोड अजून दाखवितात. या वृक्षावरून मोक्षार्थी यात्रिक नदीत देह टाकीत, असे नमूद केलेले आहे. वेणीदान तसेच श्राद्धादी धार्मिक विधी येथे केले जातात.
जानेवारी १९७९ मध्ये येथे विश्व हिंदू परिषद भरली होती.
पहा : अलाहाबाद, तीर्थक्षेत्रे व तीर्थयात्रा.
कापडी, सुलभा
“