प्रतिध्रुवस्थ : पृथ्वीच्या पृष्ठभागावर एकमेकांच्या बरोबर विरुद्ध बाजूंस असणारी ठिकाणे. पृथ्वीवरील कोणतेही ठिकाण व पृथ्वीचा मध्य यांना जोडणारी सरळ रेषा तशीच पुढे वाढविली असता ती पृष्ठभागाला ज्या बिंदूत मिळते, तो बिंदू पहिल्या ठिकाणाचा प्रतिध्रुवस्थ होय. म्हणजेच पृथ्वीच्या व्यासाच्या दोन टोकांवरील ठिकाणे अगर प्रदेश एकमेकांचे प्रतिध्रुवस्थ असतात. इंग्रजी ‘ॲन्टिपोडीझ’ हा शब्द ग्रीक ‘ॲन्टिपाउस’ (पायाची विरुद्ध बाजू) या संज्ञेवरून आला आहे. उत्तर गोलार्धातील ब्रिटिश लोक दक्षिण गोलार्धातील प्रदेशाविषयी (विशेषतः ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड) अथवा लोकांविषयी वर्णन करताना प्रामुख्याने या शब्दाचा वापर करतात. एखाद्या ठिकाणचे जितके अक्षांश असतील तितक्याच, परंतु विरुद्ध गोलार्धातील अक्षांशावर आणि त्या ठिकाणापासून १८०° रेखांश अंतरावर त्याचा प्रतिध्रुवस्थ असतो. सर्वसाधारणपणे लंडनचा प्रतिध्रुवस्थ न्यूझीलंडजवळच्या ज्या बेटांजवळ येतो, त्या बेटांस अँटिपडीझ बेटे (४९° ३८’ द. अक्षांश, १७८° ३०’ पू. रेखांश) असे नाव आहे. मात्र या बेटांचा अगदी अचूक प्रतिध्रुवस्थ हा लंडनपेक्षा फ्रान्समधील शेअरबुर्गच्या जवळच (४९° ३८’ उ. अक्षांश, १° ३०’ प. रेखांश) आहे. प्रतिध्रुवस्थांची इतर काही उदाहरणे अशी : अंटार्क्टिक महासागरातील केर्गेलेन बेटांचा (४९° ३०’ द. अक्षांश, ७०° पू. रेखांश) प्रतिध्रुवस्थ कॅनडाच्या ॲल्बर्टा प्रांतातील मेडसन हॅटच्या आग्नेयीस (४९° ३०’ उ. अक्षांश, ११०° प. रेखांश) आहे तर हिंदी महासागरातील सेंट पॉल बेटांचा (३८° ४२’ द. अक्षांश, ७७° ३४’ पू. रेखांश) प्रतिध्रुवस्थ कोलोरॅडो राज्यातील शायेन वेल्सच्या जवळ (३८° ४२’ उ. अक्षांश, १०२° २६’ प. रेखांश) आहे. प्रतिध्रुवस्थांचे ऋतू एकमेकांविरुद्ध असतात व त्यांच्या स्थानिक वेळांत बारा तासांचे अंतर असते. पृथ्वीवर ढोबळमानाने भूभागाच्या प्रतिध्रुवस्थापाशी जलभाग आढळतो.
कुमठेकर, ज. ब.