प्रतापरेड्डि, सुरवरम् : (१८९६-१९५३). आंध्र प्रदेशाच्या तेलंगण विभागातील एक प्रसिद्ध लेखक व नेते. त्यांचा जन्म बोरवेल्ली येथे झाला. शिक्षण एल्एल्.बी. पर्यंत हैद्राबाद आणि मद्रास येथे झाले. १९२४ सालापासून वकिलीव्यवसाय. त्यांनी संस्कृत भाषेचाही सखोल अभ्यास केला. निजामाच्या कारकीर्दीत तेलुगू भाषेची बरीच गळचेपी होत होती. त्यामुळे तेलुगू भाषेच्या उद्धारासाठी ते बद्धपरिकर झाले. १९३० साली जोगीपेट येथे जी पहिली आंध्र महासभा झाली, तिचे ते अध्यक्ष होते. मद्रासला कायद्याचा अभ्यास करीत असतानाच त्यांचा वेदम् वेंकटराय शास्त्री व मानवल्ली रामकृष्ण कवी या विख्यात पंडितांशी परिचय झाला. सर्व तऱ्हेचे ज्ञान तेलुगू भाषेत आले पाहिजे, या जिद्दीने त्यांनी अनेक विषयांवर सु. ९०० निबंध लिहिले तसेच राजकीय दृष्टीने लोकमत जागृत करण्यासाठी अनेक पुस्तकेही लिहिली. मद्यपानमु (१९२०), हिंदुवुल पंडगलु (हिंदूंच्या सणांसंबंधी माहिती देणारा ग्रंथ – १९३०), मोगलाईकथलु (१९३१), ग्रामजनदर्पणमु (१९३१), प्राथमिकस्वत्वालु (१९३८), यजाधिकारमुलु (१९३८), आंध्र सांघिकचरित्रमु (आंध्रांचा सामाजिक इतिहास-१९४९) इ. विविध विषयांवर त्यांनी ग्रंथ लिहिले. त्यांच्या आंध्र सांघिकचरित्रमुस साहित्य अकादेमीचा पुरस्कार मरणोत्तर दिला गेला. संघोद्धरणमु (१९३०) या ग्रंथात त्यांनी मूर्तिपूजा, जातिभेद इ. सामाजिक दोषांवर प्रहार केले. त्यांनी ‘विज्ञानवर्धिनी परिषद’ स्थापन करून तिच्यामार्फत अनेक विषयांवर सार्वजनिक चर्चा घडवून आणल्या. वकिलीव्यवसाय करत असतानाच त्यांनी ‘रेड्डिविद्यार्थिवसतिगृहा’चा कार्यभार अनेक वर्षे सांभाळला. प्रतापरेड्डी हे केवळ रेड्डी जातीचेच नव्हे, तर सर्व देशभक्तांचे स्फूर्तिस्थान होते. प्रतापरेड्डी यांनी विज्ञानाच्या प्रचारासाठी ग्रंथालय चळवळ सुरू केली आणि अनेक ग्रंथालयांची स्थापना केली. तसेच १९४० साली त्यांनी त्यावर ग्रंथालयोद्यममु हे मार्गदर्शक पुस्तकही लिहिले. आंध्र सारस्वत परिषद स्थापन करण्यातही त्यांनी उत्साहाने भाग घेतला.
हे सर्व करीत असतानाच त्यांनी आयुर्वेदाचाही अभ्यास केला व आयुर्वेदावर लहान लहान पुस्तिका लिहिल्या. विज्ञानाचा प्रसार करण्याचे वृत्तपत्र हे एक प्रमुख साधन आहे, हे लक्षात घेऊन त्यांनी गोलकोंडा पत्रिका (मे १९२६) हे अर्धसाप्ताहिक सुरू केले. त्यामध्ये निरनिराळ्या विषयांवर त्यांनी लेख लिहिले व विद्वानांचे दर्जेदार लेखही प्रकाशित केले. १९५१ पर्यंत त्यांनी चिकाटीने हे अर्धसाप्ताहिक चालविले. गोलकोंडाकविसंचिका या संग्रहात त्यांनी तेलंगण विभागातील अनेक जुन्यानव्या कवींची काव्ये प्रकाशित केली. त्यांनी नाटककाव्याच्या क्षेत्रातही प्रवेश केला. शुद्धान्तकान्तमु (१९१७), चंपकीभ्रमरविषादमु (१९१७), भक्ततुकाराम (१९२४), उच्छलविषादमु (१९३३) इ. त्यांच्या ललितकृती प्रसिद्ध आहेत. त्यांची ‘गडि वच्चेनु, सिंहमु चच्चेनु’ (गड आला पण सिंह गेला) ही ऐतिहासिक कथा फारच प्रसिद्ध आहे.
तेलंगण विभागात विज्ञानाचा व तेलुगू साहित्याचा प्रचार करून निजामाच्या विरोधाची तमा न बाळगता प्रतापरेड्डी यांनी विज्ञानप्रचाराचे जे कार्य आजन्म केले, ते विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते.
लाळे, प्र. ग.
“