प्रकॉप्येफ्स्क : रशियन सोव्हिएट फेडरेटेड सोशॅलिस्ट रिपब्लिकच्या केमेरोव्हो या प्रांतातील प्रमुख शहर व खाणकेंद्र. लोकसंख्या २,६७,००० (१९७७). हे ट्रान्स-सायबीरियन लोहमार्गाशी जोडलेले असून नोव्होकुझनेट्स्कच्या वायव्येस सु. ३२ किमी. ॲबा नदीकाठी वसले आहे. १९१७ च्या रशियन क्रांतीनंतर येथील खाणकेंद्राचा शोध लागला. कुझनेट्स्क कोळसाक्षेत्रातील या शहरी समृद्ध कोळसाखाणी असून, येथे मुख्यतः अँथ्रॅसाइट कोळशाचे साठे आहेत. अठराव्या शतकातील या छोट्याशा गावाचा विकास रशियाच्या पहिल्या पंचवार्षिक योजनेपासून (१९२८) अधिकच झपाट्याने झाला.
उरल आणि सायबीरिया येथील लोखंड व पोलाद कारखान्यांना येथूनच कोळसा पुरविला जातो. शहरात रसायने, अन्नपदार्थ, कृषिअवजारे इ. उद्योगधंदे असून खाणउपकरणे व खाणींसाठी लागणारे दिवे यांचेही येथे उत्पादन होते. कोळसा संशोधन केंद्रही शहरात आहे.
तरटे, विमल