बुद्धमंदिर,

प्नॉमपेन : ख्मेर (कांपुचिया) प्रजासत्ताकाची राजधानी. लोकसंख्या १,००,००० (१९७६ अंदाज). हे हो-चि-मिन्ह नगराच्या (सायगावच्या) वायव्येस २०० किमी. मेकाँग आणि टॉनेल सॅप या नद्यांच्या संगमावर वसले आहे. देशातील सात महामार्ग येथून जात असून हे रेल्वे प्रस्थानक आणि हवाई वाहतूक केंद्र आहे. हे समुद्रकिनाऱ्यापासून २९० किमी. आत असले, तरी मेकाँगच्या खोऱ्यातील प्रमुख नदीबंदर आहे. १३७१ च्या सुमारास हे शहर वसविण्यात आले. येथील टेकडीच्या (प्नॉम) उतारावर पेन्ह नावाच्या एका स्त्रीला ब्राँझची बुद्ध मूर्ती सापडली. तिच्या दर्शनासाठी तेथे भाविक लोक येऊ लागले. यावरूनच यास ‘प्नॉमपेन’ हे नाव पडले. १४३४ मध्ये पोन्हीआ येत नावाच्या राजाने येथे राजधानी केली.

त्यानंतर अनेकदा ती येथून हलविण्यात आली. पुढे १८६५ मध्ये राजा पहिला नरोदम याने पुन्हा येथेच कायम राजधानी केली. दुसऱ्या महायुद्धात जपान्यांनी ती जिंकली होती. देशातील १९७० सालच्या यादवी युद्धामुळे येथे निर्वासितांनी फार मोठ्या प्रमाणावर वस्ती केली होती. राज्याकारभाराचे व राजनिष्ठ लोकांचे हे केंद्र असल्यामुळे यादवी युद्धकाळात यास वारंवर लष्करी कारवायांस तोंड द्यावे लागले. सप्टेंबर १९७२ मध्ये बंडखोरांनी सहा महामार्ग व मेकाँग नदीचा किनारा यांचा ताबा घेऊन प्नॉमपेनची नाकेबंदी केली त्यामुळे शहरात अन्नधान्य समस्या निर्माण झाली होती. परिणामी शहरात दोन दिवस बेबंदशाही निर्माण होऊन पुष्कळ लूट करण्यात आली. १९७४ मध्ये शहरावर रॉकेटचा प्रचंड मारा करण्यात येऊन १९७५ च्या प्रारंभी त्याचा बाह्य जगाशी जवळजवळ सर्व संपर्क तोडण्यात आला होता.

देशाचे हे प्रमुख व्यापारी केंद्र आहे. सुकी मासळी, मिरी, कापूस इत्यादींचा येथे व्यापार चालतो. कापड उद्योग, शेतमालावरील प्रक्रिया, कातडी वस्तू, थंड पेये इ. उद्योगांचा येथे विकास झाला असून भात सडण्याच्या अनेक गिरण्या आहेत. हे देशाचे सांस्कृतिक व शैक्षणिक केंद्र आहे. येथे नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ प्नॉमपेन, युनिव्हर्सिटी ऑफ फाइन आर्ट्‌स, तंत्रविद्या विद्यापीठ, बुद्धिस्ट युनिव्हर्सिटी इ. महत्त्वाच्या शैक्षणिक संस्था आहेत. येथे राष्ट्रीय सैनिक अकादमी आहे. जुना राजवाडा, कला संग्रहालय यांसारखी प्रेक्षणीय स्थळे आहेत.

लिमये, दि. ह. गाडे, ना. स.