पोर्त-ओ-प्रिन्स : हैती प्रजासत्ताकाची राजधानी व प्रमुख बंदर. लोकसंख्या ४,७५,१८७ (१९७५). हे हिस्पॅनीओला बेटाच्या पश्चिम भागात गॉनाईव्ह आखाताच्या शिरोबिंदूवर वसले आहे. लोहमार्ग, रस्ते व हवाईमार्ग यांचे हे केंद्र असून उबदार हवामानाकरिता प्रसिद्ध आहे. फ्रेंचांनी १९४९ मध्ये ‘एल् लोपीताल या नावाने याची स्थापना केली. पुढे १७७० मध्ये त्यांनी सांतो दोमिंगो या त्या वेळच्या फ्रान्सच्या भरभराटलेल्या वसाहतीची ही राजधानी बनविली. भूकंप, आगी व यादवी युद्ध यांमुळे तिचे फारच नुकसान झाले.

पोर्त-ओ-प्रिन्स हे सुरक्षित बंदर असून हैतीचा ६०% व्यापार (कॉफी, साखर, रम, मळी, कोको, केळी, हस्तोद्योग-वस्तू तसेच बाष्पनशील तेले) येथूनच चालतो. हैतीच्या औद्योगिक, आर्थिक व राजकीय जीवनाचे हे केंद्र आहे. याच्या आसमंतात होणाऱ्या विपुल ऊस उत्पादनामुळे येथे साखर उद्योगाची भरभराट झाली असून कापड, सिमेंट, मद्ये, कातडी वस्तू, तंबाखूचे पदार्थ इ. उद्योगांचाही विकास झाला आहे. पर्यटन उद्योगाचा विकास देशाच्या राजकीय घडामोडींवर निर्भर आहे.

अत्याधुनिकता व सुखासीनता त्याचप्रमाणे अतिदारिद्र्य व जीर्णावस्था अशा दोन्ही विरोधावस्थांचा संगम या शहरात आढळतो. येथे हैती विद्यापीठ असून, नोत्रदाम चर्च, राष्ट्रीय राजप्रासाद, बहुतांश स्त्री-विक्रेत्यांचा भरणा असलेले आयर्न मार्केट, सेंट ट्रिनिटी चर्चमधील उत्कृष्ट भित्तिचित्रे, १७८० मधील बोटींचा जुना धक्का त्याचप्रमाणे तूसँ लूव्हेर्त्यूर (१७४३–१८०३) व झान झाक देसालीन (१७५८–१८०६) या स्वातंत्र्यवीरांची भव्य स्मारके ही प्रवाशांची आकर्षणे होत. १९४९ मध्ये या शहराच्या स्थापनेचा द्विशत सांवत्सरिक महोत्सव येथे एक आंतरराष्ट्रीय प्रदर्शन भरवून साजरा करण्यात आला.

शहाणे, मो. ज्ञा. गद्रे, वि. रा.