पोर्टर, रॉडनी रॉबर्ट : (८ ऑक्टोबर १९१७ – ) ब्रिटिश जीवरसायनशास्त्रज्ञ. १९७२ चे वैद्यक किंवा शरीरक्रियाविज्ञानाचे नोबेल पारितोषिक त्यांना व ⇨ जेरल्ड मॉरिस एडेलमान या अमेरिकन जीवरसायनशास्त्राज्ञांना ⇨ प्रतिपिंडाच्या (जंतू, त्यांची विषे व इतर विशिष्ट पदार्थ यांना विरोध करणाऱ्या व रक्तात तयार होणाऱ्या पदार्थांच्या) रासायनिक संरचनेबद्दलच्या संशोधनाकरिता विभागून मिळाले.

पोर्टर यांचा जन्म लिव्हरपूल जवळच्या एका खेड्यात झाला. उच्च शिक्षण लिव्हरपूल व केंब्रिज विद्यापीठांत झाले. केंब्रिजमध्ये सुप्रसिद्ध रसायनशास्त्रज्ञ फ्रेडरीक सँगर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पीएच्.डी चा अभ्यास केला. तो करीत असताना त्यांचे लक्ष ‘प्रतिपिंडे’ या विषयाकडे वळले होते व त्यांच्या प्रबंधाचा विषयही ‘प्रतिपिंडांची संरचना हा होता. १९४९–६० या काळात ते लंडनजवळील मिल् हिल् येथील नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल रिसर्च या संस्थेमध्ये (रोगप्रतिकारक्षमतेसंबंधीच्या विज्ञानाचे) वैज्ञानिक कर्मचारी होते. नंतर १९६०–६७ मध्ये लंडन विद्यापीठाच्या सेंट मेरीज हॉस्पिटल मेडिकल स्कूलमध्ये ते प्रतिरक्षाविज्ञानाचे प्राध्यापक होते. १९६७ पासून ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या ट्रिनिटी कॉलेजमध्ये जीवरसायनशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून ते काम करीत आहेत. १९७० पासून पोर्टर हे मेडिकल रिसर्च कौन्सिलचे सभासद व संचालक आहेत.

प्रतिपिंडांची संरचना व कार्यपद्धती याबद्दलचे ज्ञान १९५९ सालापर्यंत अस्पष्ट व अपूर्ण होते. पोर्टर यांनी सशाच्या रक्तातील प्रतिपिंडावर पेपेन या एंझाइमाची (जीवरासायनिक विक्रिया घडवून आणण्यास मदत करणाऱ्या प्रथिन पदार्थाची) विक्रिया करून पाहिली असता प्रतिपिंडाच्या रेणूचे तुकडे पडल्याचे त्यांना आढळले. रेणूचे विशिष्ट ठिकाणी खंडन होऊन तीन मोठे तुकडे पडले आणि त्यांपैकी दोन एकसारखे असून त्यांचे कार्यही सारखेच म्हणजे ⇨ प्रतिजन (ज्यांच्यामुळे प्रतिपिंडाची निर्मिती होण्यास उत्तेजन मिळते असे पदार्थ) बद्ध करण्याचे आहे, असे त्यांना दिसून आले. तिसरा तुकडा प्रतिरक्षात्मक कार्यात अजिबात भाग घेत नसल्याचे, तसेच तो प्रत्येक प्रतिपिंड रेणूचा एक भाग असतोच असेही त्यांच्या लक्षात आले.

एडेलमान यांच्या संशोधनाचा विषयही प्रतिपिंडांची संरचना हाच होता. मात्र त्यांनी वापरलेली पद्धत पोर्टर यांच्या पद्धतीपेक्षा भिन्न होती. या दोघांच्या संशोधनामुळे प्रतिपिंडावरील संशोधनास जोराची चालना मिळाली. त्यांच्या संशोधनामुळे प्रतिरक्षाविज्ञानाचा पाया घातला गेला असून रोग आणि प्रतिबंधात्मक उपाय यांविषयी उपयुक्त ज्ञान प्राप्त होण्याचा अधिक संभव निर्माण झाला आहे.

पोर्टर हे मेडीकल रिसर्च कौन्सिलचे आणि अमेरीकन नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस, अमेरीकन सोसायटी ऑफ बायॉलॉजिकल केमिस्ट्‌स, अमेरिकन ॲसोसिएशन ऑफ इम्यूनॉलॉजिस्ट्स इ. संस्थांचे सदस्य आहेत. नोबेल पारितोषिकाखेरिज त्यांना बायोकेमिकल सोसायटीचे सिबा पदक (१९६७), अमेरिकन ॲसोसिएशन ऑफ ब्लड बँक्‌स या संस्थेचा कार्ल लँडस्टायनर पुरस्कार (१९६८), रॉयल सोसायटीचे पदक (१९७३) इ. बहुमान मिळाले आहेत. बायोकेमिकल जर्नल आणि तत्सम नियतकालिकांत त्यांचे अनेक संशोधनपर लेख प्रसिद्ध झालेले आहेत.

भालेराव, य. त्र्यं.