पोर्ट ऑफ स्पेन : वेस्ट इंडिज बेटांमधील त्रिनिदाद व टोबॅगो या देशाची राजधानी आणि प्रमुख बंदर. लोकसंख्या १,२०,००० (१९७७ अंदाज). हे त्रिनिदाद बेटाच्या वायव्य भागात पारीआ आखातावर वसले असून ते व्हेनेझुएलातील पारिआ द्विपकल्पाच्या पूर्वेला आहे. हे शहर त्रिनिदादच्या अंतर्गत भागाशी रस्त्यांनी जोडले असून, त्याच्या आग्नेयीस सु. २६ किमी.वर पीआर्को येथे विमानतळ आहे. ते सुरक्षित बंदर जागतिक जलवाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत मोक्याच्या ठिकाणी आहे. १५९५ पूर्वी याचे ‘काँक्वेरेबिया’ असे नाव होते. सर वॉल्टर रॅली याने स्पॅनिशांची येथील राजधानी उद्ध्वस्त केली परंतु स्पॅनिशांनी येथे ती पुन्हा वसवून त्याचे ‘प्वेर्तो दे एस्पॅना’ असे नामकरण केले (१५९५). नंतर ब्रिटीश अंमलात याचेच ‘पोर्ट ऑफ स्पेन’ असे इंग्रजी नाव झाले (सु. १८९५). १९५८–६२ मध्ये वेस्ट इंडीज संघराज्याची राजधानी येथे होती. शहराचा विकास साखर, कॉफी, कोको, सुके खोबरे व फळफळावळ यांचे निर्यातकेंद्र म्हणून प्रामुख्याने झाला असून, यांच्या आसमतांत रम, बीर, मार्गरीन, तेले, सिगारेटी, प्लॅस्टिके, कापड इ. उद्योग भरभराटले आहेत. पर्यटकांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत असून पर्यटन हासुद्धा एक प्रमुख व्यवसाय बनत आहे.
शहराची रचना योजनाबद्ध असून चौक व बागा यांमुळे शहराचे सौंदर्य वाढले आहे. वुडफोर्ड चौक हा व्यापारी विभागात असून मुख्य वस्ती शहराच्या पिछाडीला असलेल्या डोंगरी भागातील उपनगरात आहे. शहराच्या मध्यभागी क्वीन्स पार्क सॅव्हाना असून येथेच निरनिराळ्या दिशांकडून येणारे रस्ते केंद्रित होतात. त्याभोवती इतिहासप्रसिद्ध व स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने मौल्यवान अशा अनेक शासकीय इमारती व चर्च आहेत. येथे क्वीन्स रॉयल कॉलेज, फातिमा कॉलेज, सेंट मेरीज कॉलेज, आभियांत्रिकी महाविद्यालय इ. शैक्षणिक संस्था आहेत.
शहाणे, मो. ज्ञा.
“