पोरबंदर संस्थान : ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील पूर्वीच्या मुंबई इलाख्यातील एक संस्थान. क्षेत्रफळ १,६६२ चौ. किमी. लोकसंख्या १,४६,६४८ (१९४१). वार्षिक उत्पन्न सु. २५ लाख. उत्तरेस नवानगर व पूर्व-दक्षिणेस जुनागढ ही संस्थाने आणि पश्चिमेस अरबी समुद्र यांनी ते सीमित झाले होते. संस्थानात १०६ खेडी असून चुन्याचा दगड, मीठ, तूप यांचा चांगला व्यापर होता. येथील चुनखडीचा दगड भिजल्यानंतर दुसऱ्या चुनखडीच्या दगडात एकरूप होतो, त्यामुळे येथील वास्तूंच्या भिंती एकसंध दिसतात. संस्थानात आगपेट्या, सिंमेट, कापड इत्यादींचे कारखाने होते.
जेठवा राजपूत दहाव्या शतकात बरडा-हालाड भागात आले. राणपूर व पुढे छाया येथे त्यांनी ठाणी वसविली. त्यांनी पोरबंदरचा नवा भाग मोगलांकडून व बाकीचा जाडेजा राजपुतांकडून मिळविला. अठराव्या शतकात राणा सुलतानजीने पोरबंदरचा किल्ला आणि बंदर बांधून राजधानी छायाहून तेथे हालवली (१७८५). १८०७ मध्ये संस्थानाने ब्रिटीशांची मांडलिकी पतकरली. राणा विक्रमातजीतने (१८४१–१९००) लक्ष्मण खवासचा खून करविला, या आरोपावरून संस्थानाला तिसरी श्रेणी देण्यात आली. (१८६९–८६). १९००–२० च्या दरम्यान राणा नटवरसिंहजी अल्पवयी म्हणून शासन ब्रिटीशांच्या ताब्यात होते. १९१८ मध्ये संस्थानिकाला महाराणा किताब मिळाला. अठरावे महाराणा नटवरसिंहजी (१९२०–४७) प्रजावत्सल, क्रिकेट, टेनिस, संगीत यांचे शौकीन असून त्यांनी व्यायामशाळांना उत्तेजन दिले. संस्थानाची टांकसाळ १८४० मध्ये बंद झाली. संस्थानाने स्वतःचे सैन्य, रेल्वे, रस्त्यांचे जाळे, इ. तयार केले. विसाव्या शतकात नगरपालिका, दवाखाने, शाळा, कापसाच्या गिरण्या इ. अनेक सुधारणा झाल्या. संस्थानाला इंग्रज, बडोदे व जुनागढ यांना खंडणी द्यावी लागे. महाराणास न्यायदानाचे पूर्ण अधिकार होते. १९४८ मध्ये संस्थान विलीन होऊन सौराष्ट्र संघात व १ मे १९६० पासून गुजरात राज्यात समाविष्ट झाले. अरबी समुद्रावरील एक महत्त्वाचे बंदर म्हणून संस्थानास सुरुवातीपासून महत्त्व आहे.
कुलकर्णी, ना. ह.