पोतना : (सु. १४५०–सु.१५१०). प्राचीन तेलुगू महाकवी व आंध्र भागवताचा कर्ता. त्याचे जन्मगाव, जीवनकाल, ग्रंथरचना इत्यादींबाबत अभ्यासकांत मतभेद आहेत. वरंगळ जिल्ह्यातील बम्मेर गावचा तो रहिवासी होता असे काही अभ्यासक मानतात, तर काहींच्या मते त्याचा जन्म कडप्पा जिल्ह्यातील ओंतिमिट्ट नावाच्या गावी झाला. ओंतिमिट्ट म्हणजेच पोतनाने आपल्या भागवतात उल्लेखिलेले एकशिलानगर. काही अभ्यासकांच्या मते हे एकशिलानगर म्हणजे वरंगळ वा ओरुगल्लू असून त्याचा जन्म ह्या जिल्ह्यातील बम्मेर गावी झाला. बम्मेर वरंगळपासून सु. ४५किमी.वर आहे. बम्मेरचा रहिवासी म्हणून ‘बम्मेर पोतना’ नावाने तो ओळखला जातो. ‘पोतनामात्य’ अशीही नाममुद्रा त्याच्या भागवतात आढळते. तो ⇨श्रीनाथ कवीचा समकालीन होता असे काही अभ्यासक मानतात, तर काही अभ्यासक तो श्रीनाथाचा मेव्हणा होता असे मानतात. त्याच्या जीवनकालाबद्दलही सु. १४००– सु. १४७०किंवा सु. १४३०– सु. १५००किंवा सु. १४५०– सु. १५१०अशी तीन मते अभ्यासकांत आहेत. तो जातीने नियोगी ब्राह्मण होता व शेती करून तो आपला उदरनिर्वाह करीत असे. त्याचे कुटुंबीय वीरशैव मताचे अनुयायी होते व तोही सुरुवातीस शिवोपासकच होता. पुढे भागवतादी संस्कृत ग्रंथांच्या वाचनाने तो विष्णुभक्तीकडे वळला. वीरभद्र विजयमु हे त्याचेच काव्य असेल व ते त्याने सुरुवातीस रचले असेल असे मानले, तर तो सुरुवातीस शैव मतानुयायी होता व पुढे वैष्णव मतानुयायी बनला, असे म्हणायला हरकत नाही. त्याचे मातापिता लक्कमा व केशना. वडीलभाऊ तिप्पना. आजोबा एल्लना. त्याने आपल्या पित्याजवळ संस्कृतचे व तेलुगूचे अध्ययन केले. इवतुरी सोमशेखर हा त्याचा आध्यात्मिक गुरू होय. चैतन्य महाप्रभू आणि वल्लभाचार्य यांचा तो समकालीन होता. तो निष्णात हिशेबनीस होता, असेही काही अभ्यासक मानतात. सुरुवातीस काही काळ तो राचकोंड्याचा अधिपती सर्वज्ञसिंह (कार. १४३०–१४७५) याच्या आश्रयास होता तथापि नंतर मात्र त्याने आपले आयुष्य बम्मेरगावीच विरक्तीत व्यतीत केले, असे दिसते. पूर्वसूरींपैकी नाचन सोमना, पाल्कुरिकी सोमनाथ, नन्नेचोड, भास्कर इ. कवींच्या रचनांचा त्याने सखोल अभ्यास केला असावा, असे त्याच्या भागवतावरील ह्या कवींच्या प्रभावावरून दिसते.
भोगिनी दंडकमु, वीरभद्र विजयमु, श्रीमदांध्र भागवतमु, नारायण शतक ही त्याची तेलुगू ग्रंथरचना म्हणून सांगितली जाते. यांतील एकदोन ग्रंथांचा अपवाद सोडल्यास उर्वरित ग्रंथकर्तृत्वाविषयी अभ्यासकांत मतभेद आहेत. तेलुगू साहित्यात त्याची चिरंतन कीर्ती झाली ती त्याच्या श्रीमदांध्र भागवतमु ह्या महाकाव्यामुळेच.
भोगिनी दंडकमु हे त्याचे आरंभीच्या काळात रचलेले काव्य असून, त्यात त्याने आपला आश्रयदाता राजा सर्वज्ञसिंह आणि त्याची रखेली यांची प्रणयकथा वर्णिली आहे. दंडक नावाच्या तेलुगू छंदात पहिल्यांदाच रचलेले हे काव्य होय.
वीरभद्र विजयमु ह्या चार आश्वासांत रचलेल्या काव्यात त्याने दक्षयज्ञाचा विध्वंस व वीरभद्राचा विजय हे विषय सुरसपणे वर्णन केले आहेत. वायु व ब्रह्मपुराण तसेच कालिदासाचे कुमारसंभव यांचा त्यास आधार आहे. आंध्र भागवताच्या तुलनेत हा ग्रंथ सामान्य दर्जाचा असल्याने तो पोतनाचा नसावा, असे काही अभ्यासक प्रतिपादन करतात.
नारायण शतक हे नारायणच्या भक्तीपर रचलेले काव्य पोतनाने आंध्र भागवतापूर्वी रचले असावे, असे मानले जाते. या शतकप्रकारातील काव्यात उत्कट भक्तिभाव व नादमधुर शैली हे गुण विशेषत्वाने प्रकट झाले आहेत. आंध्र भागवताच्या शैलीशी ते जुळणारे आहे तथापि ही रचना पोतनाची नसून अन्य कुणाची असावी, असे मानणारे अभ्यासकही आहेत.
श्रीमदांध्र भागवतमु ह्या महाकाव्यात पोतनाच्या प्रतिभाशक्तीचा व भक्तिभावनेचा परमोत्कर्ष झालेला दिसतो. आंध्रच्या सांस्कृतिक जीवनात ह्या महाकाव्यास अनन्यसाधारण स्थान आहे. मूळ संस्कृत भागवताचा हो केवल शब्दशः तेलुगू अनुवाद नाही. त्यात पोतनाने संक्षेप-विस्ताराचे धोरण ठेवून व प्रसंगवर्णनांची नवनिर्मिती साधून त्याला खास खास आंध्र-संस्कृतीचे वळण दिले आहे. मूळ भागवतापेक्षाही हे काव्य विस्ताराने बरेच मोठे झाले आहे (एकूण ३०,०००पद्ये). तेलुगू रामायण व महाभारताहूनही पोतनाच्या ह्या भागवताची लोकप्रियता आंध्र प्रदेशात अधिक आहे. यातील वेगवेगळी आख्याने म्हणजे खंडकाव्येच होत. कित्येक ठिकाणी सुंदर स्फुट पदेही आली असून, ती आंध्रातील कथा-कीर्तनकारांच्या आणि भजनकारांच्या तोंडी आजही आहेत. यातील बाललीला, पूतनावध, गजेंद्रमोक्ष, रुक्मिणीकल्याणम्, प्रह्लादचरित्र, ध्रुवाख्यान इ. प्रसंग अत्यंत सरस उतरले आहेत. गोपिकागीत, उद्धवगीत, भ्रमरगीत यांतील नादमाधुर्य अवीट आहे. पोतनाने संपूर्ण भागवत रचले नसले, तरी (संपूर्ण भागवत त्याने रचले असेही मत काही अभ्यासक प्रतिपादतात.) बारा स्कंधांपैकी आठ स्कंधांची रचना त्याचीच आहे. चार स्कंधांची रचना मात्र त्याचे अनुयायी वा मित्र यांनी करून आंध्र भागवत पूर्ण केले. हे अनुयायी वा मित्र म्हणजे बोप्पराजू गंगनार्य (पाचवा स्कंध), एर्चुरी सिंगना (सहावा स्कंध) व वेलिगंदल नारय (अकरावा व बारावा स्कंध) हे होत. विषेश म्हणजे पोतनाने आपले भागवत त्याचे उपास्य दैवत असलेल्या श्रीरामास अर्पण केले आहे.
पोतनाने विपन्नावस्थेत जीवन व्यतीत केले असले, तरी आपली स्वाभिमानी वृत्ती त्याने कदापि ढळू दिली नाही. त्याचे हृदय मनुष्यमात्राच्या कणवेने ओतप्रोत भरलेले होते. तो शब्दप्रभू होता विशिष्ट भावाभिव्यक्तीसाठी अनुकूल असे ललितमधुर शब्द त्याला विनासायास सुचत. नवरसांचा परिपोष करण्यास हा महाकवी समर्थ असला, तरी त्याने भक्तिरसालाच केंद्रीभूत स्थान दिलेले आहे. त्यामुळे आंध्र भागवताचा एकूण परिपाक भक्तिरसाचाच प्रत्यय देणारा ठरतो. तेलुगू भाषेच्या अभिजात माधुर्याचा प्रत्यय त्याच्या ह्या रचनेत प्रकर्षाने येतो. एक श्रेष्ठ महाकवी म्हणून त्याला तेलुगू साहित्यात मानाचे स्थान आहे.
संदर्भ : 1. Venkatavadhani, D. Pothana, New Delhi, 1972.
2. वाराणसी राममूर्ती, ‘रेणू’, अनु. आंध्र भागवत परिमल (तेलुगू कें महाकवी पोतनाकृत आंध्र भागवतमु कें चार उपाख्यानोंका हिंदी पद्य रूपांतर), हैदराबाद, १९६५.
टिळक, व्यं. द. सुर्वे, भा. ग.