निजगुणशिवयोगी : (सु. १५००). कन्नड भाषेत रचना करणारा प्रख्यात वीरशैव संतकवी. त्याच्या जीवनाबाबत फारशी अधिकृत माहिती मिळत नाही. १२५० ते १६५५ हा वीरशैव साहित्याचा उत्कर्षकाल होय. या कालातच १५०० च्या सुमारास तो होऊन गेला असावा, असे अभ्यासक मानतात तथापि त्याबाबत मतभेद आहेत. तो येलांडूरजवळील शंभुलिंग पर्वताच्या आसपास असलेल्या प्रदेशाचा राजा होता तथापि नंतर वैराग्य प्राप्त होऊन तो तप:सामर्थ्याने शिवयोगी बनला व शंभुलिंग पर्वतावरच राहू लागला असे सांगतात. सर्वसामान्य माणसास सहज कळतील अशी बसवेश्वरकृत ‘वचने’ व हरिहरकृत ‘रगळे’ हे कन्नड साहित्यप्रकार या वेळी प्रचारात आले होते. याच उद्दिष्टाने प्रेरित होऊन निजगुणशिवयोगी याने ‘त्रिपदि’ (मराठी ओवीसदृश रचना) छंदात वीरशैव पंथाची तत्त्वे सोप्या भाषेत लोकांना उपदेशिली.

कैवल्यपद्धति, परमानुभवबोधे, अनुभवसार, परमार्थगीता, अखत्तु मूरर त्रिपदि, परमार्थप्रकाशिके विवेकचिंतामणि ही निजगुणशिवयोगी याची ग्रंथरचना आहे. यांतील पहिले तीन ग्रंथ अनुक्रमे गीत, सांगत्य व रगळे या प्रकारांत रचले असून नंतरचे दोन ग्रंथ त्रिपदीत आहेत. शेवटचे दोन ग्रंथ गद्यात आहेत. कैवल्यपद्धतीत तात्त्विक उपदेश व शिवस्तुतिपर गीते आहेत. ह्या गीतांत भावकाव्याची गोडी, भक्तिभाव, गुरुस्तुती व ओजस्वीपणा आढळतो. परमानुभवबोधेमध्ये याज्ञवल्क्य-मैत्रेयी यांच्या संवादरूपाने अद्वैत तत्त्वज्ञानाची चर्चा आहे. अनुभवसारमध्ये वेदान्त तत्त्वज्ञानावरील, त्रिपदी छंदात रचलेला हा तविस्तृ भाष्यग्रंथ असून शिवपुत्रस्वामी यांनी तो १९५३ मध्ये संपादून हुबळी येथून प्रसिद्ध केला. परमार्थगीता या ग्रंथात गुरुशिष्यसंवादरूपाने मोक्षशास्त्र समजावून सांगितले आहे. अखत्तु मूरर त्रिपदीमध्ये ६३ शैवसंतांची स्तुती आहे. हे पाचही ग्रंथ सर्वसामान्य वाचकास कळावेत म्हणून कन्नड छंदांमध्ये रचलेले आहेत. ह्यांतून कवीच्या प्रतिभेचे दर्शन जरी घडत नसले, तरी निर्मळ भक्ती, आध्यात्मिक उंची व सांप्रदायिक ज्ञान यांचा प्रत्यय येतो.

विवेकचिंतामणि हा त्याचा सर्वश्रेष्ठ गद्यग्रंथ आहे. त्यात त्याने तत्कालीन तात्त्विक, साहित्यिक, भौगोलिक इ. विषयांचे ज्ञानभांडार साररूपाने संकलित केले असून तो ज्ञानकोशस्वरूपाचा पहिला कन्नड ग्रंथ होय. हा ग्रंथ दहा प्रकरणांत ७६५ विषयांत विभागला आहे. कवी व गद्यग्रंथकार म्हणून निजगुणशिवयोगी यास कन्नड साहित्यात महत्त्वाचे स्थान आहे.

दिवेकर, गु. व्यं.