पोकळा : (इं. ॲमरँथ हिं.चौलाई सं. मारीष लॅ. ॲमरँथस ब्लायटम, प्रकार ओलेरॅसिया कुल-ॲमरँटेसी). ही सु. २०–३० सेंमी. उंच व काहीशी रसाळ, वर्षायू (वर्षभर जगणारी) ⇨ ओषधी भारत व इतर उष्ण प्रदेशांत पालेभाजीकरिता लगवडीत आहे. हिरवा व तांबडा असे हिचे दोन प्रकार आहेत. खोड प्रथम मऊ पण पुढे सूत्रल (धाग्यांनी युक्त) व काहीसे कठीण बनते पाने तांबड्या प्रकारात काळसर लाल व लांब देठाची असतात. फुले फार लहान, असंख्य व एकलिंगी असतात. (फुलांच्या संरचनेच्या वर्णनासाठी ‘ॲमरँटेसी’ ही नोंद पहावी). फुलोरा कक्षास्थ किंवा अग्रस्थ कणिश फळ शुष्क (क्लोम) बी बारीक, काळसर लाल व चकाकीत. पोकळा शीतकर (थंडावा देणारा), दीपक (भूक वाढविणारा), बलप्रद व सारक असून त्रिदोषनाशक आहे. बिया भाजून खातात. या वनस्पतीत १०० ग्रॅम मध्ये २·९ ग्रॅम प्रथिने असून १८·१८ मिग्रॅ. लोह असते.
पहा : ॲमरँटेसी भाजीपाला.
चौगले, द. सी.