पैठण : महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध प्राचीन व पवित्र नगर. लोकसंख्या १४,५२६ (१९७१). हे औरंगाबाद जिल्ह्यात औरंगाबाद शहराच्या दक्षिणेस सु. ५५ किमी.वर गोदावरी नदीकाठी वसले आहे. पैठणमध्ये अनेक प्रचीन वास्तूंचे अवशेष आढळतात. प्राचीन कोरीव लेख व हिंदू, बौद्ध आणि जैन वाङ्मय तसेच टॉलेमी (इ.स. ९०–१६९), मार्को पोलो (१२५४–१३२४), इब्न बतूता (१३०४–७८) वगैरे परकीय प्रवाशांच्या प्रवासवृत्तांतून यासंबंधी विस्तृत माहिती मिळते. याचे प्रतिष्ठान, पोतली, पइठ्ठान, पट्टण, पोयणपुर इ. नामोल्लेख प्राचीन साहित्यांत आढळतात. अशोकाचा शिलालेख व सांचिस्तूप यांत येथील रहिवाशांचा अनुक्रमे पेतनिक व पैठणिक म्हणून उल्लेख केला आहे. पेरिप्लस ऑफ द एरीथ्रीअन सी या ग्रंथातही पैठणच्या सुबत्तेविषयी तसेच व्यापारासंबंधी अनेक उल्लेख आढळतात. सातवाहनकाली ही सातवाहन राजांची राजधानी होती. सु. तिसऱ्या शतकापर्यंत हे नगर फार भरभराटले होते विद्या व कला यांना राजाश्रय लाभला होता. या काळात या शहराचा रोमन साम्राज्याशी व्यापारउदीम असावा, एवढा पुरावा उत्खननांत उपलब्ध झाला आहे. मात्र पुढे वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट या वंशांच्या काळात पैठणकडे दुर्लक्ष झाले. त्यानंतर यादवकालात या नगराचे महत्त्व धर्मपीठ म्हणून वाढले. दक्षिण काशी म्हणूनही त्याचा उल्लेख पुढे होऊ लागला. यादवांनंतर पैठणवर बहमनी, मोगल, निजामशाही, मराठे व पुन्हा निजामशाही यांचे आधिपत्य होते. ब्रिटिश अंमलात ते हैदराबाद संस्थानच्या अखत्यारीत होते.
सद्य स्थितीतील पैठण हे एक आधुनिक नगर आहे. या शहराची स्वच्छता व पाणीपुरवठा १९४३ मध्ये स्थापन झालेल्या नगरपरिषदेतर्फे करण्यात येतो. यांशिवाय नागरी रुग्णालय, तीन माध्यमिक विद्यालये, मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे वसतिगृह, प्रतिष्ठान कला व वाणिज्य महाविद्यालय आणि शासकीय मूलभूत प्रशिक्षण महाविद्यालय, ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय, संगीत विद्यालय, ज्ञानेश्वर उद्यान इ. संस्था शहराचे आरोग्य व शिक्षणविषयक सुविधा पुरवितात. शहरात औरंगाबाद पेपर मिल, नाथ पेपर मिल, तहसील कार्यालय, पंचायत समिती, पोस्ट, न्यायालय, मध्यवर्ती खुले कारगृह, संत एकनाथ सहकारी साखर कारखाना इ. शासकीय कार्यालये व संस्था आहेत. दरवर्षी फाल्गुनषष्ठीला येथे मोठी जत्रा भरते व असंख्य भाविक जमतात.
पैठणला प्राचीन काळापासून सांस्कृतिक परंपरा, इतिहास व व्यापारी केंद्र म्हणून महत्त्व प्राप्त झालेले आहे. येथे हैदराबाद संस्थानच्या पुरातत्त्वविभागाने १९४३ मध्ये आणि महाराष्ट्र राज्याच्या पुरातत्त्व विभागाने १९ ६६–६७ मध्ये उत्खनने केली. या उत्खननांत अश्मयुगीन हत्यारे व जनावरांची अश्मीभूत हाडे सापडली. त्यामुळे अश्मयुगापासून येथे मानवी वस्ती असावी, असा पुरातत्त्ववेत्यांचा कयास आहे. नंतरच्या काही अवशेषांवरून ताम्रपाषाणयुगीन संस्कृती इ. स. पू. १५०० दरम्यान नांदत असावी तथापि सातवाहन कालापासून पैठणचा जेवढा इतिहास ज्ञात आहे, तेवढा तत्पूर्वीच्या काळाविषयी नाही. रोमन साम्राज्यांतर्गत प्रदेशांशी पैठणचा व्यापारी संपर्क होता, हे येथे सापडलेल्या रोमन मद्यकुंभांवरून स्पष्ट होते. त्यामुळे तेर,जुन्नर, भोकरदन या शहरांप्रमाणेच पैठणचा व्यापार भरभराटला होता. मद्यकुंभांव्यतिरिक्त सातवाहनकालीन आहत नाणी, मणी, खेळणी, देव-देवतांच्या मृण्मूर्ती, घरांचे अवशेष, सांडपाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था इ. पैठणचे प्राचीन वैभव दर्शवितात. या अवशेषांतील काही नाणी कापडात बांधून ठेवल्यामुळे त्यावर उमटलेला कापडाचा ठसा आढळून आला. पहिल्या वस्तीचे अवशेष सु. ७ मी. खोलीत मिळाले. ही वस्ती पुराने नष्ट केल्याचा पुरावा आढळला. यानंतरची वस्ती तुघलक-बहमनी काळात झाली. हीही पुराने नष्ट झाली. या काळातील वास्तू मिळाल्या नाहीत मात्र मोगल-ब्रिटिश काळातील नाणी मिळाली.
विविध तीर्थकल्पातील या संबंधीच्या प्रकरणात पैठणमधील उत्तुंग मंदिरे, प्रासाद, रेखीव रस्ते आणि व्यापारपेठ यांचे वर्णन आढळते. जरतारी कापड व विणकाम यांत पैठण अग्रेसर होते, तसेच अनेक संत व कवी पैठणमध्ये वास्तव्य करून होते. त्यांपैकी चक्रधर, एकनाथ, भानुदास, मुक्तेश्वर, बहेरा जातदेव, चिमणा पंडित इ. प्रसिद्ध आहेत. जायकवाडी प्रकल्पाने पैठणच्या आसपास असलेल्या दुष्काळी भागास सिंचन सुविधा उपलब्ध झाली असली. तरीसुद्धा या प्रकल्पात काही तीर्थस्थाने पाण्याखाली गेली आहेत. एकनाथांचे एक मंदिर शहराच्या उत्तरेस नदीकाठी असून त्याच्यासमोरच त्यांची समाधी आहे. या समाधीच्या दोहो बाजूंस हरिपंडित व चक्रपाणी यांच्या समाध्या आहेत. येथील नदीचे घाट सुरेख असून त्यांना नागघाट म्हणतात. यांपैकी एका घाटावर ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद म्हणून घेतला, अशी आख्यायिका आहे. घाटाशेजारी सिद्धेश्वर मंदिर असून गावात अनंतऋषी, शिव, इंद्रेश्वर महादेव, लक्ष्मी-नारायण इ. मंदिरे आहेत. यांशिवाय रेणुकादेवीच्या प्राचीन मंदिराच्या जागी उभारलेला मौलाना साहेबांचा दर्गा. तिरात मशीद इ. मुसलमानवास्तू आहेत. पैठणमध्ये चांगले काष्ठकामही होत असे. जेम्स बर्जेसने अशा काष्ठकामाची सु. १५ छायाचित्रे आपल्या अर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या तिसऱ्या खंडात दिली आहेत. श्री. बाळासाहेब पाटील यांनी सातवाहनकालातील वस्तूंचा केलेला व्यक्तिगत संग्रह (ऐतिहासिक वस्तु संग्रहालय) सुरेख असून यात मणी बनविण्याचे दगडी साचे, दुर्मिळ नाणी, खेळणी, केओलीनच्या मनोवेधक यक्षमूर्ती इ. वस्तू आहेत.
संदर्भ : जोशी, सु. ग. संपा. मराठवाडा संशोधन मंडळ वार्षिक, १९७५, पुणे, १९७५.
देशपांडे, सु. र.; देव, शां, भा.