आकाशदिवा : उंच टांगलेल्या रंगीबेरंगी व कलात्मक आवरणातील दिव्यास आकाशदिवा (आकाशकंदील) असे म्हणतात. दिवाळीत हे दिवे लावण्याची प्रथा आहे. दिव्याभोवती शोभिवंत कागदी आवरण घालण्याची प्रथा चीनमध्ये सुरू झाली असावी. कागदाप्रमाणेच काच, प्लॅस्टिक वगैरेंचीही आवरणे करतात तसेच धातूंची जाळीदार आवरणेही वापरतात. आवरणांच्या बांधणीमध्ये कल्पकतेला भरपूर वाव असतो. विमानाकृती, मत्स्याकृती, बहुकोनाकृती, गोलाकृती, हंसाकृती इ. लहानमोठे आकृतिबंध, आकर्षक व विविध रंगसंगती व अन्य सजावट त्यांत असते. त्यांची शोभा दीपाने द्विगुणित होते. लटकणाऱ्या आकाशदिव्यांप्रमाणे अधांतरी तरंगणारे, आवरणात चलत्चित्राकृती बसविलेले इ. प्रकार आहेत. आकाशदिव्याचे स्वरूप कलात्मक असले, तरी त्याच्या वापरामागे पारंपरिक धार्मिक समजुती तसेच काही सामाजिक संकेत असलेले दिसतात. आश्विन शुद्ध एकादशीपासून कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत अष्टदलाकृती आकाशदीप पंचोपचाराने विधिपूर्वक पूजा करून लावल्यास वैभव प्राप्त होते तसेच दीपामुळे पितरांना प्रकाश मिळून त्यांचा उद्धार होतो, अशी हिंदूंची समजूत आहे. दिवे मृतात्म्यांना दिसण्यासाठी आकाशात उंच लावतात, असा समज चिनी, जपानी, तिबेटी लोकांमध्येही आहे. भारतातील दीपावलीप्रमाणेच चीनमध्ये बुद्धजन्मोत्सवप्रसंगी तसेच जपानमध्येही वेगवेगळ्या प्रसंगांंनुसार आकाशदिव्यांच्या वापराची प्रथा आहे. ख्रिस्तजन्मप्रसंगी बेथलीएम येथे दिसलेल्या ताऱ्यासारखे व इतरही विविध धर्तीचे दिवे झाडा-इमारतींसारख्या उंच ठिकाणी लावतात.
धारूरकर, य. ज.
“