आंधळा मासा : जगाच्या निरनिराळ्या भागांतील गुहांतून वाहणाऱ्या गोड्या पाण्याच्या प्रवाहात विविध मत्स्यकुलांतील अनेक जातींचे मासे आढळतात. यांपैकी जे पूर्ण अंधारात राहतात त्यांना डोळे मुळीच नसतात किंवा असलेच तर अवशेषी (अवशेषरूपात शिल्लक राहिलेले) असून दृष्टिहीन असतात. आंधळे मासे प्राय: लहान, रंगहीन आणि दुधी काचेप्रमाणे पारभासी असतात. त्यांना दृष्टी नसली तरी त्यांची स्पर्शेंद्रिये व घ्राणेंद्रिये अत्यंत संवेदनशील (बाह्य वस्तूंचे होणारे परिणाम जाणू शकणारी) असल्यामुळे त्यांना पाण्यात मोकळेपणाने हिंडता येऊन भक्ष्य मिळविता येते.

गुहांत आढळणारे बहुतेक मासे भोवतालच्या प्रदेशातील नद्या वगैरेंतल्या माशांचे निकट संबंधी असतात. पण याविषयी लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे ते ज्या गटातले असतात, त्यांचे मंद दृष्टी हे एक विशेष लक्षण असते. आफ्रिका आणि अमेरिकेतील मार्जार-मीन (कॅट-फिश) हे याचे उदाहरण होय. 

दक्षिण कॅलिफोर्नियाच्या समुद्रकिनाऱ्यावर व शैलभित्तींवर (पाण्यातल्या खडकांच्या रांगांवर) आढळणाऱ्या आंधळ्या गोबी माशांना लहानपणी दिसू शकते, पण मोठेपणी मात्र ते दृष्टिहीन होतात. समुद्राच्या वितल प्रदेशातील (अतिशय खोल भागातील) काही मासे आंधळे असतात, पण याच प्रदेशातील डोळस माशांप्रमाणेच ते सर्व व्यवहार करू शकतात. समुद्रातील काही आंधळ्या माशांना प्रकाश- अंगे असतात, पण त्यांच्या उपयोगाविषयी काही माहिती नाही. 

भारतात मोठ्या गुहा नाहीत पण आसामातल्या गारो टेकड्यांतील सिजू गुहा बरीच मोठी आहे. तिच्या मुखापासून आत ४५७ मी. अंतरावर नेमॅकायलस व बार्बस वंशांचे मासे आढळतात, पण ही गुहा तुलनेने आधुनिक कालात उत्पन्न झालेली असल्यामुळे त्यांचे अद्याप पुरेसे पारिस्थितिक अनुकूलन (ज्या क्रियेने एखादा प्राणी विशिष्ट परिस्थितीत राहण्यास योग्य होतो ती) झालेले नाही. 

कुलकर्णी, स. वि.