आंदोलज्वर: (माल्टा ज्वर). पशूंमार्फत माणसाला होणारा एक रोग. भूमध्य समुद्रातील माल्टा या बेटावर तो स्थानिक स्वरूपात आढळतो, परंतु तो साथीनेही पसरू शकतो. ब्रिटन, अमेरिका इ. भागांतही याचा प्रादुर्भाव आढळतो. याचे गोजातीय व वराहजातीय जंतूही असतात. माल्टा येथील जंतू छाग (शेळ्यामेंढ्यांच्या) जातीच्या प्राण्यांच्या दुधातून, ब्रिटनमधील गोजातीच्या व अमेरिकेत वराहजातीच्या प्राण्यांच्या दुधातून पसरतात. माल्टामध्ये होत असलेल्या रोगाचे जंतू ब्रूस यांनी १८८७ मध्ये शोधून काढले. त्यांच्या नावावरून या रोगाला ‘ब्रूसेलोसिस’तसेच माल्टामध्ये आढळतो म्हणून ‘माल्टा ज्वर’ व तापातील आंदोलनांमुळे ‘आंदोलज्वर’ म्हणतात.
लक्षणे: खूप दिवस रेंगाळणारा व पुनः पुनः उलटणारा ताप, मधून मधून संधिशोथ (सांध्यांची दाहयुक्त सूज), प्लीहा वाढणे (पानथरी वाढणे), तंत्रिका वेदना (मज्जातंतूंच्या वेदना) व दुय्यम पांडुरोग (रक्तातील तांबड्या पेशींचे, हीमोग्लोबिनाचे किंवा दोहोंचे प्रमाण अथवा रक्ताचे एकूण घनफळ कमी झाल्यामुळे होणारा रोग) ही याची लक्षणे असतात. मुख्यतः हा शेळ्यांचा रोग आहे, पण प्रयोगाने वानरांना ग्रस्त (संसर्गित) करता येते. एका प्रकारच्या जंतूने डुकरे व गाईम्हशी या जनावरांत गर्भपात होतो पण या जंतूनेच ग्रस्त झालेल्या मानवात सर्व लक्षणे आंदोलज्वराचीच असतात.
परिपाककाल: (संसर्ग झाल्यापासून रोगलक्षणे दिसेपर्यंतचा काळ). हा सरासरीने दोन आठवड्यांचा असतो परंतु कमीजास्त होऊ शकतो.
प्रकार: लक्षणे व ज्वराची तीव्रता यांवरून याचे पाच प्रकार करतात. (१) सौम्य : रोग्याला विकृती जाणवतही नाही. क्वचित थोडा ताप येतो. रक्तपरीक्षणाने मात्र रोग सिद्ध होतो. (२) आंदोली अथवा साधा : रोगाची सुरुवात विषमज्वराप्रमाणे होते पण दोनतीन आठवडे ज्वर, मग ज्वरमुक्तता, पुनः ज्वर अशी आंदोलने असतात. ती तद्विशिष्टता दाखवितात. रोग कधी तीनचार आठवड्यांत बरा होतो, कधी दीडदोन वर्षेही रेंगाळतो. अतिशय घाम येणे व निरुत्साह ही लक्षणे असतात. सांधेदुखतात पण संधिवाताप्रमाणे त्यांवर सॅलिसिलेटाचा उपयोग होत नाही. हळूहळू ज्वराची तीव्रता कमी होते व ज्वरमुक्ततेचा काल वाढतो. पंधरा दिवस सतत काल राहिल्याखेरीज रोगमुक्तता झाली असे समजणे चूक ठरण्याचा संभव असतो. (३)विरामी : सकाळी प्रकृती ठीक, दुपारी थंडी वाजून तीव्र ज्वर व सायंकाळी पुनः घाम येऊन ज्वरमुक्ती असा हा हिवतापासारखा प्रकार असतो. (४) सतत : यात ज्वर सतत एक ते तीन महिने टिकतो. (५) मारक :ज्वर एकदम चढतो, उलट्या, अतिसार, फुप्फुसशोथ (फुप्फुसाची दाहयुक्त सूज) इ. लक्षणे होतात. मृत्यूपूर्वी कधीकधी ज्वर फार चढतो.
निदान: हिवताप, विषमज्वर, संधिवात, ]काळा आजार, अमीबाजन्य विकार इ. रोगांपासून ह्या रोगाचे वेगळे निदान लागते. रक्तपरीक्षण, जंतुसंवर्धन इत्यादींनी निदान निश्चिती होते.
फलानुमान: (रोगाचा संभाव्य परिणाम). शेकडा दोन ते नऊ एवढे मृत्यूचे प्रमाण आढळते. मारक प्रकारात पहिल्या तीन आठवड्यांत मृत्यू येतो. चिरकारी (फार दिवस टिकणाऱ्या) रोगात तीव्र अशक्तता, कृशता व पांडुरोग आढळतो.
चिकित्सा : (१) प्रतिबंधक : जनावरांची शुश्रूषा करणारेच नव्हे, तर चिकित्सा करणारे पशुवैद्यही या रोगाने ग्रस्त झाल्याची उदाहरणे आहेत. प्रयोगशाळेत काम करणाऱ्यांनाही फार सावधगिरी बाळगावी लागते. दूध उकळल्याने जंतू मरतात, पण रोग स्थानिक असेल अशा जागी ते न घेणेच चांगले. रोग्याचे रक्त, मलोत्सर्ग व मृत शरीर यांतूनही संसर्ग संभवतो. (२) रुग्णशुश्रूषा : अंडी, मासे, जीवनसत्वे इत्यादींनी युक्त असे सकस अन्न, तद्विशिष्ट आत्म जनित (रोग्यातील जंतूंपासून बनविलेली) लस, आंदोलज्वर-विरोधी रक्तरस (रक्त गोठल्यावर गुठळी-विरहित उरलेला न गोठणारा द्रवभाग), प्रतिपिंडयुक्त रक्ताधान (प्रतिपिंडे म्हणजे रोगजंतूंना विरोध करणारे पदार्थ असलेले रक्त देणे) गुणकारी ठरतातच असे नाही. नीलेतून विषमज्वरविरोधी लसीचा उपयोग होतो. स्ट्रेप्टोमायसीन-सल्फाडायझीन यांची जोड चिकित्सा करतात. क्लोरटेट्रासाक्लिनाने गुण येतो, पण ज्वर उलटण्याचा संभव असतोच. तीव्र ज्वर, निद्रानाश, सांधेदुखी, डोकेदुखी इत्यादींसाठी ती ती चिकित्सा करावी लागते.
आपटे, ना. रा.
पशूंतील आंदोलज्वर: शेळ्यांत चिरकारी स्वरूपाचा स्तनशोथ (स्तनाची दाहयुक्त सूज), चिरकारी खोकला, गाभण शेळ्या गाभडणे, तसेच अशक्तता ही लक्षणे असलेला रोग. मेंढ्यांमध्ये व गुरांमध्येही हा रोग आढळला आहे.
कारणे : मुख्यतः अन्ननलिकेतून ब्रूसेला मेलिटान्सिस जंतू शिरल्यामुळे रोग होतो. जंतू श्लेष्मकलेमार्फत (आतड्याच्या आतील बाजूस असलेल्या बुळबुळीत थरामार्फत) हळूहळू शरीरात दाखल होत असले, तरी खरचटण्यामुळे झालेल्या जखमांतूनही रोगप्रसार सहज होऊ शकतो. प्रयोगशाळेत काम करणारे तसेच पशुविकार वैद्य ह्यांच्यामध्येही रोगसंक्रमण (रोगसंसर्ग) झाल्याचे आढळते. रोगी शेळीचे विशेषेकरून दूध व मूत्र, तर कमी प्रमाणात मल व लाळ, ही संक्रामक (संसर्ग उत्पन्न करणारी) असतात. निरोगी जनावराच्या खाद्यपदार्थांत संसर्ग झाल्यामुळे रोगप्रसार होतो.
लक्षणे: रोगलक्षणे पुष्कळ दिवसपर्यंत दिसतच नाहीत म्हणून रोगनियंत्रणाचे कार्य कठीण असते. गंभीर स्वरूपाच्या रोग्यांत चिरकारी खोकला व स्तनशोथ आणि शेकडा ९० शेळ्या गाभडणे, अशी लक्षणे आढळतात.
नर व मादी दोन्हींमध्ये लंगडणे, वृषण व स्तन यांवर उपचार न करता बरी होणारी अस्पष्ट शोथयुक्त अवस्था अशी लक्षणेही असतात. जनावरांत रोग घातक नसतो. प्रयोगशाळेतल्या जंतुशास्त्रज्ञांच्या मदतीनेच अचूक रोगनिदान शक्य होते.
चिकित्सा व प्रतिबंध:ज्या देशात शेळ्यांमध्ये रोगप्रसार मोठ्या प्रमाणात आढळतो, तेथे माणसांना विशिष्ट लस टोचतात. रोगी थोडे असतात तेथे रोगग्रस्त शेळ्यांचा नाश करणे, रोगी ठेवलेली जागा निर्जंतुक करणे, दूषित पाणीपुरवठा टाळणे, व्यक्तिगत स्वच्छतेबद्दल कसोशीने काळजी घेणे, तसेच शेळ्यांना पौष्टिक खाद्यखुराक देणे व आरोग्यदायी वातावरणात ठेवणे वगैरे उपाय हितावह ठरतात.
काळे, म. ग.