आंत्रशूल: राहून राहून पुनः पुनः होणाऱ्या आतड्यातील (पोटातील) वेदनांना ‘आंत्रशूल’ म्हणतात. उदरामधील आंत्रपुच्छ (ॲपेंडिक्स), पित्तवाहिनी, मूत्रवाहिनी वगैरे नलिकांमध्येही अशा प्रकारचा शूल होऊ शकतो त्यांचे वर्णन इतरत्र केले आहे.
आंत्रनलिकेत एखादा पदार्थ अडकलेला असून त्या नलिकाभित्तीच्या आकुंचनाने तो पदार्थ पुढे ढकलला जात असताना जर आंत्राला इजा झाली तर आंत्रशूल होतो. आंत्रनलिकेच्या अंतःस्तरावर (आतल्या बाजूच्या स्तरावर) क्षोभक पदार्थांचा विपरीत परिणाम होत असल्यास अथवा तिच्यावर बाहेरून दाब पडत असल्यासही आंत्रशूल होतो. या सर्व कारणांमुळे नलिकेच्या स्नायूंचे आकुंचन अनियमित होत असल्याने या प्रकारच्या वेदना होतात.
वयाचे पहिले तीन महिने, फार तर एक वर्षापर्यंत, लहान अर्भकांना आंत्रशूल होतो. मूल पाय पोटाशी ओढून घेते, मुठी आवळून मोठ्याने ओरडते व त्याचा चेहरा लाल होतो. फार घाईने आणि भराभर दूध पिताना दुधाबरोबर जी हवा पोटात जाते तिच्यामुळेही मुलांना शूल होतो. या प्रकारचा शूल विशेष गंभीर नसतो परंतु जर शूलाबरोबरच ओकाऱ्या होत असतील अथवा पोटात कोठे गोळा उठत असेल, तर आंत्रांत्रनिवेश (आतड्याचा एक भाग दुसऱ्या भागात घुसल्यावर होणारी अवस्था) किंवा जठरनिर्गमद्वाराचे (जठरातील अन्न बाहेर पडणाच्या वाटेचे) जन्मजात आकुंचन अशासारखा एखादा गंभीर रोग असू शकतो.
मोठ्या माणसामध्ये अपचन, शोथ (दाहयुक्त सूज), आमांश, आंत्रपुच्छशोथ (ॲपेंडिसायटीस), शिसे, सोमल (आर्सेनिक) यांच्या विषबाधा, अपानवायू (पोटात तयार होणारा व गुदद्वारातून बाहेर जाणारा वायू) साठून राहणे इ. कारणांमुळे आंत्रशूल होऊ शकतो. इन्फ्ल्यूएंझा रोगाला क्वचित याच लक्षणापासून सुरुवात होते. आंत्र-अर्बुदातही (आतड्याच्या पेशींच्या अत्याधिक वाडीमुळे निर्माण झालेल्या निरुपयोगी गाठीतही) हे लक्षण दिसते.
सल्फोनाल हे औषध घेत असताना ‘पॉर्फिरीन’नावाचा जांभळट लाल पदार्थ मूत्रातून जातो त्या वेळी आंत्रशूल होतोकाही कुंटुबात ही विकृती आनुवंशिक असते.
व्यवच्छेदक (स्पष्ट) निदानात वृक्कशूल (मूत्रपिंडातील वेदना) वृक्काश्मरी (मूत्रपिंडातील खडे), पित्ताश्मरी (पित्ताशयातील खडे) इ. गोष्टींचा विचार करावा लागतो.
आंत्रशूल हे एक लक्षण असल्यामुळे त्याचे कारण शोधून त्यावर योग्य चिकित्सा करावी लागते. अर्भकांना होणारा आंत्रशूल कित्येक वेळा अकस्मात येतो व अगदी थोडक्या उपायांनीही जातो. शेकल्यास आराम वाटतो.
आपटे, ना. रा.
आयुर्वेदीय चिकित्सा : आंत्र हे पित्ताचे स्थान आहेअन्नपचनाचे स्थान आहे. मोठ्या आतड्यातील काही भाग मळाचा आणि वाताचा आहे. पचनविकृती व मलवात यांच्यामुळे शूल त्या त्या भागात होतो. गुल्म, विद्रधी, व्रण इत्यादींमुळेही शूल होतोत्यांची चिकित्सा त्या त्या रोगांना अनुसरून करावी. जो जेवल्यावर सुरू होऊन अन्न जिरेपर्यंतच राहतो व नंतर शमतो तो परिणामशूल होय. शूलाच्या तीव्रतेनुसार लंघन किंवा शोधन द्यावेकफाचा संबंध असेल तर वमन (ओकारी) व पित्ताचा संबंध असेल तर रेचक द्यावेनंतर वातशूलावर सुंठ-तीळ-गूळ दुधात वाटून चाटावे. पित्तसंबद्धावर शंखभस्म पाण्याबरोबर व कफसंबद्धावर लोहभस्म, हिरडा, पिंपळी व सुंठ मधतुपाबरोबर आणि तिन्ही शूलांवर नारळाचा क्षार पिंपळीबरोबर द्यावा. त्रिदोषज शूलावर विडंगादी मोदक ऊन पाण्याबरोबर द्यावा. अन्नद्रवाख्यशूल म्हणजे अन्न जिरत असता व जिरल्यावरही जो शूल होतो तो. त्यावर वमन व विरेचन देऊन आवळ्याच्या चूर्णाबरोबर किंवा जेष्ठमधाबरोबर लोहभस्म द्यावे गुडमण्डूर द्यावा वऱ्याचे तांदूळ इ. हलकी धान्ये भूक ठेवून उपयोगात आणावीत.
आंत्रशूलात आंत्र हे पित्ताचे स्थान असल्यामुळे पित्ताचा मुख्य उपचार जो रेचक तो करणे अत्यावश्यक असते. जो शूल अन्न जिरल्यानंतर अधिक होतो त्याला औषधींनी सिद्ध केलेल्या स्नेहाने तुपाचे विरेचन द्यावे अन्न जिरत असताना जो अधिक होतो त्याला फळाचे विरेचन द्यावे हिरडा, एरंडाचे तेल इ. फळांचे रेचक द्यावे. जो शूल नेहमी अधिक असतो त्याला काळे तेडमुळासारख्या मुळाचे रेचक द्यावे व नंतर सहकारी दोषानुरूप शूलनाशक औषधी द्याव्यात. शूल हातावाचून नसतो त्याबरोबर पित्त असेल तर सूतशेखर व कामदुधा, ते पित्त अम्ल असेल तर सूतशेखर, शंख, कवडी, प्रवाळ, कामदुधा, कफ असेल तर महायोगराज गुग्गुल, महावातविध्वंस इ. औषधे उपयुक्त होतात.
जोशी, वेणीमाधवशास्त्री
पशूंतील आंत्रशूल: आंत्रशूल या शब्दाची व्याप्ती फार मोठी असून त्यात उदरातील अनेक इंद्रियांत होणाऱ्या शूलाचा समावेश होतो. त्याला अनेक कारणे संभवतात : (१) तीव्र अपचन (२) आंत्राचा अंगग्रह (तीव्र आकुंचन) (३) आंत्रशोथ (आतड्याची दाहयुक्त सूज), आंत्रांत्रनिवेश आणि आंत्रव्यावर्त (आतड्याला पीळ पडणे) वगैरे आंत्ररोग (४) वृक्क (मूत्रपिंड), मूत्रमार्ग वगैरे ठिकाणच्या अश्मरी (खडे) (५) परजीवी (दुसऱ्यांवर जगणारे) कृमी (घोड्यात) (६) सांसर्गिक काळपुळी (७) बृहदांत्रातील (मोठ्या आतड्यातील) अश्मरी (८) घोडीतील प्रसूतिसमयीचा विशिष्ट विकार (९) इन्फ्ल्यूएंझा रोगातील पहिली अवस्था (घोड्यातील) (१०) जस्त विषबाधा (११) यकृताचे रोग (१२) वंक्षणनालातील (ज्यातून शुक्ररज्जू जातो अशा मार्गातील) किंवा मुष्कातील (लिंग ग्रंथी म्हणजे वृषण ज्यात असतात अशा पिशवीतील) अंतर्गळ (पोटाच्या पोकळीतून वृषण मुष्कात उतरतात त्या वाटेने आतडी खाली उतरल्यामुळे होणारे अंतर्गळ, → अंतर्गळ) वगैरे आंत्रशूल सर्व पशूंत आढळतो. कित्येक वेळा तो दुसऱ्या कोणत्या तरी रोगाचे लक्षण असते. घोड्यामध्ये आंत्रशूल विशेष गंभीर असून त्यामुळे कित्येक घोडे दगावतात.
घोड्याचे जठर लहान असून आंत्र, विशेषतः बृहदांत्र, आकाराने आणि कार्यदृष्टीने फार मोठे असते. घोड्याच्या जठराची अन्न आत जाणारे व बाहेर निघणारे अशी दोनही मुखे लहान असतात. आतल्या लहान मुखामुळे व जठरात वायू क्वचितच जाऊ शकतो. बाहेरच्या मुखामुळे जठरनिर्गमाचा अवग्रहाकार (इंग्रजी Sह्या अक्षराच्या आकाराचा) भाग आणि लघ्वांत्राचा पहिला भाग यांमध्ये वायू जास्त झाला तर अंतर्रोध होतो. अयोग्य अन्नाचे किण्वन (आंबण्याची क्रिया) झाल्याने जठरात फुगवटी येऊन वेदना होऊ लागतात. हा वायू जठरात कोंडून राहिल्यामुळे तो मुखावाटे अथवा आंत्रात जाणे अशक्य होऊन आंत्रशोथ होतो.
आंत्रशूलाचे तीन प्रकार मानलेले आहेत : (१) अंगग्रही, (२) अवरोधी (आतड्यात अन्न पुढे पुढे सरकण्यास आडकाठी आल्यामुळे होणारा) आणि (३) शोथजन्य आंत्रशूल.
(१) घोडा काम करीत असताना अथवा कामावरून परत आल्यानंतर लगेच अस्वस्थ होऊन त्याला घाम सुटतो, श्वासोच्छ्वास भात्याप्रमाणे जलद चालतो, चेहरा चिंताग्रस्त दिसतो. नाडी जलद आणि कठीण लागते. काही मिनिटांतच घोडा शांत होतो क्वचित वेदना चालूच राहतात. (२) या प्रकारात घोडा जमिनीवर पडून लोळू लागतो. थोड्याच वेळाने त्याला बरे वाटू लागून तो उभा राहतो. आंत्राचे कार्य सुरुवातीस ठीक चालते परंतु पुढे बद्धकोष्ठ होऊन लीद पडणे बंद होते. रोधामुळे आंत्रशूल होत असल्यासही ही लक्षणे दिसतात. (३) जठरभेद, आंत्रांत्रनिवेश, आंत्रशोथ आणि आंत्राचा काही भाग पाशग्रस्त (तिढा पडल्यामुळे होणारी अवस्था) झाल्यास शोथयुक्त आंत्रशूल होतो. त्याची लक्षणेही वरीलप्रमाणेच असतातवेदना सारख्या चालू असतात कधीकधी सर्व शरीरात अंगग्रह होतो. अतितीव्र अवस्थेत रोगी गोलगोल फिरत राहून भिंती, दारे यांवर आदळतो किंवा गव्हाणीशी टकरा मारतो.
हा रोग सर्व घोड्यांत दिसत असला, तरी सामान्यपणे शहरातील धावपळीचे अनैसर्गिक जीवन जगणाऱ्या घोड्यांत त्याचे प्रमाण अधिक दिसते. युद्धप्रसंगी रसद पोचविण्याचे कष्टाचे काम सतत करणाऱ्या आणि अनियमित खाणेपिणे मिळत असलेल्या घोड्यांत याचा प्रादुर्भाव विशेष असतो.
आंत्रशूलाचे कारण शोधून काढताना रोगजंतू, परजीवी कृमी आणि विषाणू (व्हायरस) यांच्या संसर्गाचाही विचार करावा लागतो. रासायनिक विषे, अती उष्ण किंवा अती थंड पदार्थ खाल्ल्याने अथवा जाडेभरडे अन्न व गवत नीट न चावता पोटात गेल्यामुळे, तसेच धारदार, टोकदार व खरखरीत पदार्थ पोटात गेल्यास होणाऱ्या इजेमुळे आंत्रशूल होऊ शकतो. अपचन, बद्धकोष्ठ, वायू उत्पन्न करणारे अन्न खाल्ल्यास पोटात गुबारा धरून आंत्रशूल होतो. आंत्रला पीळ पडल्यास किंवा अर्बुदामुळे आंत्ररोध झाल्यासही आंत्रशोथ होतो. आंत्रभित्तीतील स्नायूंवर नियंत्रण ठेवणाऱ्या स्वायत्त तंत्रिकांच्या(मज्जातंतूंच्या) कार्यात बिघाड झाल्यास आंत्रशोथ होऊ शकतो.
लक्षणे: आंत्रशूलाचा झटका बहुधा आकस्मिक येऊन तो ५ ते १५ मिनिटे टिकतो. त्यानंतर तो राहून राहून येतो. आतड्यात गडगड आवाज येऊन लीद थोडी-थोडी व केव्हा पातळ असते. जनावर सारखे ऊठबस करते व एकसारखे पोटाकडे पाहते. काम करीत असल्यास ते एकदम थांबून लोळू लागतो किंवा खूर आपटते. शेपटी पोटावर आपटते घाम सुटतो नाडी व श्वसनाचा वेग वाढला असला तरी ताप नसतो. अती तीव्र झटका असल्यास अवसाद (शॉक) होऊन जनावर दगावते. जनावर सारखे तडफडत राहून वेदना कमी झाल्यानंतर पूर्ववत हिंडूफिरू लागते. काही तासांनंतर अथवा काही दिवसांनंतर पुनः झटका येऊन सर्व लक्षणे पूर्ववत दिसू लागतात.
रोगकारक जंतूंमुळे आंत्रशूल होत असल्यास त्या विशिष्ट रोगाची लक्षणे दिसतात. अतिसार आणि आमांश, लिदीस घाण येणे ही लक्षणे आढळतात. जनावर काहीही खातपीत नाही. क्वचित प्रसंगी त्याला फार तहान लागते.
विजेचा गडगडाट, आगगाडीचा आवाज, तीव्र वास वा घाण, अती थंड पाणी, अपथ्यकारक अन्न वगैरे कारणांनी तंत्रिकाविकार होऊन पोटात एकदम कळा येऊन जनावर हिसका देऊन मागे सरते व गडबडा लोळू लागते.
आतड्यात वायू साठल्यामुळे पोट फुगलेले असून त्यावर टिचकी मारली असता डबडब असा आवाज येतो.
अतितीव्र आंत्रशोथामुळे आणि आंत्राला पीळ (आंत्रव्यावर्त) पडल्यामुळे मृत्यू पावणाऱ्या घोड्यांचे प्रमाण एकूण ग्रस्त जनावरांच्या १० त १५ टक्के इतके असते. बाकीची जनावरे काही तासांत वा एक-दोन दिवसांतच पूर्ण बरी होतात. काही घोड्यांना आंत्रशूल कित्येक महिने वा वर्षे मधूनमधून येत राहतो.
शवपरीक्षा:आंत्रशूलाने दगावलेल्या जनावराच्या आतड्यामध्ये अनेक प्रकारचा फरक पडलेला दिसतो. आंत्राचा अंतःस्तर सोलवटणे, रक्तस्राव, व्रण, आंत्र पिळवटलेले असणे अथवा अन्नाचे किंवा तंतुमय पदार्थांचे गोळे आंत्रात अडकलेले आढळतात. कधीकधी आंत्रात अर्बुद झालेले दिसते. रक्तपुरवठा करणाऱ्या रोहिण्या फुगलेल्या असून त्यांत रक्त साठवलेले असते. काही वेळा आंत्र फाटलेले किंवा आंत्रशोथ झालेला दिसतो.
निदान: लक्षणे इतकी स्पष्ट आहेत की, निदान करण्यास बहुधा अडचण पडत नाही. आंत्रशूलाचे कारण शोधून काढणे मात्र पुष्कळ वेळा फार कठिण असते. रोग्याचे पूर्ववृत्त, लिदीचे प्रमाण व प्रकार, पोटाला आलेला फुगवटा इत्यादींची निदानाला मदत होते. गुदद्वारातून हात घालून पाहिले असता आंत्रात काही रोध असल्यास समजू शकतो.
चिकित्सा: मूळ कारण शोधून काढून त्यावरच योग्य तो उपचार करावा लागतो.
पंडित, र. वि.
“