द’ आरसांव्हाल, झाक आर्सेअन : (८ जून १८५१–३१ डिसेंबर १९४०). फ्रेंच जीवभौतिकीविज्ञ. त्यांनी १८८२ मध्ये एका अतिसंवेदनशील परावर्तक ⇨गॅल्व्हानोमीटराचा (विजेच्या प्रवाहाची दिशा व मापन करणाऱ्या उपकरणाचा) शोध लावला. तो द’ आरसांव्हाल गॅल्व्हानोमीटर म्हणून ओळखला जातो.

द’ आरसांव्हाल यांचा जन्म ला बोरी येथे झाला. शिक्षणाची सुरुवात त्यांनी लिमोझ येथे केली व १८७० च्या लढाईनंतर त्यांचे पुढील शिक्षण पॅरिस येथे झाले. त्यांनी १८७६ मध्ये एम्. डी. पदवी मिळविली. योगायोगाने त्यांची व क्लॉड बर्नार्ड या प्रसिद्ध शरीरक्रियावैज्ञानिकांची गाठ पडली. बर्नार्ड यांच्या एका व्याख्यानाच्या वेळी विजेच्या तारेतील बिघाडामुळे प्रयोग नीट जमेना. त्या वेळी आरसांव्हाल यांनी झालेला बिघाड दुरुस्त केल्यामुळे प्रयोग यशस्वी रीत्या पार पडला. यानंतर १८७३–७८ बर्नार्ड पर्यंत यांच्या व्याख्यानांच्या वेळी प्रयोगांची व्यवस्था करण्याचे काम आरसांव्हाल पाहत असत. बर्नार्ड यांच्या पश्चात शार्ल ब्रून–सेकार या प्रसिद्ध शरीरक्रियावैज्ञानिकांचे आरसांव्हाल हे साहाय्यक झाले व काही काळाने कॉलेज द फ्रान्समध्ये त्यांच्या जागेवर काम करू लागले. या महाविद्यालयात जीवभौतिकीच्या प्रयोगशाळेची स्थापना झाल्यावर आरसांव्हाल यांना तिचे प्रमुख नेमण्यात आले. यानंतर त्यांनी नोजंट–सूर–मार्ने येथे स्थापन केल्या गेलेल्या प्रयोगशाळेचे प्रमुख म्हणून १९१०–३१ पर्यंत काम केले.

विद्युत् शक्तीचा जीवविज्ञानातील आणि तंत्रविद्येतील उपयोग याविषयीच्या शास्त्रीय प्रगतीमध्ये आरसांव्हाल यांचा वाटा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यांचे सुरुवातीचे संशोधन शरीरात उत्पन्न होणारी उष्णता व शरीराचे तापमान यांविषयीचे होते. रुग्णालयात सोप्या पद्धतीने परीक्षा करण्यासाठी त्यांनी उष्णतामापकात (एखाद्या व्यक्तीच्या शरीरात निर्माण होणारी उष्णता मोजणाऱ्या उपकरणात) सुधारणा केली. स्नायु–संकोचनाची क्रिया व विद्युत् शक्ती या विषयांवर त्यांनी बरेच संशोधन केले. अधिक दाबाच्या विद्युत् प्रवाहामुळे होणाऱ्या अवसादाने (तीव्र प्रकारच्या आघातानंतर आढळून येणाऱ्या सार्वदेहिक प्रतिक्षोभाने) प्राणी मरण पावतोच असे नसून कृत्रिम श्वासोच्छ्‌वासाची मदत दिल्यास तो जिवंत राहण्याची शक्यता असते, हे त्यांनी दाखवून दिले. प्रयोगशाळेत वापरण्यासाठी विद्युत् शक्तीवर चालणारी नियंत्रित तापमान कायम राखणारी उष्ण पेटी त्यांनी तयार केली. तसेच त्यांच्याच देखरेखीखाली एका रुग्णालयात १८९५ मध्ये पहिला विद्युत् ऊतकतापन चिकित्सा (विद्युत् प्रवाहाच्या साहाय्याने शरीराच्या भागाला उष्णता पुरवून वैद्यकीय उपचार करण्याचा) विभाग सुरू करण्यात आला. काही वर्षे विद्युत् चिकित्सा द’ आरसांव्हालायझेशन किंवा द’ आरसांव्हालिझम म्हणून ओळखली जात असे. या उपचारांना नंतर ⇨ऊतकतापन चिकित्सा (डायाथर्मी) या नावाने ओळखण्यात येऊ लागले. यानंतर विद्युत् शक्तीच्या औद्योगिक उपयोगाकडे ते अधिक लक्ष पुरवू लागले. प्रयोगशाळेत वापरावयाच्या विद्युत् उपकरणांचे तज्ञ म्हणून त्यांची ख्याती पसरली होती.

विद्युत् शास्त्रविषयक फ्रेंच व आंतरराष्ट्रीय संस्था स्थापन करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. त्यांना पुढील मानसन्मान मिळाले : ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे प्रिक्स माँटॅन (१८८२), नाइट ऑफ द लीजन ऑफ ऑनर (१८८४), ॲकॅडेमी ऑफ मेडिसिनचे सभासद (१८८८), ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे सभासद (१८९४), सोसायटी फॉर ॲक्टिनोथेरपीचे प्रमुख (१९१८) व ग्रँड क्रॉस (१९३१). ते ला बोरी येथे मरण पावले.

कानिटकर, बा. मो. भालेराव, य. त्र्यं.