आडनावे : उपनाम किंवा कुटुंबाचे नाव. एखाद्या व्यक्तीचा अचूक निर्देश व्हावा, म्हणून आडनावाचा उपयोग केला जातो. आडनावाचा अर्थ जरी उपनाम किंवा अधिकनाम असा होत असला, तरी त्याची व्युत्पत्ती वेगवेगळ्या तऱ्हेने सांगितली जाते. ‘अर्ध’ या संस्कृत शब्दाचे अपभ्रष्ट रूप म्हणजे आड असे काहींचे म्हणणे आहे. तसेच ‘अड्ड’ या समानार्थी कन्नड शब्दावरून आड हा शब्द आला असावा, असे अन्य काहींचे म्हणणे आहे. ज्याच्या आश्रयाने आपण वावरतो ते नाव, अशीही आडनावाची व्युत्पत्ती करण्यात येते. आपण आपल्या घराच्या, गावाच्या, धंद्याच्या किंवा गुणाच्या आश्रयाने वावरत असतो त्यामुळे ही व्युत्पत्ती अधिक योग्य वाटते.

एकच व्यक्तीनाम धारण करणार्‍या अनेक व्यक्ति समाजात एकत्र आढळल्यामुळे व्यक्तीस निश्चितपणे ओळखता यावे, म्हणून त्या त्या व्यक्तीच्या वैयक्तिक नावाबरोबर अधिक नावे जोडण्याची प्रथा पडली

[→ व्यक्तिनामे]. अशा परिस्थितीत काही काळ तरी व्यक्तीच्या पित्याला प्राधान्य असलेल्या समाजात पित्याचे नाव व्यक्तीच्या नावाला जोडण्याची प्रथा होती. रंगो बापूजी, दादोबा पांडुरंग, जगन्नाथ शंकरशेठ, महम्मद बिन कासीम वगैरे उदाहरणे सुपरिचित आहेत. त्याचप्रमाणे विवाहित स्त्रियांना त्यांच्या पतीच्या नावाने ओळखले जात असे. अमुक स्त्री (तिचे नाव) भर्ता अमुक पुरुष (त्याचे नाव) म्हणजे त्या पुरुषाची ती पत्‍नी, असे समजले जात असे. परंतु व्यक्तिनिर्देशाला ही पद्धतसुद्धा अपुरी पडू लागली, तसेच समाजात कुटुंबाचे महत्त्व वाढीस लागून प्रत्येक व्यक्ती ही तिच्या कुटुंबाच्या योगे ओळखली जाऊ लागली त्यामुळे कुटुंबाच्या अगर कुलाच्या नावाची म्हणजेच आडनावाची आवश्यकता भासली असावी.

कुलनामाची अगर आडनावाची प्रथा नक्की केव्हा सुरू झाली, हे सांगणे कठीण आहे. हिंदू लोकांप्रमाणेच पूर्वी हिब्रू, मिसरी, असुरी, बॅबिलोनियन, ग्रीक इ. लोकांतही आडनावाची पद्धत नव्हती. इंग्‍लंडमध्ये नॉर्मन दिग्विजयानंतरच्या काळात म्हणजे अकराव्या-बाराव्या शतकांपासून कुलनामाचा वापर होऊ लागला, असे म्हटले जाते. महाराष्ट्रातही त्याच सुमारास तऱ्हेतऱ्हेच्या कुलनामांचा वापर सुरू झाला असावा, असे काही लोकांचे मत आहे. शिलालेख किंवा ताम्रपट यांतील नामनिर्देशांवरुन हा निष्कर्ष काढण्यात आला असावा. परंतु त्यांतील कुलनामांना आनुवंशिक स्वरूप प्राप्त झाले होते की नाही, हे सांगता येत नाही, असेही त्यांचे म्हणणे आहे. ही उपनामे त्या काळात कुलनामे म्हणून जरी रुढ नसली, तरी व्यक्तीनिर्देशक:करिता उपनामे वापरण्याची पद्धत तेव्हा रूढ असावी, असे वाटते. आडनावाचे महत्त्व खऱ्या अर्थाने पेशवाईनंतर इंग्रजी अंमलात वाढले.

कुलनामे ही प्रथमत: खऱ्या किंवा काल्पनिक मूळ पुरुषांच्या नावांवरून किंवा कुटुंबाच्या इतिहासात प्रसिद्धी पावलेल्या व्यक्तिंवरून बहुश: घेतलेली असावीत. अमुक पित्याचा मुलगा म्हणून व्यक्तीचा परिचय करून घेण्याची ही पुढची पायरी असावी. इंग्‍लिंश लोकांतील हॅरिसन, जेफरसन, जॅकसन, ॲडम्स इ. उदाहरणे या सदरात येतात. सिंधी लोकांमधील रामचंद्रानी, हेमराजानी, कृपलानी, मीरचंदानी इ. नावेही त्या त्या घराण्यातील मूळ पुरुषाकडून अगर प्रसिद्ध व्यक्तीवरून आली, असे म्हटले जाते. त्याचप्रमाणे ऋषीच्या वा गोत्राच्या नावावरूनही अत्रे, जमदग्नी, वसिष्ठ, गर्गे इ. आडनावे उद्भवली असावीत, असेही अनुमान करण्यात येते.

वि. का. राजवाडे यांनी पौराणिक व श्रौतसूत्री गोत्रांवरून अनेक आडनावांची व्युत्पत्ती लावली आहे. उदा., फाण्टा: वरून फाटक, कौरव्या: वरून कर्वे, श्वानेया: वरून साने इत्यादी. परंतु या नावांच्या व्यक्तींची आजची गोत्रे ह्या व्युत्पत्तिकल्पनेस पोषक ठरत नाहीत.

वरील पैतृकनामसदृश आडनावे वगळल्यास इतर अनेक कारणांवरूनही आडनावांची व्युत्पत्ती झाल्याचे दिसून येते. महाराष्ट्रीय आडनावांची पुढीलप्रमाणे ठोकळ विभागणी केली जाते : स्थलनिर्देशक (पुणेकर, विजापूरकर, निझामपूरकर, डोंगरे, पर्वते इ.) , व्यवसायनिर्देशक (जोशी, देशमुख, उपाध्ये, पाध्ये, व्यास, पुराणिक, कुलकर्णी, चौगुले, पोतदार, सोनार, पाटील, देसाई, देशपांडे, चिटणीस, फडणीस, कर्णिक इ.), वर्णवाचक (काळे, गोरे, ढवळे, हिरवे इ.), प्राणिवाचक (वाघ, लांडगे, कावळे, हंस, राजहंस, मोरे, कोल्हे, गाढवे इ.), वनस्पतिवाचक (पिंपळे, फुले, मोगरे, पडवळ, भोपळे इ.), पदार्थवाचक (तांबे, पितळे, सोने, लोखंडे इ.), शरीरावयवनिर्देशक (पोटे, डोळे, काणे इ.), नातेदर्शक (पोरे, पित्रे, नातू, सातपुते, नवरे इ.), गुणवाचक (धैर्यवान, अजिंक्य, सहस्रबुद्धे इ.), निंदाव्यंजक (आगलावे, बोंबले, पोटफोडे, जीवतोडे इ.), आणि अश्लील (गांडेकर, झवकिरे, नलवडे इ.).

त्याचप्रमाणे गुजराती लोकांत उपाध्याय, भट, देसाई, मेहता, पटेल, कापडिया इ. व्यवसायनिदर्शक आडनावे आहेत. बंगाली लोकांत मुखर्जी (मुख्योपाध्याय), बॅनर्जी (बंद्योपाध्याय), चतर्जी (चट्टोपाध्याय), बोस (बसु किंवा वसु), दत्त, मित्र, सेन, ठाकूर इ. आडनावे व्यवसायसूचक अगर जातिवाचक असलेली दिसून येतात. उत्तर प्रदेशातील दुबे, द्विवेदी, त्रिपाठी, चौबे, चतुर्वेदी, दीक्षित, पंत, पंडित, शर्मा, श्रीवास्तव आणि मद्रास-म्हैसूरकडील अय्यर-अय्यंगार, पिळ्ळै, नायडू तसेच केरळमधील नायर, नंबुदिरीपाद इ. नावेही जातिवाचक अगर व्यवसायवाचक आडनावे होत. महाराष्ट्रात व इतरत्र आलेल्या काही दक्षिणी लोकांमध्ये स्वत:च्या घराण्याच्या आणि वैयक्तिक नावांच्या आद्याक्षरांपुढे ‘राव’ ही उपाधी आडनावाप्रमाणे वापरण्याची प्रथा आहे. उदा., संयुक्त राष्ट्रसंघात पूर्वी भारताचे प्रतिनिधी असलेले बी. एन्. राव यांचे संपूर्ण नाव बेनेगल नरसिंग राव असे होते. पारशी लोकांतही डॉक्टर, बाटलीवाला, दारूवाला, मोटारवाला इ. व्यवसायवाचक आडनावे आढळून येतात.

उत्तर भारतात व्यक्तिनावांच्या शेवटी येणाऱ्या राम, दास, लाल, चंद इत्यादींसारख्या नावांचा उपयोग आडनावांसारखाही करतात. शीख व रजपूत लोकांत आडनावे नसतात. ते आपल्या नावापुढे सिंग (सिंह) लावतात. मुसलमानांत आडनावाची पद्धत सर्रास रूढ झालेली नाही तरीपण हल्ली ते शेख, सय्यद, काझी, फकीर, गुलाम इ. पंथवाचक. नदाफ, मुजावर वगैरे व्यवसायदर्शक, तसेच ऐतिहासिक किंवा पदवीदर्शक नावांचाही उपयोग आडनावांसारखा करू लागले आहेत.

मालकांची आडनावे नोकरांनी घेण्याच्या पद्धतीमुळेही काही काही आडनावांची उसनवार झाली आहे. इचलकरंजीचे जहागीरदार जोशी हे घोरपडे झाले. आंग्रे यांच्या पदरी असलेले बिवलकर नावाचे ब्राह्मण पुढे आंग्रे झाले. या कारणामुळे व उच्च जातीची आडनावे स्वत:च्या घराण्यास लावण्याच्या आवडीमुळेही छेत्रे, गोरे, जोशी, मंडलिक इ. ब्राह्मण आडनावे मराठ्यांत चव्हाण, मोरे, गायकवाड, जाधव, कदम, शेलार, शिंदे इ. मराठ्यांची आडनावे महारांत आणि साठे, राजगुरू, नांदे, लोखंडे, इ. उच्चवर्णीय आडनावे मांगांत सापडतात. भारतात आडनावे बदलण्यास कायद्याने बंदी नाही, त्यामुळे आडनावे बदलण्याची ही क्रिया आजही चालू आहे.

आडनावांची सुरुवात व्यक्तिनिर्देशाकरिता जरी झाली असली, तरी त्यांचा सामाजिक परिणाम फार व्यापक आहे. ज्या समाजात घराण्यावरुन व्यक्तीचे सामाजिक स्थान ठरते, त्या समाजात आडनावाला विशेष महत्त्व येणे क्रमप्राप्त आहे.

माडगूळकर, अं. दि. कुलकर्णी, मा. गु.