आघाडा : (हिं. अपांग, लालजिरी गु. आघेडी क. उत्तरनिगिड सं. अपामार्ग इं. प्रिकली चॅफ् फ्लॉवर लॅ. अँचिरँथ ॲस्पेरा कुल अँमरँटेसी). ही लहान ⇨षधी मोकळ्या पडीत जागी किंवा कचऱ्याच्या ढिगाच्या आसपास तणाप्रमाणे सर्वत्र (९३० मी.उंचीपर्यंत) असून आशिया, अफ्रिका, ऑस्ट्रेलिया व अमेरिका येथील उष्ण भागांत आढळते. पाने थोडी, समोरासमोर, लंबगोल किंवा वर्तुळाकृती असून त्यावर मागे मऊ लव असते. फुले हिरवट पांढरी व अनेक असून फांद्यांच्या टोकास लांब कणिश फुलोऱ्यावर [→ पुष्पबंध] नोव्हेंबर  जानेवारीत येतात. परिदले ४५ शुष्क व सतत राहाणारी असून शुष्क छदांनी व छदकांनी वेढलेली असतात केसरदले पाच व त्यांमध्ये फणीसारखे खवले असतात [→फूल] फळे लहान, शुष्क व एक बीजी असून ती परिदले छदे व छदके यांनी वेष्टिलेली असतात. बी एक, लहान व पिंगट असते. सर्वच भाग लालसर असलेला आघाड्याचा एक प्रकार आढळतो [→ अँमरँटेसी].

मुळांचा भिजवून काढलेला रस सौम्य स्तंभक (आकुंचन करणारा ) पानांच्या भुकटीचा काढा मधाबरोबर अतिसारात व आमांशात उपयुक्त बिया वांतिकारक व जलद्धेषावर (पिसाळ रोगावर) गुणकारी वनस्पती तिखट, रेचक, मूत्रल (मूत्रवर्धक) असून जलसंचय, मुळव्याध, गळवे, चर्मरोग, शूल (पोटातील तीव्र वेदना) इत्यादींवर देतात. वनस्पतीची राख खोकला व दम्यावर उपयुक्त तसेच रंगकामात व कपडे धुण्य़ास ती वापरतात. आघाड्याची राख मिसळलेले तिळाचे तेल (अपामार्ग–तेल) कानदुखीवर फक्त राख व्रणावर बाहेरून लावतात. ऋषीपंचमीस हिंदू लोक दंतधावनास काटक्यांचा उपयोग करतात. श्रीगणपतीपूजनास पाने व ‘समिंधां’ करिता वाळलेल्या जाड फांद्या वापरतात.

जमदाडे, ज. वि.