आग्रा : उत्तर प्रदेश राज्यामधील तिसऱ्या क्रमांकाचे व ऐतिहासिक वास्तूंमुळे जागतिक प्रसिद्धिचे शहर. शहर, कँटोन्मेंट, दयालबाग व स्वामिबाग मिळून लोकसंख्या ६,३४,६२२ (१९७१), हे शहर यमुनेच्या पूर्व तीरावर दिल्लीपासून आग्नेयीकडे १९२ किमी. आहे. रेल्वे मार्ग, हवाईमार्ग व सडकांनी हे भारतातील प्रमुख स्थानांशी जोडलेले आहे.
सिकंदर लोदीची आग्रा ही राजधानी होती. बाबराने तिचा ताबा घेतला (१५२६). अकबराने या नगरास अकबराबाद नाव दिले व नगराचा विकास केला. औरंगजेबाने १६५८ मध्ये येथून आपली राजधानी दिल्लीस हलविली, काही काळ हे शहर जाट, मराठे यांच्या ताब्यात होते.१८०३ मध्ये हे इंग्रजांकडे आले. त्यांच्या वायव्य सरहद प्रांताची ही १८५७ पर्यंत राजधानी होती. १८५७ मधील स्वातंत्रसंग्रामात या शहराने सक्रिय भाग घेतला होता. १८५८ पासून हे जिल्ह्याचे केंद्र राहिले. अकबराने पूर्वीचा बादलगड पाडून येथे आग्र्याचा किल्ला बांधला. किल्याचे आवार साडेतीन चौ.कि.मी.चे असून भोवतालचा तट, प्रवेशद्वारे व आतील अकबरी महालाचे काम अकबराने केले तर इतर मोती मशीद, दिवान-इ आम, दिवान-इ.खास, मीना मशीद, शीशमहल, जहांगीरमहल आदि वास्तू नंतरच्या बादशाहानी बांधल्या . किल्ल्याबाहेर शाहजहानने बांधलेली जामी मशीद (१६४८) असून आपल्या प्रिय पत्नीच्या स्मरणार्थ बांधलेला जगप्रसिद्ध ताजमहाल यमुनाकाठी आहे. यमुनेच्या पश्चिम तीरावर इतमाद उद्दौलाची सुंदर कबर, बाबर राहत असे तो उद्यानप्रसाद, रामबाग व पाऊण किमी. वर चिनी-का-रोझा आहे. आग्र्याच्या वायव्येस आठ किमी. वरील सिकंदराबादला अकबराची कबर आहे. उपनगर दयालबाग येथे राधास्वामी संप्रदायाचे केंद्र आहे.
सध्या उत्तर प्रदेशातील हे व्यापारी व औद्योगिक केंद्र असून येथे सतरंज्या व गालिचे विणणे, कापूस पिंजणे व दाबणे, सरकी काढणे, रसायणे, काच, होजियरी, धातूकाम, कातडी कमविणे इत्यांदींचे कारखाने असून येथे चांगल्या प्रकारच्या चामड्याच्या व संगमरवरी दगडाच्या कलावस्तू बनवितात. आग्रा किल्ल्याजवळील वस्ती दाट असून कँटोन्मेंट भागातील रस्ते प्रशस्त आहेत. पूर्वीपासून आग्रा शैक्षणिक केंद्रही आहे. शहराच्या पश्चिम भागात आग्रा विद्यापीठ आहे. १८२३ मध्ये येथे पहिले महाविद्यालय निघाले असून येथे इतर अनेक संस्था आहेत.
ताजमहाल पाहण्याकरिता येथे जगभराचे प्रवासी येत असल्याने आग्रा हे नेहमीचे रहदारीचे स्थळ बनले आहे.
दिवाकर, प्र. वि.
“