आखेन : (फ्रेंच नाव एक्स ला शपेल). पश्चिम जर्मनीच्या नॉर्थऱ्हाईन वेस्टफेलिया प्रांतातील, औषधी पाण्याच्या झऱ्यांकरिता प्रसिद्ध असलेल प्राचीन शहर. लोकसंख्या १,७५,४५१ (१९७०). शहराला लागून वायव्येस नेदर्लंड्स व नैर्ऋत्येस बेल्जियम यांच्या सरहद्दी असल्यामुळे त्याला जास्त महत्त्व आले आहे. पश्चिम यूरोपातून जर्मनीस येणाऱ्या दळणवळण मार्गावरील हे प्रमुख केंद्र आहे. कोळशाच्या खाणी असलेल्या सुपीक खोऱ्यात वसल्यामुळे, आखेनला औद्योगिक व व्यापारी महत्त्वही आहे परंतु याची कीर्ती येथील उष्ण झऱ्यांसाठीच जास्त आहे. संधिवातासारख्या रोगाचे असंख्य रुग्ण येथे रोमन काळापासून येत आहेत. शार्लमेनचा जन्म व मृत्यू येथेच झाला असावा त्याची उत्तरेची राजधानी आखेनलाच होती. ८१३ ते १५३१ पर्यंत जर्मन राजांना येथेच राज्याभिषेक होत असे. दुसऱ्या महायुद्धात येथील ८० टक्क्यांवर घरे नष्ट झाल्यामुळे बऱ्याच जुन्या वास्तू नष्ट झाल्या. अनेक तह आणि परिषदांचे हे स्थान आहे.  

शहाणे, मो. ज्ञा.

आखेन (प. जर्मनी) शहराचे दृश्य