अँगस्ट्रॉम, अंडर्स यूनास : (१९ ऑगस्ट १८१४—२१ जून १८७४). स्वीडिश भौतिकी विज्ञ. उष्णता व ⇨वर्णपटविज्ञान  या क्षेत्रांत त्यांनी महत्त्वाचे कार्य केले आहे. यांचा जन्म लोगडो येथे झाला. अप्साला विद्यापीठात शिक्षण घेतल्यानंतर १८३९ मध्ये तेथेच ते प्राध्यापक झाले. १८४३ मध्ये अप्साला वेधशाळेत निरीक्षक म्हणून त्यांची नेमणूक झाली. १८५८ला अप्साला विद्यापीठात भौतिकी विभागाच्या प्रमुख स्थानी त्यांची निवड झाली व तेथेच त्यांनी अखेरपर्यंत काम केले.

उष्णतेची संवाहकता मोजण्यासाठी त्यांनी एक नवीन पद्धत शोधून काढली. वायूत पाडलेल्या विद्युत् स्फुलिंगांमुळे (विजेच्या ठिणगीमुळे) एकावर एक असे दोन वर्णपट आढळून येतात. यांपैकी एक विद्युत् अग्राच्या धातूमुळे व दुसरा ज्या वायूतून स्फुलिंग प्रसारित होतो त्या वायूमुळे, असे अँगस्ट्रॉम यांनी स्टॉकहोम ॲकॅडेमीला सादर केलेल्या प्रबंधात प्रतिपादन केले होते. तसेच ऑयलर यांच्या ⇨अनुस्पंदन सिद्धांतावरून त्यांनी असेही सिद्ध केले की, एखाद्या उद्दीप्त वायूमुळे मिळणाऱ्या दीप्तिमान प्रकाशकिरणांची जी तरंगलांबी असते त्याच तरंगलांबीचे किरण तो वायू शोषण करू शकतो. या संशोधनामुळेच त्यांना वर्णपटविज्ञानाचे एक मूलसंशोधक मानण्यात येते व त्यांच्या सन्मानार्थ प्रकाशाच्या तरंगलांबीच्या एककास ‘अँगस्ट्रॉम’ (= १०-८ सेंमी.) असे नाव देण्यात आलेले आहे. १८६१ नंतर त्यांनी मुख्यत्वे सौरवर्णपटाचा अभ्यास केला. १८६२ मध्ये त्यांनी सूर्याच्या वातावरणातील हायड्रोजनाचे अस्तित्व सिद्ध केले व १८६८ ला त्यांनी सौरवर्णपट प्रसिद्ध केला. या पटात दिलेल्या तरंगलांबींच्या मापात फक्त ७,००० त एक या प्रमाणात चूक होती. कारण त्यांनी ज्या मीटरमानकावरून ही मापे घेतली होती तेच किंचित लहान होते. हा पट बऱ्याच कालापर्यंत अधिकृत म्हणून मानण्यात येत होता. उत्तर ध्रुवीय प्रकाशाच्या (ध्रुवीय प्रदेशात आढळणाऱ्या विविधरंगी प्रकाशाच्या आविष्काराच्या) वर्णपटाचा अभ्यास त्यांनीच प्रथम १८६७ मध्ये केला. ते अप्साला येथे मृत्यू पावले. 

भदे, व. ग.