अहमदशाह, गुजरातचा : (१७ नोव्हेंबर १३९१ – १२ ऑगस्ट १४४२). पंधराव्या शतकातील गुजरातमधील एक स्वतंत्र सत्ताधीश. खऱ्या अर्थाने ह्यास त्या राज्याचा संस्थापक मानावा लागेल. अहमदशहा १० जानेवारी १४११ मध्ये पाटण येथे गादीवर आला. ह्याच्या आजाच्या व बापाच्या कारकीर्दीत जी सत्ता अहमदाबादच्या आसमंतात होती, ती त्याने आपल्या तीस वर्षांच्या कारकीर्दीत गुजरातभर पसरविली. माळव्याच्या सुलतानाने गुजरातवर केलेल्या स्वाऱ्या त्याने परतविल्या. अहमदशाहाने गिरनारवर दोनदा स्वारी करून तेथील हिंदू राजकाडून खंडणी घेतली. १४१४ मध्ये त्याने गुजरातमधील सर्व हिंदू देवालये पाडण्याचा हुकूम दिला आणि सिद्धपूरच्या स्वारीत स्वत: तेथील देवालय पाडून मशीद बांधली. त्यामुळे चांपानेर, मंडलगढ, नांदोद येथील प्रमुखांनी माळव्याच्या सुलतानाच्या मदतीने १४१९ मध्ये अहमदशाहवर चाल केली. परंतु तीत त्यांचा पराभव झाला. १४१९–३८ पर्यंत त्याने माळव्याच्या सुलतानाविरुद्ध चार स्वार्‍या केल्या—आणि ठाणे व माहीम गुजरात राज्यास जोडली. १४३२ मध्ये त्याने डुंगरपूर, कोटा व बुंदी येथील हिंदू सत्ताधीशांचा पराभव केला. त्याने प्राचीन आशावलच्या ठिकाणी अहमदाबाद हे सुंदर शहर वसविले, ते सुशोभित केले आणि पुढे तेच राजधानीचे ठिकाण केले. तो अहमदाबाद येथे मरण पावला.

संदर्भ : Misra, S. C. The Rise of Muslim Power in Gujarat, New Delhi, 1963.

गोखले, कमल