अहमदनगर शहर : अहमदनगर जिल्ह्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या : शहर १,१८,२३६ व कँटोनमेंट ३०,१६९ (१९७१). हे सीना नदीच्या उत्तर तीरावर, दौंड-मनमाड रेल्वेमार्गावर दौंडहून ८२ किमी. व पुणे-औरंगाबाद राज्यमार्गावर पुण्याहून ११६ किमी. आहे. येथील हवा कोरडी व वार्षिक पर्जन्य सरासरी ४६ सेंमी. आहे. कँटोनमेंट विभागासह शहराचे क्षेत्रफळ १३·७ चौ.किमी. आहे.
बहामनी साम्राज्यातून फुटून अहमदशाहा बहिरी याने १४८९ मध्ये येथे निजामशाही स्थापन केली. माळीवाडा, मोरचूदनगर, नालेगाव, सर्जेपुरा, चाहुराणा इ. खेड्यांना सांधून अहमदशाहने शहर वसविले व त्याला आपले नाव दिले. निजामशाहीच्या दिडशे वर्षांच्या कारकिर्दीत शहराची खूपच भरभराट झाली होती. चांदबिबीच्या शौर्याचा इतिहास येथेच घडला. दक्षिणेच्या मोहिमेवर असताना औरंगजेब बाहशहा भिंगार या सध्याच्या कँटोनमेंट विभागाच्या स्थळी मृत्यू पावला. मोगलांकडून १७५९ मध्ये शहर मराठ्यांकडे व त्यांच्याकडून इंग्रजांकडे आले. शहराचे लष्करी महत्त्व ओळखून इंग्रजांनी येथे कँटोनमेंट विभाग ठेवला. १९४२ च्या आंदोलनामध्ये भारताचे अनेक अग्रगण्य पुढारी येथील किल्ल्यात कैदेत ठेवले होते पंडित जवाहरलाल नेहरूंनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे पुस्तक याच किल्ल्यात कैदेत असताना लिहिले.
जिल्ह्यात होणाऱ्या वस्तूंपैकी साखर, कापूस, कापड, विड्या, भांडी, धान्य इत्यादींच्या निर्यातीकरिता व जिल्ह्यात आयात करावयाच्या विविध क्षेत्रांतील वस्तूंकरिता अहमदनगर ही उतारपेठ समजली जाते म्हणूनच महाराष्ट्रातील सर्व प्रमुख शहरांशी ते सडकांनी जोडलेले आहे. याशिवाय येथे कापूस-पिंजणी व -दाबणी, तेल, विड्या, अभियांत्रिकी, हातमागाची व यंत्रमागाची पातळे, आयुर्वेदीय औषधे, तांब्यापितळेची भांडी इत्यादींचे कारखाने आहेत. येथील नगरपालिका १८५४ मध्ये स्थापन झाली असून, शहरास पिंपळगाव व कापूरवाडी तलावांतून पाणीपुरवठा होतो. शिक्षणाचे हे केंद्र असून येथे सु. सतरा माध्यमिक विद्यालये, दोन महाविद्यालये व एक आयुर्वेदीय महाविद्यालय आहे.
अहमदनगरचा भुईकोट किल्ला हे शहराचे प्रमुख आकर्षण होय. दीर्घवर्तुळाकारी , २·४ किमी. घेराचा दगडी तट, त्याखालील खंदक आणि २४ बुरूज असलेला हा किल्ला १४९४–१५६० पर्यंत बांधला गेला. किल्ल्यानजिकच दमडी मशीद व टोली मशीद या सारख्या आकाराच्या व सारख्या घडणीच्या मशिदी असून त्यांचे नक्षीकाम प्रेक्षणीय आहे. याशिवाय येथे अहमदशाहची कबर, फराहबाग, हस्तबिहिस्त बाग आणि औरंगजेब बाहदशहाचा दर्गा प्रेक्षणीय आहेत नगरपालिकेचे संग्रहालय व पुराभिलेख विभागाचे संग्रहालय ही नवीन आकर्षणे होत. शहराच्या पूर्वेस नऊ किमी.वर चांदबिबीचा महाल म्हणून प्रसिद्ध पण वस्तुत: सलावतजंगाची कबर असलेली वास्तू असून निजामशाहीतील दर्ग, बागा व अनेक इमारती यांनी शहराची शोभा वाढविली आहे.
शाह, र. रू.