अस्ट्रॉव्हस्की, अल्यिक्सांडर : (१२ एप्रिल १८२३ – १४ जून १८८६). रशियन नाटककार. जन्म मॉस्को येथे. आपले महाविद्यालयीन शिक्षण त्याने अर्धवटच सोडले. त्याच्या Bankrot (१८५०, इं. शी. द बँकरप्ट) ह्या नाटकात व्यापाऱ्यांच्या लबाड्या त्याने उघडकीस आणल्या. परंतु त्यामुळे त्याला सरकारी नोकरीस मुकावे लागले. रंगभूमीवर मात्र त्याच्या नाटकांना फार लोकप्रियता लाभत होती. त्याने सुमारे चाळीस गद्य नाटके आणि मुक्तच्छंदातील आठ पद्य नाटके लिहिली. त्याच्या बहुतेक नाटकांची संविधानके, पार्श्वभूमी आणि व्यक्तिरेखा अधाशी व्यापाऱ्यांच्या आणि मागासलेल्या शेतकऱ्यांच्या दुनियेतूनच घेतलेल्या आहेत. रशियन समाजातील दुर्गुण त्याने आपल्या नाटकांतून उघडे केले आहेत. अशा नाटकांत Bednost ne porok (१८५४, इं. भा. पॉव्हर्टी इज् नो क्राइम, १९१७) अशा लोकप्रिय नाटकाचाही समावेश होतो. मॉस्कोजवळील स्लायकोव्हो येथे तो निधन पावला.

मेहता, कुमुद