असेसर : ‘असेसर’ याचा मूळ अर्थ ‘जो इसम दुसर्‍याच्या बाजूस बसतो तो’. या दृष्टीने न्यायालयास अथवा न्यायाधिशास सल्ला देणारा अथवा निकालाच्या कामी मदत करणारा इसम असेसर म्हणून समजण्यात येतो.

ज्या वेळी एखाद्या कामात एखाद्या तंत्रज्ञाची अथवा शास्त्रज्ञाची जरुरी लागते, त्या वेळी गरजेप्रमाणे अथवा कायद्यात तशी तरतूद असल्यास त्याप्रमाणे, न्यायाधीश अशा इसमाला पाचारण करून त्याच्या सल्ल्याप्रमाणे त्या कामात निकाल देतो. नाविक, हवाई अथवा रेल्वे अपघातासंबंधी जेव्हा न्यायाधीश चौकशी करतो, तेव्हा अशा असेसरांना बोलाविले जाते. त्याचप्रमाणे जमिनीची किंमत अगर नुकसानीची मोजदाद करतानाही असे तंत्रज्ञ असेसर म्हणून काम करतात. इंग्‍लंडमध्ये १९२५ साली झालेल्या एका कायद्यानुसार उच्च न्यायालयाला अथवा अपील कोर्टाला कोणत्याही बिगरफौजदारी कामात असेसर बोलावण्याचा अधिकार आहे. 

नगरपालिकेच्या अथवा तत्सम कायद्यात इमारतींची किंमत ठरवून त्यावर कराची आकारणी करणार्‍या इसमासही ‘असेसर’ असे म्हणतात.

फौजदारी खटला चालविताना असेसर नेमण्याची पद्धत भारतात ब्रिटिशांनी १८९८ साली सुरू केली. त्या पद्धतीप्रमाणे सत्र न्यायाधिशांना असेसरांच्या मदतीशिवाय सत्राचे काम चालविण्याचा अधिकार नसे. मुंबईसारख्या महानगरीत मात्र ज्यूरी बोलाविली जाई. असेसरांची कमाल मर्यादा चार होती. शेवटी न्यायाधीश त्यांना खटला समजावून देई. आरोपी दोषी की निर्दोषी, याबद्दल प्रत्येक असेसरला स्वत:चे मत द्यावे लागे. अर्थात हे मत न्यायाधिशावर बंधनकारक नसे. ही पद्धत १९५५ पासून बंद करण्यात आली आहे.

कवळेकर, सुशील