अपहरण : बळजबरीने किंवा फसवून एखाद्यास स्थानांतरास प्रवृत्त करणे. आक्षेपार्ह कारणाकरिता केलेले अपहरणच फक्त कायद्याने गुन्ह्यात मोडते. अज्ञानाच्या अपहरणाबाबत मात्र तरतुदी भिन्न आहेत. १९४९ पर्यंत १४ वर्षांखालील मुलाला व १६ वर्षांखालील मुलीला पळवले, तर गुन्हा होत असे. ती वयोमर्यादा आता अनुक्रमे १६ व १८ करण्यात आली आहे. अशा अज्ञानाला किंवा विकल मनाच्या व्यक्त्तीला पालकाच्या अधिरक्षेतून पळवले, तर तो अपहरणाचा (किडनॅपिंग) गुन्हा होतो. हा गुन्हा पालकाच्या अधिकाराविरुद्ध असल्यामुळे, अज्ञान किंवा विकल मनाच्या व्यक्तीची संमती हा बचाव होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे पळवणे हाच गुन्हा असल्यामुळे पळवणाऱ्‍याचा हेतू अप्रस्तुत असतो. अज्ञान स्वत:च, इतरांनी प्रवृत्त न करता, पालकाच्या ताब्यातून निसटला असताना जर त्याला कोणी पुढे नेले, तर ते कृत्य गुन्ह्यात मोडत नाही. दहा वर्षांच्या आतल्या मुलाला अंगा- वरील वस्तू चोरण्याकरिता पळविण्यात आले, तर गुन्ह्याचे स्वरूप गंभीर होते. अपहरण वा व्यपहरण जर ठार करण्याकरिता, इजा करण्याकरिता, विकलांग करण्याकरिता, भीक मागण्याकरिता, गुलाम बनविण्याकरिता अगर कोंडून ठेवण्याकरिता करण्यात आले, तर ते अधिक शिक्षेस कारणीभूत होते. स्त्रीला किंवा मुलाला जबरीने लग्न लावण्यासाठी किंवा संभोगासाठी पळवल्यास अपराधी अधिक शिक्षेला पात्र होतो.

अपहरणाला प्रतिबंध करण्याकरिता कायद्याने प्रयत्न करण्यात आला आहे. पण इतक्याने भागणार नाही. सामाजिक नीतिमत्ताही वाढविण्याचा प्रयत्न व्हावयास पाहिजे.

कवळेकर, सुशील