सद्‌भावमूलक कृति : योग्य ती काळजी आणि दक्षता घेऊन सद्भावनेने केलेली कृती. एखादया व्यक्तीच्या कृतीमुळे दुसऱ्यास हानी पोहोचली असेल, तर असे कृत्य त्यावेळी दिवाणी किंवा फौजदारी स्वरूपाचे असते. त्या कृत्याच्या दिवाणी किंवा फौजदारी स्वरूपानुसार ती व्यक्ती इजा झालेल्या व्यक्तीला नुकसानभरपाई देण्यास किंवा शिक्षा भोगण्यास पात्र ठरते मात्र त्या व्यक्तीने तिचे कृत्य सद्भावमूलक होते. असे सिद्ध केल्यास त्या व्यक्तीची दिवाणी अथवा फौजदारी गुन्ह्याच्या उत्तरदायित्वातून मुक्तता होते.

भारतीय दंड संहिता, १८६०, कलम ५२ मध्ये सद्भावमूलक कृतीची व्याख्या देण्यात आली आहे. त्या व्याख्येनुसार जर एखादी कृती योग्य काळजी घेऊन व पुरेसे लक्ष देऊन ( ड्यू केअर अँड अटेन्शन ) केली असेल, तर ती कृती सद्भावनेने केली आहे, असे म्हटले जाते. अशा कृतीमुळे दुसऱ्यास इजा झाली तरी, तो गुन्हा मानला जाणार नाही. यावरून असे स्पष्ट होते की, सद्भावमूलक हा एक बचाव आहे.

याचप्रमाणे सर्वसाधारण परिभाषा-अधिनियम ( जनरल क्लॉझेस अक्ट ) १९५२ मध्ये ही सद्भावमूलक कृतीची व्याख्या करण्यात आली आहे मात्र ही व्याख्या फौजदारी कायदयातील व्याख्येपेक्षा वेगळी आहे. प्रामाणिकपणे केलेली कृती, मग ती कदाचित निष्काळजीपणाची असली, तरी सद्भावमूलक समजली जाते व त्यामुळे दिवाणी स्वरूपाच्या उत्तरदायित्वातून व्यक्तीची मुक्तता होते. म्हणजेच दिवाणी कायदयामध्येही सद्भावमूलक हा एक बचाव म्हणून मान्य केलेला आहे.

लिमिटेशन अक्ट, १९६३, कलम २ ( एच् ) मध्येही सद्भावमूलक कृतीची व्याख्या करण्यात आली आहे. ती व्याख्या सर्वसाधारण परिभाषा अधिनियमापेक्षा वेगळ्या प्रकारची आहे. त्यानुसार योग्य प्रकारे काळजी घेऊन केलेल्या कृतीला सद्भावमूलक कृती म्हटले आहे. सर्वसाधारण परिभाषा अधिनियमामधील सद्भावमूलक कृती या संज्ञेत कृती प्रामाणिकपणाची असण्यावर भर दिलेला आहे, तर लिमिटेशन अक्टमध्ये असलेल्या व्याख्येत एखादी कृती तत्परतेने व योग्य काळजी घेऊन केलेली असावी अशी अपेक्षा आहे. एखादी कृती सद्भावमूलक आहे किंवा नाही, याबद्दल कोणताही एक सरधोपट नियम असू शकत नाही. प्रत्येक खटल्यातील परिस्थितीनुसार ते ठरविण्यात येते.

जोशी, वैजयंती