अर्काट : तमिळनाडू राज्याच्या उत्तर अर्काट जिल्ह्यातील वालजापेठ तालुक्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या ३०,२३० (१९७१). हे पालार नदीच्या दक्षिण तीरावर आहे. मद्रास-बंगलोर लोहमार्गावरील वालजारोड स्थानकापासून हे ९ किमी. आणि राज्यमार्गाने मद्रासपासून सु. ११३ किमी. आहे. अर्काट हे नाव ‘आरूकाडू’ (सहा अरण्ये) या तमिळ शब्दावरून आले आहे. १७१२ मध्ये मोगलांचा सेनापती सादतुल्लाखान याने हे आपल्या कर्नाटक प्रांताचे मुख्य ठिकाण केले [⟶ अर्काटचे नबाब]. १८०१ मध्ये हे इंग्रजांकडे आले. जुन्या तटबंदीपैकी नदीच्या बाजूचा दिल्ली दरवाजा तेवढा शाबूत आहे. उद्‌ध्वस्त किल्ला व पडीक राजवाडा यांच्या दरम्यान सादतुल्लाखानाची भव्य कबर व मशीद आहे. त्याखेरीज गावातल्या सु. २० मशिदी व अनेक कबरींपैकी टिपू अवलियाची कबर मुस्लिम भाविकांचे श्रद्धास्थान आहे.

 

ओक, शा. नि.