अरबी समुद्र : हिंदी महासागराचा वायव्येकडील फाटा. पूर्वेकडे भारत, उत्तरेकडे पाकिस्तान व इराण, पश्चिमेकडे अरबस्तान व आफ्रिकेचा सोमाली प्रदेश अशा भूसीमांनी वेढलेला हा समुद्र अक्षवृत्त
८° ते २५° व रेखावृत्त ५०° ते ७५° पू. यांमध्ये विस्तारलेला आढळतो. कच्छचे आखात, खंबायतचे आखात, ओमानचे आखात, इराणचे आखात, एडनचे आखात व तांबडा समुद्र हे अरबी समुद्राचेच फाटे होत. ओमान व इराणची आखाते हॉर्मझच्या सामुद्रधुनीने तर एडनचे आखात व तांबडा समुद्र हे बाब-एल्-मांदेब सामुद्रधुनीने जोडलेले आहेत. कन्याकुमारी ते सोमालीमधील गार्डाफूई भूशिरापर्यंतची दक्षिणेकडील रूंदी २,९०० किमी. असून समुद्राच्या मध्यभागी बेटे नाहीत.
भारताचे द्वीपकल्प व आफ्रिका ह्यांना जोडणारी जमीन पूर्वी असावी [⟶ गोंडवनभूमी ]. तिच्या उत्तरेस टेथीस समुद्र व दक्षिणेस हिंदी महासागर होता. टेथीसचे एक आखात नर्मदेच्या खोऱ्यात शिरले होते [⟶ पुराभूगोल]. तृतीय कल्पात भूपृष्ठाच्या झालेल्या प्रचंड घडामोडींमुळे हिमालयाच्या निर्मितीबरोबरच भारत व आफ्रिका ही खंड-विप्लवाने अलग झाली असावी असे काही शास्त्रज्ञ मानतात, तर काहींच्या मते तेथील जमीन खचून तेथे हिंदी महासागराचा फाटा घुसला असावा. म्हणूनच अरबी समुद्राच्या बहुतेक भागाची २,९२५ मी. हून जास्त असलेली खोली भूसीमांच्या अगदी जवळही आढळते. फक्त सिंधुमुख, कच्छ व काठेवाड ह्यांना लागून असलेला भाग कमी खोल आहे. सिंधू, साबरमती, नर्मदा व तापी ह्या नद्या अरबी समुद्रास याच भागात मिळतात. अरबी समुद्राच्या आग्नेयीस जवळजवळ १,६०० किमी. पसरलेला समुद्रांतर्गत डोंगर असून याला ‘मालदीवची शैलभित्ती’ म्हणतात. मालदीव व लक्षद्वीप द्वीपसमूह याच शैलभित्तीवर निर्माण झालेल्या कंकणद्वीपांपासून तयार झालेला आहे. आफ्रिकेतील गार्डाफूई भूशिरापासून २५७ किमी. पूर्वेस सोकोत्रा हे पठारी स्वरूपाचे बेट आहे. सोकोत्रापासून आग्नेयीस समुद्रांतर्गत कार्लस्बर्ग शैलभित्ती आहे. या शैलभित्तीवरील पाण्याची खोली २,७५० मी. हून कमी आहे. मात्र शैलभित्तीच्या दोन्ही बाजूंस ती लगेच ३,८४० मी. होते. हीच शैलभित्ती हिंदी महासागराची व अरबी समुद्राची सरहद्द मानली जाते.
‘मेअर एरिथ्रिअम’ या नावाने पूर्वी यूरोपात व ‘सिंधू समुद्र’, ‘अपर समुद्र’ या नावांनी भारतात माहीत असलेल्या या समुद्रमार्गे फिनिशियन, ग्रीक व रोमनांनी भारताशी संबंध ठेवल्याचे अनेक दाखले मिळत असले, तरी अरबांनी वा अरबांमार्फत केला गेलेला या समुद्राचा अमर्याद वापर लक्षात घेऊन अरबी समुद्र हे सार्थ नाव त्याला दिले गेले आहे. रेशीम, लोकर, मसाले, साखर, धान्य, कापूस, गालिचे, सोन्याचांदीच्या वस्तू, अफू अशा विविध वस्तूंची देवाणघेवाण या समुद्रमार्गे शतकानुशतके होत होती सुएझ कालव्याच्या निर्मितीनंतर ह्या समुद्राला अधिक महत्त्व आले. दुसऱ्या महायुद्धानंतर आशिया-आफ्रिकेतील देश स्वतंत्र झाले. भारत, पाकिस्तान, इराण, इराक, कुवेत, कॉटार, अबू धाबी व इतर संयुक्त अरब अमीर राज्ये, ओमान, दक्षिण येमेन, सौदी अरेबिया, ईजिप्त, सूदान, इथिओपिया, सोमाली प्रजासत्ताक या स्वतंत्र राष्ट्रांच्या सरहद्दी अरबी समुद्रास मिळालेल्या आहेत. कोचीन, मुरगाव, मुंबई, कांडला, कराची, मस्कत, बहारीन, एडन, जिद्दा, पोर्ट सूदान, अस्मारा, जिबूती ही अरबी समुद्रावरील प्रमुख बंदरे होत. कोत्रा, दालॅक द्वीपसमूह, फारासॅन, कुरिया-मुरिया, मासिरा, किश्म, बहारीन, दीव, लक्षद्वीप व मालदीव ही यातील प्रमुख बेटे आहेत.
शाह, र. रू.