अम्‍ल-हॅलाइडे: ज्यांच्यात हॅलो-कार्बोनिल गट आहे अशा

O

||

R – C – X

व शेजारील संरचना-सूत्र (अणूंची मांडणी) असणाऱ्‍या कार्बनी संयुगांच्या वर्गाचे नाव. यातील R अल्किल किंवा अरिल [⟶मूलके] असतो व Xच्या जागी फ्ल्युओरीन, क्लोरीन, ब्रोमीन किंवा आयोडीन असू शकते. ॲलिफॅटिक व ॲरोमॅटिक पदार्थांपासून [⟶ॲलिफॅटिक संयुगे ॲरोमॅटिक संयुगे] तयार झालेल्या हॅलाइडांना अनुक्रमे ‘ॲसिल’ व ‘ॲराइल हॅलाइडे’ म्हणतात.

अम्‍ल-हॅलाइडांची विक्रिया सामान्यतः तीव्र असते. त्यांचे द्रवांक (वितळबिंदू) व क्वथनांक (उकळबिंदू) सामान्यतः कमी असतात. फॉर्मिल हॅलाइडे अस्तित्वात नाहीत पण इतर नीच स्थानी असणारी हॅलाइडे तिखट, दाहक (कातडीची आग करणारी), डोळ्यास पाणी आणणारी व दमट हवेत वाफाळणारी (वाफ बाहेर टाकणारी) असून द्रवरूप असतात.

उत्पादन-पद्धती :कार्बनी  अम्‍लातील कार्‌बॉक्सिलिक गटातील हायड्रॉक्सिलाच्या जागी क्लोरिनाचे प्रतिष्ठापन (संयुगातील एखादा अणू काढून त्या ठिकाणी दुसरा बसविणे) करून अम्‍ल-क्लोराइडे तयार केली जातात. त्यासाठी फॉस्फरस व फॉस्फोरिक अम्‍ले यांची किंवा सल्फ्यूरस किंवा सल्फ्यूरिक अम्‍लांची क्लोराइडे वापरली जातात. या विक्रिया पुढीलप्रमाणे घडून येतात :

(१) 3RCOOH

+

PCl3

3RCOC1

+

3H3PO3

       कार्बनी अम्‍ल

फॉस्फरस ट्रायक्लोराइड

अम्‍ल क्लोराइड

फॉस्फरिक अम्‍ल

(२) RCOOH

+

PCl5

RCOCl

+

POCl3

+

HCl

फॉस्फरस

पेंटाक्लोराइड

फॉस्फरस

ऑक्सिक्लोराइड

हायड्रोक्लोरिक

अम्‍ल

(३) RCOOH

+

SOCl2

RCOCl

+

SO2

+

HCl

      

थायोनिल क्लोराइड

सल्फर

डाय-ऑक्साइड

अम्‍ल-क्लोराइडांचे, विशेषतः ती द्रव असली तर, सहज जलीय विच्छेदन (पाण्यामुळे घटक वेगळे होणे) होते. त्यामुळे विक्रिया करून तयार केलेली अम्‍ल-क्लोराइडे पाणी वापरून, विक्रियेत तयार झालेल्या अकार्बनी पदार्थांपासून वेगळी काढता येत नाहीत ऊर्ध्वपातनाने (उकळून व तयार झालेली वाफ थंड करून) ती वेगळी करावी लागतात. विक्रियेमुळे उत्पन्न होणाऱ्‍या इतर पदार्थांचे क्वथनबिंदू, अम्‍ल-क्लोराइडांच्यापेक्षा बरेच अधिक अथवा कमी असतील अशी संयुगे विक्रियेसाठी घ्यावी लागतात. उदा., वरील पहिल्या समीकरणाप्रमाणे ॲसिटील क्लोराइड (CH3·CO·Cl) बनविणे सोयीस्कार पडते. कारण त्याचा क्वथनांक फॉस्फोरिक अम्‍लापेक्षा नीच असल्यामुळे त्याचे ऊर्ध्वपातन प्रथम होते व अबाष्पनशील (उडून न जाणारे) फॉस्फरस-अम्‍ल मागे उतरते. परंतु बेंझॉइक अम्‍लापासून बेंझॉइल क्लोराइड बनविण्याकरिता फॉस्फरस पेंटाक्लोराइड वापरावे लागते. कारण त्याच्या विक्रियेने तयार होणारे फॉस्फरस ऑक्सिक्लोराइड हे जास्त बाष्पनशील असल्यामुळे ते प्रथम ऊर्ध्वपातन पावते व त्यामुळे बेंझॉइल क्लोराइड वेगळे होते. अम्‍ल-ब्रोमाइडे वरील पद्धतींनी तयार करता येतात. पण अम्‍ल-क्लोराइडावर हायड्रोजन फ्ल्युओराइडाची विक्रिया अम्‍ल-फ्ल्युओराइडे बनविण्याकरिता व हायड्रोजन आयोडाइडाची विक्रिया अम्‍ल-आयोडाइडे मिळविण्याकरिता करणे सोयीचे असते.

विक्रिया: दमट हवेतील पाण्याचा ॲसिटील क्लोराइडावर परिणाम होऊन हायड्रोक्लोरिक अम्‍ल मुक्त होते व त्याच्या वाफा निघतात. अधिक उच्च क्लोराइडे पाण्यात कमी विद्राव्य असतात. त्यांच्यावर पाण्याचा सहज परिणाम होत नाही. अल्कोहॉल व अमोनिया यांचाही अम्ल-क्लोराइडांवर परिणाम होतो. उदा.,

RCOCl     +    HOH      → RCOOH   +  HCl (जलीय विच्छेदन)

                        पाणी

RCOCl      +   HOR’     → RCOOR’ +  HCl (अल्कोहॉली विच्छेदन)

                    अल्कोहॉल

RCOCl      +   H.NH2   → RCO NH2 +  HCl (अमोनियी विच्छेदन)

                     अमोनिया

उपयोग : अमाइने, ॲमिनो-अम्‍ले, अल्कोहॉले, सेल्युलोज इत्यादींचे ⇨ॲसिटिलीकरण किंवा बेंझॉयलीकरण करून त्यांच्यापासून अमाइडे, एस्टरे इ. तयार करण्यासाठी उद्योगधंद्यात ॲसिटील क्लोराइडाचा किंवा बेंझॉइल क्लोराइडाचा उपयोग केला जातो. त्याहूनही महत्त्वाचा उपयोग म्हणजे ही अम्‍ल-हॅलाइडे ⇨ग्रीन्यार विक्रिया, ⇨फ्रीडेल-क्राफ्टविक्रिया इ. उपयुक्त विक्रियांमध्ये वापरली जातात.

काही प्रमुख अम्ल-हॅलाइडे व त्यांचे गुणधर्म 

नाव 

सूत्र 

क्वथनांक 

वि.गु. 

ॲसिटील फ्ल्युओराइड 

CH3CO.F

२०.५ 

०.९९ 

” क्लोराइड 

CH3CO.Cl

५२.२ 

१.१०४ 

” ब्रोमाइड 

CH3CO.Br

७६.७ 

१.५२० 

” आयोडाइड 

CH3CO.I

१०८.०

१.९८०

प्रोपिऑनिल क्लोराइड

CH3CH2.COCl

८०.०

१.०६५

बेंझॉइल क्लोराइड

C6H5.COCl

१९७.२

१.२१२

संदर्भ : Fieser, L. F. Fieser, M. Organic Chemistry, Bomboy, 1962.

कारेकर, न. वि.