अमरावती शहर : अमरावती जिल्ह्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या १,९३,८०० (१९७१) क्षेत्रफळ ३६.३४ चौ.किमी. साक्षरता ५७.६% (१९७१). पूर्वी येथे उंबरांची विपुल झाडे होती. त्यांवरून यास उदुंबरावती-उमरावती-अमरावती असे नाव पडले असावे. उमरावती हे नाव तर अद्यापही रूढ आहे. येथील प्रसिद्ध अंबादेवीच्या दर्शनास रुक्मिणी आली असता श्रीकृष्णाने तिचे हरण केल्याची आख्यायिका आहे. शहरात तारखेडा, राजापेठ, गंभीरपूर व महाजनपूर या गावांचा समावेश होतो. येथील हवामान विषम असून उन्हाळ्यात ४६० सें. पर्यंतही तपमान जाते. पाऊस सरासरी ८६.४ सेंमी. पडतो.
अठराव्या शतकाच्या अखेरीपासूनच अमरावतीची वाढ झाली. पेंढाऱ्यांपासून शहरवासियांचे रक्षण करण्याकरिता निजामाने १८०४ मध्ये येथे कोट बांधला. हा कोट ७.६ मी. उंच व ४ किमी. घेराचा असून त्याला पाच मोठे दरवाजे आहेत. नव्या अमरावतीचा विस्तार कोटाबाहेरच आहे.
मुंबई-कलकत्ता महामार्गावरील हे शहर तालुक्याच्या सर्व शहरांशी व शेजारील जिल्ह्यांच्या मुख्य ठिकाणांशी सडकेने आणि बडनेरा या मुंबई-नागपूर रेल्वेमार्गावरील स्थानकाशी रेल्वेने जोडले आहे.
लोकसंख्येत ३१ टक्के लोक कामगार असून एकूण कामगारांपैकी १६ टक्के निर्मिति-उद्योगधंद्यांत आहेत. तेल गाळणे, तूरडाळ करणे, कुंकू बनविणे, सरकी काढून गठ्ठे बांधणे, सिमेंटचे ह्यूम पाइप बनविणे, प्लॅस्टिक स्विच व तत्सम बनविणे इ. उद्योगधंदे येथे चालतात. राज्यपरिवहन-महामंडळाची एक मोठी कर्मशाळाही (वर्कशॉप) येथे आहे. शैक्षणिक दृष्ट्या हे पुढारलेले असून येथे सत्तावीस माध्यमिक शाळा, एक आयुर्वेद आणि तीन मानव्य-व विज्ञान-महाविद्यालये, दोन शिक्षणशास्त्र-व दोन शारीरिक-शिक्षण-विद्यालये (त्यांपैकी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे हनुमान व्यायाम-प्रसारक मंडळ हे एक), कलानिकतेन, तांत्रिक शिक्षणशाळा, तंत्रनिकेतन, ग्रामीण-शिक्षण-प्रयोग-संस्था इ. शिक्षणविषयक सोयी आहेत. श्री. शिवाजीराव पटवर्धन यांनी स्थापलेली एक मोठी कुष्ठनिवारण संस्था व पाच मोठी रुग्णालये आहेत.
अंबादेवी व बालाजी ही प्रसिद्ध प्राचीन मंदीरे, अनेक मशिदी, जैन मंदिरे व राजा बिशनचंदाची नक्षीकामयुक्त हवेली ही प्रेक्षणीय आहेत.
कुलकर्णी, गो. श्री.