ॲडिनोकॅलिमा ॲलीसिया : (कुल-बिग्नोनिएसी). ही फार शोभिवंत वेल [→ महालता] मूळची ब्राझीलमधील असून इतर देशांत व भारतात सर्वत्र बागेत लावलेली आढळते. सदैव टवटवीत हिरवी दिसणारी पाने समोरासमोर असून प्रत्येक पान पुन्हा विभागलेले (द्विदली, त्रिदली) असते. पाने चुरगळली असता त्यांना लसणासारखा वास येतो. या वेलीची सच्छद [→ फूल], मोहक, गुलाबी व तुतारीच्या आकाराची फुले पानांच्या पार्श्वभूमीवर फार सुंदर दिसतात. ॲ. कॅलिसिना व ॲ. निटिडम या दुसऱ्या जातींची फुले पिवळी असतात. उष्ण व दमट हवेत आणि सकस गाळाच्या जमिनीत या वेली चांगल्या वाढतात. दाब-कलमांनी किंवा छाट-कलमांपासून नवीन लागवड करतात. ॲ. पंक्टिफोलियम ह्या द. अमेरिकेतील वृक्षाची मुळे तेथील इंडियन लोक दम्यावर देतात.
पहा : बिग्नोनिएसी.
जमदाडे, ज. वि.
“