अफू : अफूच्या झाडांना आलेल्या कच्च्या बोंडांना पाडलेल्या चिरांतून पाझरलेल्या व वाळून घट्ट झालेल्या रसाला ‘अफू’ म्हणतात. हा एक मादक व विषारी पदार्थ असून तो त्यात असणाऱ्या वैद्यकीयदृष्ट्या उपयुक्त असलेल्या ⇨अल्कलॉइडांसाठी प्रसिद्ध आहे [→ मॉर्फीन कोडीन]. मादक पदार्थांसाठी अफूच्या झाडांची प्राचीन काळापासून लागवड होत आलेली आहे. ग्रीक लिखाणात ह्या ⇨ ओषधीचा उल्लेख शोभिवंत उद्यान-वनस्पती म्हणून आढळतो. ती मूळची प. आशियातील. या औषधीपासून होणाऱ्या अफूचे महत्त्व ग्रीकांच्याही अगोदर अरबांनी जाणले व त्यांच्यामार्फत ती साऱ्या पूर्वेस चीनपर्यंत पोचली. प्लिनीच्या लिखाणावरून ईजिप्तमध्ये तिचा उपयोग औषधासाठी करीत असे दिसते. इ.स.पू. तिसऱ्या शतकानंतर अफूचा प्रसार जोरात होण्यास सुरुवात झाली. भारतात अफू आर्यांच्या आगमनापूर्वी आली असावी. परंतु त्याच वेळी ती पॅलेस्टाईन किंवा ईजिप्तमध्ये गेल्याचा पुरावा सापडत नाही.‘ओपिअन’ किंवा ‘ओपॉस’ या ग्रीक शब्दांच्या अरबी ‘अफिऊन’ या अपभ्रंशावरून ‘अफू’ किंवा ‘अफिण’ हे शब्द आले असावेत मात्र संस्कृतात तिला ‘अहिफेन’ म्हणतात. भारतात ती ‘पोस्त’ व ‘अफिमु’ या नावांनीही प्रसिद्ध आहे.
‘अफूचे झाड’ या नावाने ओळखली जाणारी ओषधी (पॅपॅव्हर सोम्निफेरम ), ६० ते १२० सेंमी, उंचीची वर्षायू (एक वर्ष जगणारी) वनस्पती आहे. हिची सामान्य लक्षणे ⇨पॅपॅव्हरेसी कुलात वर्णिल्याप्रमाणे आहेत. पाने साधी कमीजास्त करवती काठाची किंवा खंडित, तळाशी संवेष्टी ( खोडास वेढून राहणारी ), आयत असून भुरकट दिसतात. फुले देखणी, मोठी, पांढरी किंवा लालसर जांभळी कळ्या लांबट व झुकलेल्या असून जानेवारी-फेब्रुवारीत बहर येतो. संदले दोन, शीघ्रपाती ( लवकर गळणारी ), प्रदले चार, केसरदले असंख्य व सुटी किंजदले अनेक व जुळलेली असतात. किंजल नसतो किंजल्क चपटा पण टोकदार तबकडीसारखा असून ऊर्ध्वस्थ किंजपुटात अनेक बीजके असतात [→ फूल]. बोंड गोलसर व किंजल्काजवळ अनेक लहान झडपांनी फुटते. बिया पांढऱ्या, लहान व विपुल असून त्यांनाच ‘खसखस’ म्हणतात.
हर्डीकर, कमला श्री.
अफूची लागवड व निर्मिती : खसखस व मुख्यत: अफू यांसाठी या ओषधीची लागवड केली जाते. तिच्या खुल्या लागवडीस बंदी असून फक्त परवानाधारक ती करू शकतात. अफू निर्माण करणारे प्रमुख देश म्हणजे तुर्कस्तान, इराण, रशिया, चीन, ब्रह्मदेश, थायलंड, लाओस व भारत. यांशिवाय इतरही देशांत कायदेशीर किंवा अन्य मार्गांनी अफू काढली जाते. भारतात तिची लागवड उ. प्रदेश, मध्य प्रदेश व राजस्थान या तीन राज्यांपुरती मर्यादित केलेली असून या राज्यांत १२ अफू-विभाग पाडलेले आहेत. भारतात १९७१ मध्ये सु. ५०,००० हेक्टर जमीन अफूच्या लागवडीखाली होती. उ. प्रदेशाच्या अफूला ‘बनारसी अफू’ तर राजस्थान व मध्य प्रदेशच्या अफूस ‘माळवा अफू’ म्हणतात. बंगला-बगीच्यातून शोभिवंत रंगीत फुलांसाठी या वनस्पतीच्या शर्ले पॉपी (पॅपॅव्हर ऱ्हीयास ) या जातीची लागवड करतात.
कोणत्याही प्रकारच्या हवामानात ही ओषधी वाढू शकते. पण तिच्यावर कडाक्याची थंडी, ढगाळ, पावसाळी हवामान यांचा अनिष्ट परिणाम होतो उत्पादनात घट होते व तिचा दर्जाही खालावतो. विशेषत: गारांमुळे बोंडांना अपाय होतो. तिला कोणत्याही प्रकारची जमीन चालते. परंतु वाळुसरामिश्रित गाळाची जमीन अधिक चांगली असते. ती सामान्यपणे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये जमिनीतून एक पीक काढल्यावर बी पेरून लावतात. अफूच्या झाडांना नायट्रोजन व फॉस्फरसयुक्तयुक्त वरखते दिल्यास ती चांगली वाढतात. या वरखतांमुळे अफूचे उत्पादन तर वाढतेच पण त्यातील मॉर्फिनाचे प्रमाणही वाढते. या झाडांना खोड कुरतडणाऱ्या अळीचा उपद्रव होतो. तो टाळण्यासाठी रोपांना भरपूर पाणी देतात. त्यामुळे अळ्या उघड्या पडून पाखरे त्या खातात. अफूच्या झाडावर केवडा (पेरेनॉस्पोरा आरबोरेसन्स या कवकामुळे होणारा) व भुरी (एरिसायफे पॉलिगोनाय या कवकामुळे होणारा) हे रोग पडतात. त्यासाठी अनुक्रमे बोर्डो मिश्रण (३ : ३ : ५) आणि गंधक भुकटी फवारतात.
लागवडीनंतर २।। ते ३ महिन्यांत ओषधी १ ते १·३ मी. उंच वाढते व तिला बोंडे येतात. या कच्च्या बोंडांवर सायंकाळी ‘नश्तर’ नावाच्या ४ पाती (कधीकधी ६ पाती ) असलेल्या चाकूने खालून वर अशा किंवा आडव्या चिरा पाडतात. त्यातून पाझरलेला रस रात्रभरात तेथेच घट्ट होतो. सकाळी तो चमच्यासारखा ‘सेत्वा’ नावाच्या हत्याराने निपटून, खरडून गोळा करतात. बोंडावर चिरा पाडण्याचे काम ३-४ वेळा, क्वचित ८ वेळाही, करतात. परंतु सामान्यपणे रस यावयाचा थांबेपर्यंत हे काम चालते. अशा रीतीने गोळा केलेला दाट रस त्यातील ‘पसेवा’ हा काळपट पदार्थ काढून टाकण्यासाठी धातूच्या अगर मातीच्या भांड्यांतून ठेवतात. पसेवारहित अशुद्ध अफू उन्हात वाळवितात.
पाटील, ह. चिं.
ताजी अफू पिंगट असून मऊसर घट्ट असते व तिला फळासारखा वास, पण कडू चव असते. अफूमध्ये अल्कलॉइडांचे प्रमाण ५ ते २५% पर्यंत असते (बव्हंशी २०%). तिच्यातील जवळजवळ २६ अल्कलॉइडे शोधून काढण्यात आलेली आहेत. त्यांपैकी सहा प्रमुख आहेत. त्यांपैकी चारांचे भारतीय अफूतील प्रमाण पुढीलप्रमाणे आहे : मॉर्फीन ९–१४%, नार्कोटीन ३–१०%,कोडीन १·२५–३·७५% आणि पॅपॅव्हरीन ०·५–१%. यांशिवाय कार्बनी अम्लेही अंशरूपाने असतात.
शेतकऱ्यांकडून आलेली अफू जिल्हा अफू-अधिकाऱ्याकडून तपासली जाते व तिच्या संहतीवरून (प्रमाणावरून) तिची वर्गवारी केली जाते. ही अफू कॅनव्हासचे अस्तर असलेल्या तागाच्या दुहेरी पिशवीत बंद करून गाझीपूरच्या सरकारी कारखान्यात रवाना होते. तिची किंमत तिच्या संहतीवरून केलेल्या वर्गवारीच्या प्रमाणात सरकारी दराने शेतकऱ्यांना दिली जाते. या अफूस ‘दामदेता अफू’ म्हणजे ‘जिची किंमत दिली आहे अशी अफू’म्हणतात.
अफूवरील प्रक्रियेसाठी उ. प्रदेशात गाझीपूर येथे एक कारखाना आहे. मध्य प्रदेशात नीमूच येथेही एक कारखाना होता, तथापि तेथील उत्पादन बंद असून तो फक्त साठ्याकरिता वापरतात.
एप्रिलच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यापासून दामदेता अफू गाझीपूरच्या कारखान्यात येऊ लागते. तिच्यातील मॉर्फिनाच्या प्रमाणानुसार तिची चार प्रतींत विभागणी करतात. उत्तम प्रतीत (प्रत अ) ते १२% हून जास्त तर कनिष्ठ प्रतीत (प्रत ब३) ते ८–१०% असते. गाझीपूरच्या कारखान्यात अबकारी, निर्याती (पूर्वी हिला ‘प्रोव्हिजन अफू’ असे म्हणत) आणि औषधी (वड्या व पूड) अशी तीन प्रकारची अफू तयार केली जाते.
अबकारी अफू : अशुद्ध अफू लाकडी तबकात घालून तिची संहती ९०% होईपर्यंत वाळवितात. नंतर तिच्या १–१·५ किग्रॅ. वजनाच्या वड्या पाडतात व त्यांवर शिक्का मारतात.
निर्याती अफू : हिच्या मागणीप्रमाणे १,५ किंवा १० किग्रॅ. वजनाच्या वड्या पाडतात. ग्राहक राष्ट्राच्या मागणीप्रमाणे मॉर्फिनाचे प्रमाण असलेली अफू तयार केली जाते.
औषधी अफू : योग्य प्रतीची अफू निष्कलंक पोलादाच्या तबकात घालून तिची संहती ९०% होईपर्यंत उन्हात वाळवितात व तिच्या ०·५ ते १ किग्रॅ. च्या वड्या पाडतात. पूड करावयाची असल्यास, अफू १००% संहतीसाठी भट्टीमध्ये किंवा वाफेने वाळवितात व नंतर पोलादी यंत्रांतून दळतात व चाळतात. ही पूड १ ते ५ किग्रँ., वजनाप्रमाणे डब्यांतून बंद करतात.
अफूपासून मिळणारी अल्कलॉइडे व त्यांची लवणे : ह्यांच्या निर्मितीत मुख्य भर मॉर्फीन व कोडीन प्राप्त करण्यावर दिला आहे. इतर अल्कलॉइडांची निर्मिती दुय्यम समजली जाते. अल्कलॉइडांची निर्मिती अफूचा अर्क संहत करून नंतर त्याच्या निक्षेपणाने केली जाते. गाझीपूर येथे मॉर्फिन, कोडीन व त्यांची लवणे, नार्कोटीन, एथिल मॉर्फिन हायड्रोक्लोराइड, पॅपॅव्हरीन व त्याचे हायड्रोक्लोराइड, थेबाइन इ.ची निर्मिती होते.
अफूचे व्यसन :अफू मादक असल्यामुळे नशेसाठी तिचे सेवन भारत, चीन, पर्शिया वगैरे देशांत सर्रास प्रचलित होते. नशेसाठी अफू सेवन केल्यावर पुन:पुन्हा तिची इच्छा होऊन मनुष्य व्यसनात गुरफटला जातो. कडक आंतरराष्ट्रीय निर्बंधामुळे ह्या व्यसनास खूपच आळा बसला आहे. भारतात अफूचे सेवन बेकायदेशीर समजले जाते. भारतातील अफूचे सेवन करणाऱ्या व्यक्तींची नोंदलेली संख्या १९५७ साली ३,९४,४०२ होती ती घटून १९७१ साली ८७,५२२ इतकी झाली. नोंद केलेल्या आणि वैद्यकीय सल्ल्यामुळे आवश्यक असणाऱ्यांना अबकारी अफूच्या साठ्यातून अफू पुरवली जाते. अफू किंवा तिचे अल्कलॉइड यांचे सेवन तीन मार्गांनी केले जाते : (१) खाऊन, (२) धूर ओढून व (३) त्वचेखाली शरीरात सुईने टोचून.
(१) अफू खाणे : हा प्रकार जास्त प्रचलित आहे. ती चित्तवृत्ती प्रसन्न करणारी व कामोत्तेजक आहे असा समज असल्यामुळे तिचे व्यसन वाढते. बहुधा अशुद्ध अफू तशीच खातात किंवा तिचा विद्राव अथवा काढा पितात. व्यसनी माणसास उत्तरोत्तर अफूचे प्रमाण वाढवावे लागते. नाहीतर पहिल्या मात्रेची धुंदी उतरल्यावर येणारा आळस व मानसिक औदासीन्य नंतरच्या सेवनाने कमी होत नाही. रोज १ ते ४ ग्रॅम अफू खाणाऱ्यांची उदाहरणेही आढळली आहेत.
(२) अफू ओढणे : ओढण्याच्या अफूचे ‘मादक’ व ‘चंदू’ असे दोन प्रकार आहेत. त्यांपैकी मादक जास्त प्रचलित आहे. ओढण्याच्या अफूची गोळी अफू पाण्यात घालून उकळवून व तो विद्राव गाळून नंतर घट्ट करून तयार करतात. त्यात बाभूळ, आवळा अथवा पेरूच्या जाळलेल्या पानांची पूड घालतात व ह्या मिश्रणाचे ४ सेंमी. व्यासाचे गोळे करतात. तीच मादक गोळी होय. ‘चंदू’ हा जास्त तीव्र प्रकार असून त्यात पाण्यात तापवून काढलेल्या अफूचा संहत अर्क असतो. मातीच्या छोट्या भांड्याला लाकडी नळी लावून त्यातून अफूचा धूर ओढतात. जळक्या अफूचा वास शिसारी आणणारा असतो. रोज २ ते १८० ग्रॅम (सरासरी २५ ग्रॅम) अफू ओढणारे आढळतात.
(३) अफू सुईने शरीरात टोचणे : या प्रकारे अफू, मॉर्फीन व हेरॉईन सेवन करण्याची पद्धत विशेषतः यूरोप, अमेरिका इ. पाश्चिमात्य देशांत प्रचलित आहे. भारतातही हा प्रकार रूढ होत आहे. हेरॉईन हे मॉर्फिनाचे अनुजात (साध्या रासायनिक प्रक्रियेने बनलेले कार्बनी संयुग) असून ते प्रभावी वेदनाहारक व जास्त विषारी आहे. कित्येक राष्ट्रांत त्याची निर्मिती बेकायदा ठरविली आहे. हेरॉईनचे व्यसन मुख्यतः तरुण आणि काही प्रसंगी बारा वर्षांखालील मुलांनाही लागलेले दिसून येते.
अफूच्या कोणत्याही पद्धतीने केलेल्या सेवनाने भूक मंदावते, पचनशक्ती बिघडते, निद्रानाश उद्भवतो, शरीर रोडावते, मज्जातंतू दुर्बळ बनतात व नपुंसकत्व येते. मानसिक विकृती होण्याचा किंवा वेडही लागण्याचा संभव असतो. ही लक्षणे मॉर्फिनाच्या सेवनाने अधिक दिसून येतात व या लक्षणाला ‘मॉर्फीनिझम’ किंवा ‘मॉर्फीनोमॅनिआ’ म्हणतात. ह्यामुळे शरीर फिकट होते. क्वचित मृत्यूही झाल्याची उदाहरणे आहेत.
अफूचे व्यसन सोडविण्यासाठी अचानक पूर्णपणे अफू थांबविणे व क्रमश: ती थांबविणे असे दोन प्रकार आहेत. पहिल्या पद्धतीने व्यसनी व्यक्तीत असह्य इंद्रियांतर्गत बदल व अस्वस्थता जाणवते, म्हणून ही पद्धत लहान मुलांच्या बाबतीत वापरतात. दुसऱ्या पद्धतीने प्रथम अफूचे प्रमाण थोडे थोडे कमी करून पुढे तो वेग झपाट्याने वाढवितात. यांशिवाय इन्शुलिनाचे इंजेक्शन अथवा व्यसनी माणसाच्या अंगावर वाढलेल्या फोडातील द्रव त्याला ठराविक मुदतीने टोचणे हेही उपाय आहेत.
अफू व त्यातील अल्कलॉइडांचा विषारीपणा :प्रमाणाबाहेर अफू अगर मॉर्फिनाचे सेवन केल्यास झोप, श्वासोच्छ्वास, भूक इ. मंदावणे, शुद्ध हरपणे, पंगुत्व येणे अशी लक्षणे आढळतात. मॉर्फीन अफूपेक्षा २० पट अधिक विषारी आहे. ओकारी, जुलाब धनुर्वातासारखे आचके (विशेषत: मुलांच्या बाबतीत) इ. लक्षणेही आढळून येतात. अफूचे १३० मिग्रॅ. इतके प्रमाणही सामान्य माणसाला घातूक असते.
अफूची विषबाधा झाल्यास तोंडातून नळी घालून अथवा वांतिकारक औषधांनी जठर रिकामे करतात. उत्तम उतारा म्हणजे पोटॅशियम परमँगॅनेट होय. १ ग्रॅम. पोटॅशियम परमँगॅनेट अंदाजे ४७५ घ. सेंमी. कोमट पाण्यात विरघळवून ते रोग्याला ३० मिनिटांच्या अंतराने दोन वेळा प्यायला लावतात. दर वेळी वांतिकारक औषध देऊन पोटॅशियम परमँगॅनेट बाहेर काढतात. त्यास झोपू देत नाहीत. कडक कॉफी पाजतात. डोक्यावर बर्फ ठेवतात. मात्र हात व पाय गरम ठेवतात. प्रसंगी कृत्रिम श्वासोच्छ्वासही करावा लागतो.
अफूचे उपयोग :अफूपासून मॉर्फिन, पॅपॅव्हरीन, नार्कोटीन इ. वैद्यकीय दृष्टीने उपयुक्त व महत्त्वाच्या अल्कलॉइडांची निर्मिती होते. गुंगी, झोप आणणाऱ्या, दु:ख व वेदना कमी करणाऱ्या औषधांत अफू वापरतात. हल्ली अफूऐवजी तिच्यातील अल्कलॉइडे वा त्यांची लवणे वापरतात. अफूचे कापूरमिश्रित आसव खोकल्यावर, अतिसारासाठी वापरतात तर झाडावरील गाठीचे मलम मूळव्याधीवर वापरतात. रडक्या तान्ह्या मुलास अफू देतात.
अफूच्या झाडाची इतर उत्पादने :खसखस, तिचे तेल आणि पेंड:अफूच्या झाडांची लागवड खसखशीसाठीही करतात. ज्या बोंडाना अफूसाठी ओरखाडे पाडलेले नसतात, त्यांतून तेलाच्या दृष्टीने उत्तम बी निघते. एक हेक्टर जमिनीतील पिकापासून २२० ते २७५ किग्रॅ. बी निघते. खसखस अथवा तिचे तेल यांच्या अंगी अफूच्या मादकपणाचा लवलेशही नसतो. खसखस पौष्टिक असून तिचा पाव, रस्सा (सूप) इ. खाद्यपदार्थात उपयोग करतात. खसखशीत प्रथिन (२२·३ ते २४·४%) आणि तेल (जवळजवळ ५०%)असते. खसखशीच्या तेलाची चव गोड बदामासारखी असते. त्यास वास जवळजवळ नसतो व रंग फिक्कट सोनेरी असतो. ते खाण्यास वापरतात. त्याचा चित्रकारांचे रंग व साबण करण्यासाठी उपयोग होतो. ते अतिसार, आमांश, भाजल्याच्या जखमा इत्यादींवर वापरतात. खसखशीतून तेल काढल्यावर उरलेली पेंड गोड व पौष्टिक असते. ती गरीब लोक खातात. पेंड गुरांस खावयास देतात परंतु दुभत्या जनावरांना जास्त प्रमाणात खाऊ घातली (दिवसास एका किलोग्रॅमहून जास्त), तर दुधातील चरबीचे प्रमाण कमी होण्याची शक्यता असते. ही पेंड लहान वा वाढत्या वयाच्या गुरांना खावयास देऊ नये.
अफूची बोंडे :बोंडामध्ये अफूतीलच घटक अल्प प्रमाणात असतात. ओरखाडे न पाडलेल्या आणि ओरखाडे पाडलेल्या भारतीय अफूच्या बोंडांमध्ये अनुक्रमे०·४–०·६% व ०·१५–०·२२% अल्कलॉइडे असतात. निरनिराळ्या देशांतील बोंडांतील मॉर्फिनाचे प्रमाण वेगवेगळे (०·१८ ते ०·९०%) असते. ठेच, दाहयुक्त सूज, कानातील दाह वगैरेंवर बोंडाचा अर्क वापरतात. त्रासदायक खोकला, निद्रानाश यांवर उपाय म्हणून बोंडांचे सरबत वापरतात. भारतात अफूची बोंडे गूळ व पाण्याबरोबर तापवून अमली द्रव तयार करतात.
अफूच्या झाडाची पाने, पाकळ्या, फुले : पानात अल्प प्रमाणात मॉर्फीन, कोडीन, नार्कोटीन व पॅपॅव्हरीन ही अल्कलॉइडे असतात. वेदना नाहीशा करण्यासाठी पाने चोळतात. कोवळी रोपे पालेभाजीप्रमाणे खातात. पाने व पाकळ्या यांचा उपयोग अफू पेट्यांतून बंद करताना झाकण म्हणून करतात. लाल फुले औषधी सरबत तयार करण्यासाठी वापरतात.
अफू-उद्योग :भारतात अफू-उद्योग सोळाव्या शतकाच्या प्रारंभी सुरू झाले. मोगलांच्या काळात अफूची लागवड सर्रास होत असे. त्या काळी अफू नशेसाठी म्हणून खुली विकली जात असे व पूर्वेकडील देशांना (मुख्यत: चीनला) निर्यात केली जात असे. अफूचे शारीरिक, मानसिक व नैतिक परिणाम लक्षात घेऊन सरकारने निरनिराळे निर्बंध घालून तिचे उत्पादन आता मुख्यत: औषधी उपयोगांसाठीच मर्यादित केले आहे. अफू व तिच्यापासून मिळणारी द्रव्ये यांच्या निर्मितीपासून भारताला दर वर्षी सु. १५ कोटी रुपयांचे परकीय चलन मिळते. वैद्यकीय व वैज्ञानिक कार्याकरिता लागणाऱ्या पुरवठ्यापैकी सु. ८२% पुरवठा भारतातून होतो.
अफू-उत्पादनात भारत, तुर्कस्तान व रशिया हे देश आघाडीवर आहेत. १९६२ साली जागतिक अफू-उत्पादनाच्या ६७%उत्पादन एकट्या भारताचे होते. निरनिराळ्या प्रमुख अफू-उत्पादन करणाऱ्या देशांतील अफूच्या उत्पादनाची आकडेवारी कोष्टक क्र. १ मध्ये दिली आहे.
कोष्टक क्र. १ : जागतिक अफू-उत्पादन (किग्रॅ.मध्ये)
देश |
वर्ष |
|
१९६० |
१९६२ |
|
बल्गेरिया |
१,१४५ |
२६२ |
भारत |
९,१४,३६३ |
९,७१,२७० |
जपान |
२,७३३ |
१,९४४ |
पाकिस्तान |
६,०९१ |
८,२३९ |
तुर्कस्तान |
३,६५,१९५ |
३,१०,५९२ |
रशिया |
१,६९,००० |
१,४८,३०० |
यूगोस्लाव्हिया |
३९,९१६ |
४,२५५ |
भारतात अफू व तीतील अल्कलॉइडांच्या किंमती व व्यापार पूर्णपणे भारत सरकारच्या स्वाधीन आहेत. अबकारी अफू निरनिराळ्या राज्यांना
‘ना तोटा ना फायदा’ ह्या तत्त्वावर पुरवली जाते. निर्याती अफूची किंमत भारत सरकार तिचा उत्पादन-खर्च, तिची आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणी व इतर देशांनी लावलेला त्यांच्या अफूचा दर वगैरे बाबी लक्षात घेऊन ठरविते. भारतातून मुख्यत: इंग्लंड, अमेरिका व फ्रान्सला शास्त्रीय व वैद्यकीय उपयोगांसाठी अफू निर्यात होते. निरनिराळ्या देशांना भारतातून निर्यात झालेल्या अफूची आकडेवारी कोष्टक क्र. २ मध्ये दिली आहे. १९६१-६२ व १९६२-६३ ह्या दोन वर्षांत निर्यात झालेल्या भारतीय अफूची किंमत अनुक्रमे ४ कोटी २६ लक्ष रुपये व २ कोटी ३ लक्ष रुपये इतकी आली.
भारतात अत्यंत थोड्या प्रमाणात अफूची आयातही होते. भारतात १९६०-६१, १९६१-६२ व १९६२-६३ ह्या तीन वर्षांत अनुक्रमे २७ किग्रॅ. (किंमत १,७६० रु.), ४७ किग्रॅ. (२,२२२ रू.) व १७ किग्रॅ. (१,२४२ रु.) अफूची आयात झाली.
भारतातील अफूपासून मॉर्फिननिर्मिती व मॉर्फिनापासून इतर अनुजातांची (मुख्यत: कोडिनाची) निर्मिती इत्यादींची आकडेवारी कोष्टक क्र. ३ मध्ये दिली आहे.
अफूपासून बनविलेल्या अल्कॉइडांची भारताने केलेली निर्यात १९६०-६१, १९६१-६२ व १९६२-६३ ह्या तीन वर्षात अनुक्रमे २५६ किग्रॅ. (किंमत ५७,०८५ रु.), १६७ किग्रॅ. (१,२४,८११ रु.) व ५१ किग्रॅ. (१,५९० रु.) इतकी होती. ह्याच तीन वर्षांत भारतात झालेली आयात अनुक्रमे ६८५ किग्रॅ. (८२,०६७ रु.), ७५५ किग्रॅ. (६३,०२३ रु.) व ८२८ किग्रॅ. (७४,५३६ रु.) इतकी होती.
कोष्टक क्र. २ : भारतातून अफूची निर्यात (हजार किग्रॅ.मध्ये)
वर्ष |
देश |
|||||
इंग्लंड |
अमेरिका संयुक्त संस्थाने |
फ्रान्स |
इटली |
इतर राष्ट्रे |
एकूण |
|
१९५७-५८ |
१३७ |
१२९ |
६० |
१८ |
१०२ |
४४६ |
१९५८-५९ |
१७३ |
१३० |
७१ |
११ |
१४२ |
५२७ |
१९५९-६० |
१६५ |
१४७ |
५७ |
११ |
१५५ |
५३५ |
१९६०-६१ |
२४५ |
१८१ |
७१ |
२ |
१०३ |
६०२ |
१९६१-६२ |
१८६ |
१९१ |
८१ |
२६ |
१०० |
५८४ |
१९६२-६३ |
१४२ |
६८ |
२० |
७ |
३६ |
२७३ |
कोष्टक क्र. ३ : भारतातील मॉर्फीननिर्मिती व मॉर्फीनाचे इतर अनुजातांत रूपांतर (किग्रॅ. मध्ये)
वर्ष |
|||||
१९५८ |
१९५९ |
१९६० |
१९६१ |
१९६२ |
|
एकंदर मॉर्फीननिर्मिती |
१,१३७ |
१,१५५ |
१,३७९ |
१,४४३ |
२,६९७ |
कोडिनामध्ये रुपांतर केलेले मॉर्फिन |
९८१ |
१,०२२ |
१,०६५ |
१,२४८ |
१,८७१ |
एथिल मॉर्फिनामध्ये रूपांतर केलेले मॉर्फिन |
१४७ |
१६६ |
१९९ |
२०८ |
३२० |
उरलेले मॉर्फीन |
९ |
— |
११५ |
— |
५०६ |
१९६९–७२ या काळात भारतात ३,४४७ टन अफू तयार झाली व त्यातील १९६९–७१ या काळात २,३०४ टन निर्यात करण्यात आली.
भारतातील अफूवरील निर्बंध: १८५७ सालच्या अफूच्या झाडाच्या लागवडीविषयक अफू-कायदा१८७८ सालचा अफूचे उत्पादन, वाहतूक, विक्रीविषयक अफू-कायदा व १९३० सालचा अफू व त्यातील अल्कलॉइडांच्या निर्मितीविषयक औषध-कायदा, ह्या निरनिराळ्या कायद्यांन्वये अफूची लागवड,विक्री,निर्यात इत्यादींचे नियंत्रण केले जाते. फक्त परवानाधारक शेतकरीच अफूची लागवड करतात व अशुद्ध अफू नियंत्रित दराने सरकारला विकतात. ह्यापुढील अफूचे शुद्धीकरण, प्रत, विक्री, निर्यात, अल्कलॉइडांची निर्मिती सर्वस्वी सरकारच्या ताब्यात आहे. भारतातून अफूचे सेवन बेकायदेशीर समजले जाते.
पहा : अल्कलॉइडे मादक पदार्थ.
वैद्य, श्री. द.
संदर्भ : 1. Brookes, V.J. Jacobs, M. B.Poisons, New Jersey, 1958.
2. Chopra, R.N.Chopra, I.C.Drug Addiction (with Special Reference to India), Delhi,1965.
3. C.S.I.R.The Wealth Of India, Industrial Products, Part VI, New Delhi, 1965.
4. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. VII, New Delhi, 1966.
“